शितपित्त-pitt-uthane-urticaria-ayurvedic-treatment

शितपित्त- अंगावर पित्त उठणे

शितपित्त- अंगावर पित्त उठणे

आपल्यापैकी काहींना कधी ना कधी अंगावर खाज येऊन ‘शितपित्त’, ‘पित्त उठणे’, ‘चट्टे उठणे’, ‘गांधी उठणे’ असा त्रास जाणवला असेल. काहींना तापमान बदल्यावर, घाम आल्यावर, तणाव, चिंता, सूर्यप्रकाशात गेल्यावर, आणि गरम-थंड पाण्याचा संपर्क झाल्यावर, पित्त वाढल्यामुळे, शरीरातील इतर काही आजारांमुळे एखाद-दुसर्‍या वेळा असा त्रास होतो, तर काही लोकांना ऋतू बदलल्यावर, खूप दिवस सातत्याने किंवा काही महिन्यांपासून वर्षापर्यंत टिकू शकतो. तर काहींमध्ये जन्मतःच असलेल्या ऑटोइम्यून डिसऑर्डरमुळे सातत्याने हा रोग त्रास देताना आढळतो.

सामान्यत: या त्रासाला ऍलर्जी म्हणतात, हे चट्टे 24 तासांच्या आत कोणत्याही डागाशिवाय, जखमेशिवाय कमी होतात. पापण्या, ओठ आणि जीभ यासारख्या भागातील श्लेष्मल त्वचेचा सहभाग हा या पित्ताचाच एक गंभीर प्रकार असतो.

आयुर्वेदात या लक्षणाने आढळणारे

  1. शीतपित्त प्रामुख्याने ‘वात’ दोष लक्षणांसह
  2. प्रबळ ‘पित्त’ लक्षणांसह ‘उत्कोठ’
  3. ‘कफ’ लक्षणांसह ‘उदर्द’.

या रोगाचे नाव शीतपित्त कसे ? असा प्रश्न पडू शकतो. ‘उष्णता’ हा पित्ताचा गुण असतो. ‘शीत’ या गुणामुळे वाढलेले वात-कफ दोष आणि स्वकारणांनी वाढलेला पित्त दोष एकत्र येऊन त्वचेवर व्यक्त होतात. म्हणून याला ‘शीतपित्त’ म्हटले आहे. थोडक्यात, शीत हे पित्ताचे विशेषण नसून पित्तासोबत शीत गुणात्मक अशा कफ व वात यांचा अनुबंध असतो. हा रोग एकट्या पित्त दोषामुळे होत नाही हे लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

शीतपित्त कसे उत्पन्न होते –

हा रोग कसा होतो, याची प्रक्रिया वर्णन करताना ‘शीतमारुत संस्पर्शात् ।’ असे वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. याचा अर्थ, त्वचेवर थंड वारा सतत येत राहिल्याने असा त्रास होतो. व्यवहारातसुद्धा AC मध्ये काम करणारे, गाडीवरून सतत प्रवास करणारे यांना हा त्रास जास्त प्रमाणात होताना आढळून आलेला आहे. या थंडाव्यामुळे शरीरातील वात-कफ दोष बिघडतात. या शिवाय पित्त दोष वाढवणारी / बिघडवणारी कारणे घडत असतील, जसे अवेळी जेवणे, तेलकट – तिखट – मसालेदार पदार्थ (चायनीज, फास्ट फूड, इ.), जेवल्यावर लगेच झोपणे, जागरण करणे अश्या अनेक कारणांनी पित्त वाढते. असे बिघडलेले त्रिदोष त्वचेच्या बाहेर आणि आत पसरून लक्षणे निर्माण करतात.

प्रकुपित झालेला वातदोष व कफदोष हे पित्त दोषाला आपल्यासोबत मिसळून जेव्हा त्वचेच्या ठिकाणी येतात त्यावेळी त्वचेवर मंडल किंवा चट्टे दिसतात.

शीतपित्तामध्ये गार वारा, वेग धारण करणे यामुळे कफ आणि वाताचा प्रकोप होऊन यासोबत पित्त दोष यांचा संसर्ग झाल्यामुळे हे वाढलेले पित्तदोष वातामुळे शाखांकडे पसरले जाऊन म्हणजेच पोटातून बाहेर निघून त्वचेवर विविध ठिकाणी चट्टे उत्पन्न करते यांमध्ये प्रामुख्याने टोचणे हे लक्षणे अधिक असते याला शितपित्त असे म्हणतात.

ज्या वेळेस वरील कारणानेच कफाचा प्रकोप अधिक होऊन जो पित्तदोष त्वचेवर विविध ठिकाणी मंडल उत्पन्न करतो आणि या मंडलामध्ये कंडू किंवा खाज जास्त असते याला उत्कोठ असे म्हणतात.

शीतपित्त लक्षणे –

रुग्ण ज्याला अंगावर पित्त उठले / ऍलर्जी असे म्हणतो, ती एक विशिष्ट प्रकारची सूज असते. एखादी माशी / गांधीलमाशी चावल्यावर अंगावर ज्या स्वरुपाची मंडळे / सूज येते, अगदी तशाच प्रकारची सूज या आजारात रुग्णाच्या अंगावर उठते. त्या सोबत ‘खूप खाज’ हे महत्त्वाचे लक्षण दिसून येते. त्या ठिकाणी टोचल्यासारखे वाटणे, जळजळणे ही शीतपित्ता मध्ये प्रमुख लक्षणे आहेत.

याशिवाय या सोबत तहान लागणे, तोंडाला चव नसणे, मळमळल्यासारखे वाटणे, अंग दुखणे अशी लक्षणेही दिसतात. क्वचित स्वरूपी काही रुग्णांमध्ये तापही जाणवतो.

जिथे सूज असते त्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे वेदना आणि आगही जाणवते. काही रुग्णांमध्ये खाज, सूज ही लक्षणे अचानक मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि अचानक मावळूनही जातात. काही रुग्णांमध्ये ही लक्षणे खूप वेळ टिकतात. काही वेळा त्वचेवर एका ठिकाणची सूज मावळेपर्यंत दुसरीकडे सूज येते.

वेळेवर योग्य औषधोपचार केले नाहीत, तर बर्‍याच वेळा हा त्रास वरचेवर होऊ लागतो. काहींना रोज, दिवसातून ठराविक वेळी किंवा कधीही अशी खाज आणि सूज दिसून येते. रोगाने असे त्रासाचे चिवट स्वरूप आलेला रुग्ण  ‘चट्टयामुळे – खाजेमुळे बाहेर कुणाकडे जायला लाज वाटते’ असे हमखास सांगतो. म्हणुनच वेळीच आयुर्वेद औषधोपचार करणे चांगले.

दाह, जळजळणे हे दोन्ही प्रकारच्या रुग्णांमधे समान असते. चिकित्सेचा विचार करताना अंगावर पित्त असेल तरीही ज्यांना टोचल्यासारखे वाटते त्यांची व ज्यांना खाज आहे अशांची चिकित्सा ही वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते.

urticaria hives shitpitta pitti khaj yene treatment upay upachar

शीतपित्त चिकित्सा –

  • बहुतेक लोक खाज कमी करण्यासाठी औषध सेवन करतात तरीपण अशा रूग्णामध्ये खाज सुटणे चालुच असते.
  • आयुर्वेदिक उपचारामधे शीतपित्तामध्ये मूळ उपचार करताना रक्ताश्रित पित्तामध्ये उष्ण, तीक्ष्ण गुणांची वाढ झाल्यामुळे जे त्वचेच्या खाली असलेल्या पेशींना बिघडवून चट्टे उत्पन्न करते, या पित्ताच्या वाढलेल्या गुणांवर चिकित्सा करून कायमस्वरूपी उपचार मिळण्यासाठी आयुर्वेदीक औषध उपचार मदत करतो.
  • शितपित्त, उत्कोठ, कोठ, उदर्द या प्रत्येक प्रकारच्या अंगावर पित्त उठण्याच्या उपचार वेगळ्या पद्धतीने केला जातो.
  • ‘शीतपित्त’ म्हणजे अंगावर पित्त उठण्याचे उपचार करताना त्याच्या पार्श्वभूमीला विशेष महत्त्व आहे. व्यवहारात घरगुती उपचार करताना सर्वसाधारणपणे पित्तशामक उपचार केले जातात.
  • जसे आमसूल अंगावर चोळणे, कोकम सरबत पिणे, इ. परंतू, आपण आधी जी माहिती पाहिली त्यानुसार हा केवळ पित्ताचा व्याधि नाही; तर यात वात आणि कफ दोष सुद्धा बिघडलेले असतात. म्हणुनच घरगुती औषधांनी जरी त्रास तात्पुरता थांबत असला, तरी ज्यांना वारंवार असा त्रास होतो, त्यांना असे घरगुती उपचार पुरेसे नसतात.
  • आयुर्वेद हे संपूर्ण शास्त्र आहे. आणि चिकित्सेच्या दृष्टीने यात सर्व बाजूंनी विचार केला जातो. म्हणुनच केवळ लक्षणे थांबवणे(खाज कमी करणे) एवढाच उपचाराचा हेतू नसून रोग मुळापासून नाहिसा करणे, शरीरातील दोषांमध्ये बदल घडल्यामुळे हा त्रास होतो, ते मुळापासून दुरुस्त करणे,  हे आयुर्वेदात खरे ध्येय मानले जाते.
  • याशिवाय, जुनाट शितपित्ताच्या रूग्णांमधे पोटाचे आजार, जुनाट अम्लपित्त, जंतांचा त्रास, थायरॉईड विकार, तीव्र ताण ई.साठी उपचारांची आवश्यकता असते.
  • ‘अभ्यङ्ग: कटुतैलेन स्वेदश्चोष्णेन वारिणा ।’
  • म्हणजेच, तिखट चवीच्या औषधीने युक्त तेल अंगाला लावणे व गरम पाण्याने शेक घेणे हे बाहेरून करायचे उपचार उपयुक्त आहेत. दुर्दम्य लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी, रुग्ण परीक्षणावरून दोषांच्या अवस्था लक्षात घेऊन शरीर शुद्धिकरण प्रक्रिया- पंचकर्म चिकित्सा आवश्यक असते जसे वमन, विरेचनबस्तीरक्तमोक्षण वगैरे वापरता येते. बिघाड कमी प्रमाणात असेल, तर पंचकर्म न वापरतासुद्धा केवळ पोटात घ्यायच्या औषधांनीही रोग पूर्णपणे बरा होतो.
  • शीतपित्त हा जीवघेणा आजार नक्कीच नाही. मात्र हा त्रास वरच्यावर होत असताना केवळ वरवर / तात्पुरती औषधे घेत राहून हा रोग कधीच बरा होत नाही; उलट हळूहळू याचे प्रमाण वाढतच जाते. म्हणुनच आपल्याला हा त्रास कसा झाला हे वैद्याकडून समजून त्यानुसार आहार विहारातील बदल, योग्य औषध व शोधन उपचार आवश्यक असते.
  • आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी जेवढे औषधांना महत्त्व आहे, तेवढेच पथ्य पाळण्यालाही आहे. कारण आपल्या खाण्यापिण्यात किंवा इतर सवयींमध्ये चुका असल्याशिवाय आजार होणारच नाही.
  • नव्या शीतपित्ताच्या त्रासासाठी बहुतेक रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांचा वापर करून चार ते सहा महिन्यांत पूर्णपणे उपचार केले जातात. काहीना तर जुनाट शीतपित्ताच्या त्रासासाठी योग्य उपचारांसाठी एका वर्ष लागतो. ऑटोइम्यून डिसऑर्डर असलेल्या रुग्णांना दीर्घ कालावधीसाठी सतत उपचारांची आवश्यकता असू शकते.
  • उपचारांचा लवकर गुण येण्यासाठी सर्व कारणांचे अचूक निदान आणि ओळख अत्यावश्यक आहे. जीवनशैलीत योग्य बदल करणे आणि पुनरावृत्ती थांबवण्यासाठी माहित असलेले चुकीचे आहार विहार टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे.
  • शीतपित्ता मध्ये प्रामुख्याने कुळथीचा सूप, कारल्याची भाजी, आंघोळीसाठी व पिण्यासाठी गरम पाणी वापरणे हे पथ्यकर आहे याशिवाय आग होत आहे म्हणून थंड पाण्याने आंघोळ, थंड हवा किंवा थंड पाणी यांचे सेवन करणे हे चुकीचे आहे.

कोणताही आजार हा आपल्या आहार विहारातील चुकीशिवाय होणार नाही म्हणूनच कोणत्याही रोगामध्ये पथ्यापथ्य पाळणे आवश्यक आहे. नुसते औषधांवर अवलंबून राहणे चुकीचे आहे आणि औषध फक्त आजार बरा करतात, रोग न होऊ देणे हे सर्वस्वी आपल्या सवयींवर अवलंबून असते. एकीकडे वैद्याकडून औषध घ्यावे व सोबत चुकीचे खाणे पिणे वागणे सुरु ठेवल्यास रोग बरा न होता तसाच राहतो.

वैद्य.हर्षल नेमाडे

वेदाकेअर आयुर्वेद

9175069155

best-ayurvedic-clinic-in-aundh

संपर्क

9175069155

वेळ

सोम -शनी
10.00-2.00
06.00-8.30

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2 thoughts on “शितपित्त- अंगावर पित्त उठणे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!