female infertility stri vandhytva स्त्री वंध्यत्व

स्त्री वंध्यत्व

स्त्री वंध्यत्व-

स्त्री वंध्यत्व ही एक फार मोठी समस्या आहे आणि त्यावर आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा वापर करण्याची नितांत गरज आहे असे जाणवते. बदललेली व सदोष जीवनशैली व आहार विहार पद्धती, वाढते वय, व्यायामाचा अभाव, अनिर्बंध, अपथ्यकर आहार, विहार, व्यसने, मानसिक ताण तणाव, अतिप्रवास, सतत बसणे, मल मूत्र वेगांना रोखून धरणे, मोबाइल सदृश विदयुतचुंबकीय लहरीच्या सतत संपर्कात असणे, रजस्वला परिचर्येचे पालन न करणे, मानसिक ताणतणाव, पोषक आहार न घेणे, ऋतुचर्या व दिनचर्या यांचे पालन न करणे तसेच तणावपूर्ण दैनंदिन जीवन या कारणामूळे मासिक रज:स्त्राव तसेच स्त्रीबीज निर्माण प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊन वंध्यत्वसारख्या समस्या या पूर्वीच्या तुलनेत आज झपाटयाने वाढताना दिसत आहेत.
वंध्यत्व म्हणजे गर्भधारण करण्यास असमर्थता. गर्भधारणा होण्यासाठी शुक्र व रज हे महत्त्वाचे आहे. अर्थात ते प्राकृत स्थितीत असणे गरजेचे असते. शुक्र व रज यांच्यात कोणत्याही प्रकारचा विकृती निर्माण झाल्यास अथवा नाश झाल्यास विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होतो अथवा गर्भधारणा होत नाही.
ध्रुव चतुर्णा सान्निध्यादगर्भ: स्याद्विधिपूर्वक: ।
ऋतुक्षेत्राम्युबीजानां सामाज्यादडूकुरो यथा ।।
सु.शा २/२५
ज्याप्रमाणे अंकुर उत्पत्तीसाठी ऋतु, क्षेत्र, अंबु व उत्तम बीज आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गर्भोत्पत्तिसाठी शुद्ध गर्भाशय (क्षेत्र), अंबु (आहार रस), बीज (शुक्राणु व स्त्री बीज) व योग्य काल अत्यावश्यक घटक आहेत.
१. ऋतु – म्हणजे गर्भधारणेसाठी सुयोग्य काळ. स्त्रीसाठी वय वर्ष १६ पासून पुढे आणि मासिक रजःस्रावाच्या १० व्या दिवसापासून १८ व्या दिवसापर्यंत हा काळ गर्भधारणेसाठी योग्य असतो. म्हणूनच स्त्रीला ह्या काळात ‘ऋतुमती’ म्हणतात. गर्भधारणा होण्यासाठी योग्य काळ रज:स्त्रावानंतरचे १२, १६ दिवस ऋतु कालामध्ये मैथुन कर्म केले पाहिजे.
२. क्षेत्र – गर्भाशय, बीजवाहिन्या, बीजकोष ह्या सर्व भागांना एकत्रितपणे ‘क्षेत्र’ समजावे. ह्यातील कोणत्याही भागात दोष असेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही. गर्भधारणा करण्यासाठी गर्भाशय अवयवांची उत्तम स्थिती, गर्भाशय अंत:कलेचे चांगले पोषण चांगले हवे.
३. अम्बू – झाडांच्या वाढीसाठी जसे खतपाणी तसेच गर्भाशयाच्या व गर्भाच्या पोषणासाठी जे जे काही आवश्यक घटक ते सर्व म्हणजेच “अम्बु”. आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन इ. संप्रेरकांचा समतोल असणे येथे अभिप्रेत आहे. ऋतुस्राव, गर्भधारणा, गर्भपोषण, स्तन्यनिर्मिती, रजोनिवृत्ती अशा सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी शरीरातील अन्तःस्रावी ग्रंथींचे कार्य अविरतपणे चालू असते. गर्भावस्थेत ह्यांचा समतोल गर्भाच्या पोषणासाठी अनिवार्य असतो.
