प्रकृति म्हणजे “स्वभाव”
आयुर्वेदामध्ये मनुष्याच्या शरीर बलाच्या व एकूण स्वास्थरक्षणार्थ प्रकृतिची परीक्षा करावी असे ग्रंथात सांगितले आहे. प्रकृति ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते किंवा प्रत्येक मनुष्याची प्रकृति भिन्न भिन्न असते.
काहींना तब्येतीची नेहमी काही ना काही तक्रारी चालू असतात, तर काहींची तब्येत निरोगी असते. मनुष्या मनुष्यांमध्ये हे एवढे वैविध्य कशामुळे असते? तर ते प्रकतिमुळे ! प्रत्येकाची एक स्वतंत्र अशी प्रकृति असते. ज्यावरुन त्यांच्या शरीराची ठेवण, आवडी निवडी, ताण सहन करण्याची क्षमता सहत्व-असहत्व, मानसिक विशेष इ. ठरत असतात.
प्रकृति ही वात-पित्त कफ दोषांच्या कमी-जास्त प्रमाणावर ठरत असते. मातेच्या शरीरामध्ये गर्भधारणा होत असतांना मातृबीज व पितृबीज यांच्यामध्ये वात, पित्त, कफ यापैकी जी दोषस्थिती असेल त्यानुसार म्हणजे त्या कमी-जास्त प्रमाणातील दोषस्थिती नुसार मनुष्याची प्रकृति ठरते.
आपली प्रकृति जाणून घेऊन त्या अनुकूल आहार विहार ठेवल्यास आजारांपासून नक्कीच लांब राहता येईल. आयुर्वेदानुसार शरीराच्या स्वास्थ्याच्या स्थितीला किंवा रोगस्थितीला तीन दोष वात, पित्त व कफ हेच कारणीभूत असतात. शरीरातील सर्व हालचाली ते नियंत्रित करतात व जर दुषित झाले तर तेच आजार देखील निर्माण करतात.
गर्भ निर्माण होत असतानाच पुरुषबीज व स्रीबीज यांच्या संयोगाच्या वेळी वात,पित्त,कफ यापैकी जो दोष उत्कट असतो त्यावरुन त्या व्यक्तीची प्रकृति ठरते. यात जरीही एक दोष इतरांपेक्षा अधिक वाढलेला किंवा उलट कमी झालेला असला तरी तो गर्भाला हानी पोचवणारा नसतो.
वात हा रुक्ष (कोरडेपणा), लघु (हलकेपणा), चल (चंचलता), शीघ्र (त्वरीत काम करणारा), शीत (थंड), परुष (खरखरीत) या गुणांचा असतो.
पित्तदोष हा उष्ण, तीक्ष्ण, द्रव, व विशिष्ट गंध असणारा असतो.
कफदोष हा स्निग्ध, जड, मंद, स्थिर, या गुणांचा असतो.
दोषांचे हे गुणच शरीराची आणि मनाची जडण घडण ठरवतात. उदा. सत्व, रज आणि तम हे तीन मानस गुण आहेत. दैनंदिन जीवनात या मानस गुणाचा प्रकृतिवर परिणाम होतो. उदा. सत्व गुण हा बुध्दिमत्ता, स्मृती, ज्ञानग्रहण क्षमता ठरवणारा, रजोगुण हा शरीरात उत्साह, चंचलत्व आणणारा तर तमोगुण हा जडता, मंदत्व, आळशीपणा असणारा गुण आहे.
वात दोष प्रकृति
- या व्यक्तीने नियमित तैल लावून स्नान करावे.
- विशेषत: पावसाळ्यात स्नेहन – स्वेदन व बस्ति उपक्रम करावेत.
- कमी जास्त होणाऱ्या भूकेच्या अंदाजाने गोडसर, खारट व आंबट पदार्थ खाण्यात ठेवावेत.
- सुखाने निद्रा घ्यावी, सततची धावपळ टाळावी.
पित्त दोष प्रकृति
- या व्यक्तीने नियमित तूप खाण्यात ठेवावे.
- विशेषत: शरद ऋतूत स्नेहन, स्वेदन व विरेचन उपक्रम करावेत.
- खाण्यात तीक्ष्ण व सतत असलेल्या भूकेच्या अंदाजाने गोड, कडू व तुरट चवीच्या पदार्थाचा विशेष अंतर्भाव करावा.
- ऊन, मद्य, रात्रीचे जागरण व संताप टाळावा.
कफ दोष प्रकृति
- या व्यक्तीने नियमित मध खाण्यात ठेवावा.
- नियमित घाम येईल असा व्यायाम करावा.
- मी असलेल्या भूकेच्या अंदाजानेच माफक प्रमाणात व फक्त भूक असतानाच कडू, तिखट व तुरट चवीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा.
- दिवसा व उशीरापर्यंत झोपणे, जास्तीचे पाणि पिणे व थंड पदार्थ टाळावेत.
वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद