बस्ति-आरोग्याचं प्रवेशद्वार

बस्ति-basti-panchakarma-treatment
आयुर्वेदीय ग्रंथ अष्टांगहृदयात सूत्र स्थानामध्ये पहिल्या अध्यायात वातदोष चिकित्साविषयक मूलगामी सूत्रे सांगितले आहे.
शरीरजानां दोषार्णां क्रमेण परमौषधम्‌ ।
बस्ति विरेको वमन तंथा तैल घृतम्‌ मधु ।।
वातदोषावर बस्तिचा उपयोग व वात दोषावर तेलाचे महत्व सर्वश्रुत आहेच. वात दोषाचे नित्य जीवनात, शरीर व्यापारात महत्व अनन्य साधारण आहे. त्याचे साम्य ठेवण्याकरीता प्राकृत राखण्याकरीता बस्ति चिकित्सा ही महत्वाची आहे. ती टाळून चालणार नाही, जुन्या काळात मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना स्वस्थावस्थेत मधून मधून बस्ति देण्याची प्रथा होती. बस्तिद्वारे शरीरशुद्धी सहजतेने केली जात असे.
वर्षा ऋतुमध्ये बस्ति उपचार वातदुष्टी होऊ नये म्हणून स्वस्थासाठी प्रतिवर्षी केली जाते. आज जे व्याधी इतर कोणत्याही अत्याधुनिक उपचारानी आटोक्यात येत नाही, ते व्याधी वायूस नियत्रित करणार्‍या बस्तिमुळे होऊ शकतात. जेव्हा अनेक वर्षाची डोकेदुखी २-३ बस्तींनी जेव्हा कायम नाहीशी होते त्यावेळी वैद्यास व रूग्णास दोघांनाही त्याचे संमाधान मिळते व रुग्णांस आपण यापूर्वीच असे उपचार करावयास पाहिजे होत असे वाटते.
आहार पचनाच्या अंतिम अवस्थेमध्ये कटुविपाक अवस्थेमध्ये पक्वाशयात वायुची उत्पत्ती होते. पक्वाशय हे वायुचे उत्पत्तीस्थान व वायूचे प्रधान स्थान आहे. जर याठिकाणी चिकित्सा केली तर वात दोषनियंत्रणात राहू शकतो. चुकीच्या आहार विहाराने वात दोष प्रकोपित झाल्यास मूळ स्थानीच त्याची चिकित्सा करणे युक्‍ती- तर्कसंगत व निश्चितच फलदायी आहे. म्हणूनच पक्वाशयात बस्ति द्वारे दिली जाणारी औषधे त्याच ठिकाणी वातशमन, वातशोधन व वात दोषावर नियंत्रण ठेवतात. वात दोष नियंत्रणात असल्यास अन्य दोषाचे देखील आपोआप नियंत्रण राहते. बस्ति पक्‍वाशयात दिला जातो. अन्नपचन पक्‍वाशयात पूर्ण होते. अन्नपचन पूर्ण झाल्यानंतर तो आहाररस हा वायुमार्फतच सर्व शरीरात पसरविला जातो म्हणजे वायुकडून आहार किंवा औषध हे सर्व शरीरात जात असते.
शरीरात असणाऱ्या वाताच्या पाच प्रकारांपैकी मात्र अपान वायुचेच बस्तिद्वारे शोधन होते. अर्थात्‌ बस्तिचिकित्सा द्वारे वातदोष व त्याद्वारे अन्य दोषावर बस्तिद्वारे नियंत्रण ठेवता येते व व्याधी प्रशमन करता येते. म्हणुनच बस्ति चिकित्सा ही केवळ वातदोषाची वातव्याधीची चिकित्सा नसून त्याबरोबरच सर्व व्याधीची देखील चिकित्सा आहे. विविध व्याधीमध्ये उत्तम व निश्‍चित असे यश देणारी अशी बस्ति चिकित्सा आयुर्वेद चिकित्सापद्धतीत सर्वश्रेष्ठ मानली जाते.

बस्ति पंचकर्म चिकित्सा:-

बस्ति कर्म हे स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचनादि सर्व कार्याच्या अपेक्षेने श्रेष्ठ आहे. ह्याचे कारण असे की स्नेहादी कर्माची उपयोगिता मर्यादित आहे. पण बस्ति ही व्यापक स्वरूपाची आहे. प्रायः सर्व लोकांची कल्पना अशी असते की बस्ति म्हणजे एनिमा. व्यवहारातील हा भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधर्म्यामुळे हा गैरसमज झालेला आहे. परंतू बस्तिला आधुनिक वैद्यक शास्त्राचा एनिमा समजणे ही मोठी चूक आहे. बस्ति व एनिमा यात फरक आहे, दोन्ही एकच नाहीत. बस्तिच्या अनेक प्रकारामधील एक प्रकार एनिमा होऊ शकतो. परंतू बस्ति कर्म एनिमाच्या अंतर्गत येऊ शकत नाही. सामान्यतः एनिमा केवळ मलनिष्कासनासाठी वापरला जातो.
शरीरातील अजीर्ण अग्निमांद्य नष्ट्य करूनच पोट, मांड्या व पाठ, मांड्या याठिकाणी औषधी सिद्ध तेल लावून तेल लावलेल्या ठिकाणी विशिष्ट औषधीसिद्ध काढ्याने शेक करून पोटामध्ये औषधी सिद्ध स्नेह पदार्थ,तेल,काढे,दूध,तूप गुदमार्गाद्वारे घेणे अशा पद्धतीने बस्ति चिकित्सा करावयाची असतो.
बस्ति चिकित्सेचे अनेक प्रकार अधिष्ठान भेदाने, द्रव्यभेदाने, कर्मभेदाने, संख्याभेदाने ग्रंथात वर्णन केले आहेत. त्याचा विचार बस्ति केवळ वात दोष किंवा वातव्याधीवरच प्रयुक्त करण्यात येते असे नसून हि सर्वदोषांवर, धातुंवर, विविध व्याधींवर, स्थानावर, आशयांवर, स्रोतसांवर उपयुक्त, गुणकारी अशी बस्तिचिकित्सा आहे. रोग्याचे बल, दोषांचे बल, रोगाला व रोग्याला प्राप्त होणारे कालबल, रोग व रोगी याची प्रकृति या सर्व बाबींचा विचार करून त्या त्या औषध द्रव्यांनी युक्‍त अशी बस्ति चिकित्सा दिली गेली तर त्या त्या औषध साध्य विकारांवर बस्तिचा उत्तम उपयोग होतो.
panchakarma-clinic-in-aundh
बस्ति हा गुदमार्गाने दिला जात असल्याने त्याचे कार्यक्षेत्र मुख्यतः गुद गुदपरिसर मोठे आतडे व नंतर छोटे आतडे नाभि – नाभिपरिसर असे असते. जेव्हा फक्त मोठ्या आतड्याचे परिसरात व त्यासंबंधीचे वायूचे दोष बिघडले असतात, तेव्हा बस्तिच उत्तम व नेमके त्याभागात जाऊन आपले कार्य करतो. गुदमार्गाने दिलेले बस्ति द्रव्य, गरम पाणी किंवा विशिष्ट औषधांच्या काढ्याने किंवा तेलादी स्नेहांनी आतड्यात जाऊन आतून तो भाग शेकला जातो. तूप, तेल, दूध यांचे भांडे किंवा ज्यात तुपासारखा चिकट पदार्थ चिकटलेला असतो, ते भांडे इतर भांड्यात न ठेवता वेगळे ठेवले जाते. साध्या पाण्याने ते स्वच्छ होत नसते. त्यात गरम पाणी टाकून ठेवावे लागते, त्यामुळे सतत गरम पाण्याच्या स्पर्शाने शेकले जाऊन भांड्याचा चिकटपणा सैल होऊन सुटतो सहज मोकळा होतो आणि भांडे सहज घासुन स्वच्छ साफ होते. हीच प्रक्रिया बस्तिने आतड्यात घडते, तेथे शेकले जाऊन मलांचा चिकटा (साममल) कफादी अन्य दोषांचा साठा सहजतेने सुटतो. त्याने अडवून असणारा वातदोषही मोकळा होऊन आपल्या मार्गाने जाऊ लागतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा थंड स्पर्शाचे बस्तिही द्यावे लागतात.
बस्ति चिकित्सा शीघ्रसुख -विशोधित्वात्‌, आशु अपतर्पण तर्पण योगात्‌, निरत्ययत्वात अर्थात्‌… अनुपद्रव असल्या कारणाने उत्तम चिकित्सा आहे
मूलोनिषिक्तोडियथादुमःस्यात्‌. नीलच्छदः कोमल पल्लवाग्रयः
कालेमहानपुष्पफलप्रदश्व तथानरःस्वांदनुवासनेन
ज्याप्रमाणे झाडाच्या मूळाशी पाणी शिंपडले असता तो वृक्ष कोमल पल्लवांनी युक्‍त होतो. तसेच गर्द असा होतो आणि योग्य काळी फळ व पुष्प देणारा होतो. त्याप्रमाणे बस्ति विशेष करून अनुवासन बस्ति दिल्याने मनुष्य टवटवीत होतो.