४. बीज – जन्मतः स्त्रीबीजकोषात ठराविक संख्यने सूक्ष्म स्वरुपात स्त्रीबीज दडलेली असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी एक एक बीज परिपक्व होते व त्याचे पुरूष बीजाबरोबर मीलन झाले तर गर्भधारणा संभवते, अन्यथा मासिक स्रावाच्या वेळी स्त्री शरीरातून हे बीज बाहेर टाकले जाते. स्त्री व पुरुषबीजे निरोगी असली तरच गर्भधारणा व्यंगरहित घडते, निरोगी व सुदृढ बालक जन्माला येते.
दोषरहित व सर्वगुणसंपन्न पुरूष व स्त्रीबीज चार कारणामध्ये काही बिघाड नसणे. शुक्राणु व डिंबाणु स्वस्थ असावे, शुक्राणु (पुरुष बीज) व डिंबाणु (स्त्रीबीज) यांचा संयोग व्हायला हवे.
स्त्री वंध्यत्वाच्या मुख्य कारणांपैकी 
अनियमित रजःप्रवृत्ती (Irregular menstruation) किंवा रजःप्रवृत्ती न होणे (Amenorrhea), स्त्रीबीज परिपक्व न होणे व बीजकोशाला इजा होणे (Anovulatory cycle), पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS), वंक्षणभागातील अवयवांचा शोथ (PID) गर्भाशयात ग्रंथि होणे (Uterine fibroids), गर्भाशयातील अंतस्त्वचेला (Endometritis) व बीजवाहिनीला शोथ (Salpingitis) त्यामुळे बीजवहनात अडथळा (Tubal obstruction), बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणा (Ectopic pregnancy), शल्यकर्माचे विपरीत परिणिती (Postsurgical complication), गर्भाशय अंतरस्तर अस्थानता (Endometriosis), बीजवाहिनी नलिका अवरोध (Fallopian tubal Block), सहज विकार (Congenital Defects), गर्भधारणक्षमता खालावणे (AMH) विषमता (Hormonal imbalance) ही महत्वाची कारणे बघावयास मिळतात.
या सर्वांवर त्वरित उपचार मिळावेत आणि लवकर गर्भधारणा व्हावी यासाठी रूग्ण आधुनिक चिकित्सा घेतात. परंतु वर वर उपचार करून व्याधीचा नाश होत नाही. आधुनिक चिकित्सेत लाक्षणिक चिकित्सा (symptomatic treatment) घेउन व्याधी मात्र तसाच राहतो आणि बरेचसे दुष्परिणाम शरीरावर आणि मनावर घेउनच रूग्ण आयुर्वेद चिकित्सकाकडे येतो.
एकीकडे आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये अतिशय प्रगत असे चिकित्सा तंत्रज्ञान विकसित होउन देखील या क्षेत्रामध्ये म्हणावा तितका लाभ सर्व रूग्णांना होताना दिसून येत नाही. म्हणूनच शाश्‍वत अशा आयुर्वेद शास्त्राकडे अतिशय आशेने रूग्ण येतात अशावेळी वंध्यत्वात निघून गेलेला बराचसा बहुमुल्य कालावधी, मूळ व्याधी सोबत नव्याने निर्माण झालेले उपद्रव लक्षण, उदर्क, व्याधीसंकर, बहुदोषावस्था, लीनावस्था, दोषांचे आवरण अशा अनेक अवस्थाचे आव्हान घेवून रूग्ण वैदयाकडे येतो.
वंध्यत्वाच्या चिकित्सेमध्ये केवळ वंध्यत्व संबंधित अवयव व केवळ शुक्रवह/आर्तववह स्त्रोतस यांचाच विचार न करता इतर सर्व निगडीत स्त्रोतस, धातू, दोष शरीरातून स्रवणारे संप्रेरके यांचा देखील विचार करून त्यानुसार चिकित्सा केल्यास यश मिळते. त्यासाठी FSH, LH, Prolaction,T3,T4, TSH, AMH (Hormones) विचार महत्वाचा ठरतो.
वंध्यत्वाच्या चिकित्सेसाठी आजकाल केली जाणारी महत्वाच्या तपासण्यापैकी एक AMH (Anti-Mullerian Harmone) आहे. AMH निर्देशांक वंध्यत्वाच्या रूग्णांमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा निर्देशांक स्त्रियांच्या बीजांड कोशमधील बीजनिर्मितीची क्षमता किती शिल्लक आहे हे निर्देशित करतो. अॅंटिम्युलेरियन हॉर्मोन चे प्रमाण बीजकोशाची प्रजनन क्षमता दर्शविते. पेशीविघातक परमाणुंच्या (Free radicals) आघातामुळे व वाढत्या वयामुळे हे प्रमाण खालावत जाते. १.० नॅनोग्रॅम/मि.ली. हे प्रमाण गर्भधारणेसाठी उत्तम समजले जाते. ०.७ ते ०.९ हे मध्यम व त्यापेक्षा कमी असणे हीन समजले जाते. PCOS विकारात मात्र हे प्रमाण विकृत स्वरुपात वाढलेले दिसते.
पी.सी.ओ.डी.च्या रूग्णांमध्ये हेच अधिक वाढलेले सापडते कारण तेथे एकापेक्षा अधिक लहान लहान बीज तयार झालेले दिसतात. परंतु गर्भधारणेस योग्य नसतात. ०.३ ते २.१९ या मात्रेमध्ये कमी प्रजननक्षमता असते व ०.२३ पेक्षा AMH मात्रा कमी असल्यास गर्भ राहण्याची शक्‍यता नगण्य असते किंवा तशी शक्‍यता नसतेच असे आधुनिक शास्त्राचे मत आहे. AMH हा फक्त निर्देशांक आहे. व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती यानुसार बघितले तर बऱ्याचदा वेगवेगळे हेतू असण्याची शक्‍यता असते.
निदानपरिवर्जन केल्याशिवाय चिकित्सा सुरू होत नाही हेच लक्षात ठेवावे. AMH हे किती महत्वाचे आहे आणि त्याचा आयुर्वेदात कसा विचार करायचा हे आपण पाहिलेत परंतु AMH कमी होण्याचे आणखी काही मुख्य कारणे आहेत.
  • वाढते वय
  • सातत्याने अनियमित मासिक पाळी
  • पाळी येण्यासाठी हॉर्मीन्सची औषध घेणे.
  • बीजनिर्मिती होण्यासाठी सातत्याने औषधे घेणे.
  • निसर्गत: एकावेळी एका अंडकोषातुन एकच बीज महिन्याला तयार होते.
दोषधातुमल मूलं ही शरीरम्‌ ।
दोष, धातू, मल संतुलित असताना शरीराचे धारण करतात. या न्यायाने दोष, धातू, मल यांची असंतुलित अवस्था झाल्यास त्याचा निश्‍चितपणे AMH सारख्या संप्रेरकावर परिणाम होतो परंतु जर आहार, विहारावरील नियंत्रण, दिनचर्या, ऋतूचर्या पालन, रजस्वला परिचर्या पालन तसेच पाचन चिकित्सा, नियमित पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी व रसायन चिकित्सा घेतल्यास वाढताना दिसते आयुर्वेदाच्या सिध्दांतानुसार चिकित्सा केल्यास हमखास यश मिळते. परंतु त्यासाठी आधुनिक तपासण्यांची मदत घेतल्यास आपण आयुर्वेदाच्या तत्वांना सोडले असा त्याचा अर्थ होत नाही.
आयुर्वेदात वंध्यत्वाविषयी चिकित्सा सांगितली आहे. आजही त्याचप्रमाणे चिकित्सा केल्यास ते फायदेशीर ठरते असे दिसुन येते. विकृती समजण्यासाठी प्रथम प्राकृत स्थिती काय आहे हे समजणे फार गरजेचे आहे. म्हणजे गर्भ उत्पन्न होण्यास लागणारे घटक कोणते आहेत याची माहिती अवगत करून घेणे नितांत गरजेचे आहे ते पुढीलप्रमाणे –
वंध्यत्वाची कारणे पाहता सर्वात महत्वाचे व मुख्य कारण आहे बीजदुष्टी म्हणजे स्त्रीबीज म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार साधारणतः ७० ते ८० स्त्रियांमध्ये हाच विकार वंध्यत्वाला कारणीभूत असतो.
जी गर्भाचा प्रसव करते ते स्त्री असे असल्याने गर्भनिर्मिती व प्रसव हा स्त्री जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे या सर्वांशी सामाजिक, कौटुंबिक स्वास्थ्य ही निगडीत आहे. त्यामुळे गर्भनिर्मितीचा मूळ घटक म्हणजे ‘स्त्रीबीज’, ह्यासंबंधी आयुर्वेदशास्त्र आपल्याला काय सांगते. हे महत्त्वाचे आहे.
शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी ।
अशा सारख्या सुभाषित किंवा सुवचनांमधून बीजाचे महत्त्व आपल्याला कळते. स्त्री बीज व पुरुषबीज हे गर्भाचे समवायि कारण तर
त्यांचा संयोग हे असमवायि कारण आहे. ‘प्रजासंपत्‌’ निर्माण होण्यासाठी उत्तम प्रतीचे स्त्री बीज व पुरुष बीज आवश्यक आहे.
वंध्यत्वासाठी रूग्ण सर्व रिपोर्टस्‌ घेवून दवाखान्यात येतात, त्यांचे रिपोर्ट बघितले असता. यु.एस.जी. रिपोर्ट नॉर्मल असतात. काहींमध्ये पी.सी.ओ.डी. असल्याचे आढळते. एच.एस.जी. मध्ये दोन्हीही (बीजवाहिनी नाडी चांगल्या) दिसतात. पतीचे सर्व  रिपोर्ट नॉर्मल असतात. परंतु AMH चे प्रमाण value below reference level असे आढळते ज्यामुळे बीजवृध्दी होत नव्हती हे फक्त एक कारण आजकाल बऱ्यापैकी आढळते.
चिकित्सा – शोधन, शमन, त्याचबरोबर आहार, विहार, व्यायाम, दिनचर्या, यांचे नियम समजावून सांगितले जातात.
शमन चिकित्सा
मूळ हेतुपर्यत पोचून संप्राप्तीभंग व निदान परिमार्जन केल्याशिवाय यश मिळत नाही. रूग्ण भरपूर डॉक्टर फिरून येतात. भरपूर औषधे घेतलेले असतात. काहींमध्ये पूर्वीच्या हार्मोनयुक्त औषधीच्या अति सेवनामुळे गुण यायला वेळ लागतो. त्यामुळे काही रुग्णांमध्ये औषध न देता काही दिवस अंतर ठेवून चिकित्सा सुरु करावी लागते.
कोष्ठातच दोषांची उत्पत्ती होते, म्हणुन कोष्ठ चांगला पाहिजे, तेथूनच सार्वदेहिक दोषाचे पोषण होते. आहार पचनातुन धातुंची उत्पति होते म्हणून कोष्ठाचे आरोग्य चांगले पाहिजे.
शोधन – पंचकर्म, बीजशुध्दीसाठी शरीर शुध्दी होणे महत्वाचे
१) वमन– स्त्रीरोगात कफ, वाताची दुष्टी प्राधान्याने असते त्यासाठी वमन पंचकर्म उपयुक्त.
२) विरेचन- बीजातील पित्तप्रधान दोषदुष्टीसाठी विरेचन पंचकर्म उपयुक्त. रक्ताश्रित पित्त असते. रक्तधातु गर्भधारणा पोषणासाठी महत्वाचा त्यासाठी त्याची शुध्दी ठेवण्यासाठी विरेचन योग्य.
३) बस्ति – बस्ति ही अपानवायूची प्रधान चिकित्सा. गर्भाशय, अंडाशय इ. अवयव अपानवायूच्या कार्यक्षेत्रात येतात आणि स्त्रीरोगात वातदुष्टी अधिक असते. मात्राबस्ति, निरूहबस्ति, उत्तर बस्ति पंचकर्म उपयुक्त.