बस्तिद्वारे दिलेले द्रव्य हे पक्‍वाशयातच राहते व कालांतराने ते मलाबरोबर बाहेरही पडते. असे असतांना त्या औषध द्रव्यांनी दोष शमन किंवा रोगनाशन कसे होत असेल तर साहेड गून मुलाना
आपादतलमूर्धस्थान् दोषान् पक्वाशये स्थितः|
वीर्येण बस्तिरादत्ते खस्थोऽर्को भूरसानिव ||  च.सि. ८ – ६४
how-basti-panchakarma-works
आकाशांतला सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवरील जलांश शोषुन घेतो. त्याप्रमाणे पक्वाशयात दिलेला बस्ति पायापासून डोक्यापर्यंत पसरलेल्या दोषांना खेचून बाहेर काढतो. 
ह्यानुसार बस्ति पक्‍वाशयात राहून सुद्धा रोगनाशनाचे कार्य करतो. येथे औषध हे स्ववीर्याने कार्य करते असे स्पष्टपणे दिसते.
पक्वाशयातून बस्तिचे वीर्य प्रभाव, स्त्रोतसाच्याद्वारे संपूर्ण शरीरामध्ये अशा प्रकारे पसरतो की, ज्या प्रमाणे वृक्षांच्या मुळाशी टाकल्या गेलेल्या जलाची शक्ति संपूर्ण वृक्षामध्ये पसरते.
हाच बस्ति केवळ, किंवा मलासह बाहेर येतो परंतु त्याची शक्ति उदान, अपान, व्यान आदिंच्याद्वारे संपूर्ण शरीरामधील दोषांना निर्हरण करते.
ज्याप्रमाणे सूर्य आकाशांत राहून भूमीवरील रसांना ओढतो त्याचप्रमाणे पक्‍वाशयातील बस्ति पृष्ठ कटि, कोष्ठ इ.सर्व ठिकाणी संचित दोषांना आपल्या वीर्याद्वारे ओढून मुळापासून शरीराबाहेर काढतो, अनेक तऱ्हेच्या द्रव्यांच्या योगाने बिघडलेल्या दोषांना आळा बसून त्याचे प्रशमन होते.
शुक्रहीन झाले असेल तर बस्ति चिकित्सेने ते प्रमाण वाढविता येते. कृशांना पुष्ट करते,तसेच अग्नि, बल, वर्ण, धारणाशक्ति, स्वर, आयुष्यांना हितकारक आहे. दोष धातु जरी संमिश्र स्थितीत असले तरी शरीरातील बिघडलेल्या दोषांना फक्त नष्ट करते.धातूचा नाश करीत नाही. विधिपूर्वक याच्या सेवनाने रसायन सेवनाचे लाभ होतात.
बस्तिद्वारे दिलेले औषधी द्रव्य जेवढा वेळ शरीरात असेल तेवढा वेळ कार्य करेल. त्यामुळे निरुहाद्वारे दिलेले द्रव्य जास्तीत जास्त ४५ मिनिट जरी शरीरात राहीले तरी पुरे आहे. किंबहुना २ तासापेक्षा जास्त राहीले तर व्यापद निर्माण करते असा उल्लेख आहे. बस्तिद्वारे दिलेल्या द्रव्याचे कार्य वीर्यामुळे होते.
औषधीसिद्ध स्नेह, स्नेहयुक्त काढा, एका नलिकेद्वारे गुदात सोडुन गुदमार्गाने पक्वाशयात जाऊन तेथील साठलेल्या मळाला दोषांना शरीराबाहेर काढेल एवढा वेळ औषध तेथे राहील अशा काळजीने दिलेला एक उपचार आहे. यामुळे पक्वाशय आदि अवयव आतून स्वच्छ करण्याचे कार्य करते.
ही चिकित्सा गुदमार्गाच्या अतिरिक्त मूत्रमार्ग तसेच योनीमार्गाने गर्भाशयात औषधी प्रविष्ट केला जाते. मूत्रमार्ग आणि योनीमार्गानें दिलेल्या बस्तिला उत्तर बस्ति असेही म्हणतात. इतकेच नव्हे तर व्रणातही व्रणमुखाद्वारे बस्ति दिला जातो, यास व्रण बस्ति असेही म्हणतात. सामान्यतः बस्ति हा शब्द सर्वच प्रकारच्या बस्तिकरीता प्रयोगात आणतात. ज्यामध्ये निरूह, अनुवासन, उत्तर बस्ति आदिचा समावेश आहे.
बस्ति ही वात विकारावरील एकमेव श्रेष्ठ चिकित्सा आहे. ही चिकित्सा ८० वात विकारांना नष्ट करीत असल्याने बस्तिची चिकित्साही संपूर्ण वैद्यक चिकित्सेचे अंग मानले जाते, याचे कारण पित्त, कफ, याच्यासह मुळापासून पुरीषमलाला नाहीसे करण्याचे कार्य घडते. एवढेच नव्हे तर रक्‍तदोषात, दोषाच्या संसर्गात आणि सान्निपातात देखील ही चिकित्सा लाभदायक ठरते,

बस्ति चिकित्सेचे गुण:-

यद्वत् कुसुम्भसम्मिश्रात्तोयाद्रागं हरेत् पटः|
तद्वद्द्रवीकृताद्देहान्निरूहो निर्हरेन्मलान् ||  च सि. ८-६५
ज्या प्रमाणे कुसंभपुष्ययुक्त जलात वस्त्र ठेवल्यास ते रंगीत होते पण पाण्याचा त्याग करते. त्याप्रमाणे शरीरातील सर्व मलांना (दोषांना ) बस्ति बाहेर घालवून देते. त्यांचे शमन करते पण प्राकृत रस रक्त इ धातूना कोणतीच इजा करीत नाही.
आयुर्वेद चिकित्सेमध्ये पंचकर्माला एक महत्त्वपूर्णं स्थान आहे आणि पंचकर्मामध्ये बस्ति चिकित्सेला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. बस्ति चिकित्सा ही आयुर्वेदाच्या सर्व चिकित्सा जगतात अशी देणगी आहे की जी आपल्या गुणांनी आणि उपयोगितेमुळे अत्यंत गौरवास्पद स्थान विभूषित करते. वात, पित्त, कफ, रक्‍त दोषांच्या संसर्ग प्रकोप, तसेच सन्निपातामध्ये बस्ति पक्वाशय, कटिप्रदेशी आणि नाभीच्या अधोभागाच्या चारही बाजूनी थांबते.

बस्ती पंचकर्म फायदे :-

  • वातप्रधान व्याधी व मुख्यत वातदोषावर कार्य होते.
  • पाठीचा मणका आणि त्यावर परिणाम करणारे शरीरातील सर्व घटकांच्या आजारात बस्ति उपचार उत्तम उपयोगी पडते.
  • वातविकार जसे कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, स्लीपडिस्क, कॉर्ड कॉमप्रेशन, गृध्रसी वात, हात पाय वळणे, फ्रोझन शौल्डर, टेनिस एल्बो.
  • त्वचा विकार.
  • पोटाचे आजार, पित्ताचे विकार.
  • गर्भाशयाचे आजार, वंध्यत्व, शुक्रदोष, आर्तव विकार, स्तन्यनाश,जीर्णज्वर, शुद्ध अतिसार, तिमिर, नेत्ररोग, पडसे, शिररोग, अधिमंथ,अर्दित, आक्षेपक, पक्षाघात, एकांग रोग ,सर्वांग रोग; आध्मान, उदर, हृदग्रह, मन्याग्रह, हनुग्रह, मूढगर्भ, इत्यादी याच प्रमाणे वात, पित्त, कफ, रक्त संसर्ग आणि सन्निपात यामध्येही हितकारक आहे.
पोटातले मल,दोष, आंव, इ चा साठा किंवा संचय किती जुना किंवा जुनाट आहे हेही बघून लक्षात घेणे आवश्यक असते. पोटाला हलके वाटणे, मल, आव इ.निघून जाणे, शूलादि दोष कमी वा मंद होणे ही लक्षणे बस्ति दिल्याने रूग्णाला जाणवली व वैद्याला आढळली पाहिजेत. दोषांचा संचय जितका जुना व जितका अधिक प्रमाणात असेल तितका अधिक कालावधी रोग बस्तिने बरा होण्यासाठी लागतो.
शरीरात वात दोष हा कफ व पित्त या दोन दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो. अशा वात दोषासाठी औषधी तेल हे अंत:बाहय वापरणे गरजेचे असते. यापन बस्ति, लेखन बस्ति, बृहण बस्ति असे निरनिराळे बस्ति शरीरातील अनेक विकारांना आयुर्वेदात सांगितले आहेत.
बस्ति उपचाराचा दुसरा फायदा म्हणजे कोणत्याही आजारात बस्ति उपचार केल्यामुळे हृदय, मस्तिष्क आणि वृक्क या तीन मर्मांचे आरोग्य आपोआपच सुधारले जाते. याची गरज कमी जास्त प्रमाणात पस्तीशीच्या नंतरच्या प्रत्येक व्यक्तीस भासते. या बस्तिमुळे हार्ट अटॅक, मेंदूत रक्तस्त्राव, पक्षघात, किडनी यासारख्या दुर्धर व्याधी भविष्यात उत्पन्न न होण्याची व्यवस्था आपोआपच होते. या फायद्यासारखा लाभ क्वचितच इतर उपचारांनी मिळू शकतो. रुग्णास असलेली लक्षणे कमी करण्यासाठी बस्तिचा कोर्से करणे आवश्यक असते.
कफज वात संसर्गित व्याधींनी बरे होण्यासाठी १ ते ३ बस्ति द्यावे लागतात. पित्त – वात विकारांचा उपशय होण्यासाठी ५ ते ७ बस्ति आणि वातप्रधान व्याधीसाठी ९ ते ११ बस्ति कमीत कमी द्यावे लागतात. व्याधी जर नवीन झालेला असेल तर योगबस्ति नावाचा बस्तिचा कोर्स पूर्ण करावा लागतो. मध्य वय व २-३ महिन्यापासूनच्या व्याधी असतांना एकूण १५ बस्ति निरुह अधिक आस्थापन घ्यावे लागतात. १ वर्ष जुना किंवा त्या पूर्वीचा जुनाट व्याधी असता २१ / ३० बस्तींचा कोर्स घ्यावा लागतो.
जसे आजकाल काही औषधांचे कोर्सच घ्यावे लागंतात, हीच नेमकी कल्पना वरील कालबस्ति कर्मबस्ति व योगबस्ति या तिन्ही शास्त्रोक्तं बस्ति बाबत आहे. व्याधीबल कमी होण्यासाठी व व्याधी पुन्हा न होण्यासाठी असे बस्तिचे पुर्ण कोर्सच ग्रंथात सांगितले आहेत.
बस्ति उपचारामध्ये दुखणं,खुपणं, पथ्य, पाणी आणि वेळेचा अपव्यय या गोष्टी फारश्या घडत नाहीत. रुग्ण इतर आजारांसाठी बस्ति घेण्यासाठी येतो आणि त्याचा बल, वर्ण, स्मृती तसेच इतर शरीर मानस भावामध्ये अमुलाग्र बदल होऊन शरीराचा कायाकल्प होतो.
वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

3 thoughts on “बस्ती – आरोग्याच प्रवेशद्वार”

  1. Pingback: BASTI - GATEWAY TO HEALTH

  2. Pingback: शितपित्त- अंगावर पित्त उठणे - www.harshalnemade.com

  3. Pingback: स्त्री वंध्यत्व – www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!