४) नस्य – नाकावाटे घातलेले औषध शृंगाटक मर्मापर्यंत पोहचते व आपले काम करते. गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली मस्तिष्कातील यंत्रणा संतुलित होऊन स्त्रीबीज निर्मितीसाठी आवश्यक हार्मोन्सचे संतुलन योग्य प्रकारे होते.
नासा हि शिरसो व्दारं – या न्यायाने गर्भस्थापक/प्रजास्थापक वनस्पतिचा उपयोग यात केल्याने फायदा होतो.
आधुनिक वैदयक शास्त्रात चिकित्सा करतांना IVF चा पर्याय आहे आणि त्यासह DHEA supplements [Dehydroepiandrosterone], L carnitine यासारख्या औषधींचा वापर केला जातो व त्याचे विपरीत परिणाम शरीरावर व मानसिक स्थितीवर दिसतात. हि चिकित्सा करतांना एकावेळी १० ते १२ बीजांड निर्माण करणारी औषधे दिली जातात. या प्रकारच्या कारणांमुळे बीजकोषावर अतिरिक्‍त ताण पडतो व त्याची बीज निर्मितीची क्षमता कमी होते. परंतु आयुर्वेदात अनेक पर्याय आहेत व त्याद्वारे यशस्वी चिकित्सा केली जाते. त्यासोबत व्यायाम, प्राणायाम, सकारात्मकता याची जोड असेल तर काहीही अशक्य असे रहात नाही. आयुर्वेदाद्वारे AMH निर्देशांक कमी असताना उत्तम गर्भधारणा झालेली आढळते. फक्त विश्‍वास महत्वाचा!
पथ्यापथ्य
संक्षेपत: क्रियायोगो निदान: परिवर्जनम्‌ ।
चिकित्सा सांगायची असल्यास निदान – हेतूसेवन न करणे ही महत्त्वाची चिकित्सा असते. त्यामुळे अग्निदुष्टीकर, वातवृद्धीकर आहारविहार टाळणे आवश्यक आहे.
पथ्य :
१) प्रकृतीनुसार वैद्याने सांगितलेला आहार ठेवावा.
२) रजःस्वला परिचर्या-  पालन करणे. मासिक पाळी सुरु असतांना या काळामध्ये स्त्रीने विशेषणे पातळ, पचनास हलके असा आहार सेवन करणे अत्यंत आवश्यक असते. शिळे पदार्थांचे सेवन टाळावे उदा. फ्रिजमधील रात्रीपासूनचे तयार पदार्थ – कणिक-भाज्या, बिस्किटे इ, अति तीक्ष्ण, उष्ण, लवण अम्ल रसात्मक, विदाही आहार टाळावा उदा. पापड, पाणीपुरी, चायनीज पदार्थ इ. विरुद्ध अन्नाचे सेवन टाळावे. धावपळ करणे, फार मोठे आवाज ऐकणे व श्रमाची कामे करुं नये. दिवसा झोपणे टाळावे, रात्री जागरण वर्ज्य, अतिव्यायाम टाळावा, जास्तीचा वाहन प्रवास करू नये.
३) सूर्यनमस्कार आवश्यक, पळणे, चालणे हेही उपयुक्त
४) कटि व उदराची योगासने – धनुरासन, सर्वांगासन, पश्‍चिमोत्तानासन, भुजंगासन, नौकासन, शलभासन ई.
५) एकाच ठिकाणी खुप वेळ सतत बसणे, जीन्स, घट्ट- स्किन टाईट कपडे टाळावे.
६) अतिचिंता टाळावी. ताण, तणाव, क्रोध, वादविवाद टाळावे. नकारात्मक विचार करू नये. ध्यान, धारणा उपयुक्त
७) विशेषत: AMH कमी असुन अपत्यकांक्षिणी जोडप्यासाठी 
सौमनस्यं हि गर्भधारणानाम्‌। च. सू. २५
मनाची शांत व समाधानी अवस्था गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक असते.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद, पुणे
9175069155

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!