पित्ताशय खडे व आयुर्वेद
गेल्या काही वर्षांत पित्ताशयात पित्ताचे खडे होण्याचं प्रमाण बरंच वाढल्याचं आढळून येत आहे. प्राय: मध्यमवयीन स्त्री- पुरुषांमध्ये या विकाराचं प्रमाण अधिक आढळतं. आजकाल लहान वयातसुद्धा हा विकार झालेले रुग्ण पहावयास मिळतात.
पित्ताशयातील खडे नेहमी आढळणारी समस्या आहे. यामधे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका यामध्ये याचा प्रादुर्भाव आढळतो. समाजातील ५ ते २५ टक्के लोकांमध्ये पित्ताशयातील दगड आढळतात.
शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अश्मरी म्हणजे खडे निर्माण होत असतात. खडे फक्त मूत्राशयातच होतात असं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये पाच ठिकाणी खडे होण्याची शक्यता असते. 1) मुतखडा 2) पित्ताशयातील खडा 3) स्वदुपिंडातील खडा 4) प्रोस्टेट ग्रंथीमध्ये खडा 5) प्लिहामध्ये खडा.
आपल्या शरीरातील एक सर्वात मोठा व तितकाच महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत अर्थात लिव्हर. या यकृताचे कार्य फार मोठे जटिल, तितकेच महत्त्वपूर्ण असते. यकृतामधून सतत एक पिवळ्या रंगाचा स्राव तयार होत असतो. ज्याला बाईल म्हणतात. हा बाईल लिव्हरसाठी टाकाऊ असतो. परंतु, तो आपल्या पचनासाठी उपयुक्त व गरजेचा असतो. उपयुक्त व गरजेचा असला, तरी तो अत्यंत विषारी असतो.
आपण जेव्हा अन्न खातो व ते अन्न लहान आतड्यामध्ये येते तेव्हा ते पचविण्यासाठी हा बाईल म्हणजेच पाचक रस त्यात थोड्या प्रमाणात मिक्स होतो म्हणून त्याची विषाची तीव्रता कमी होते. यकृतामध्ये तयार होऊन निघालेला हा पाचक रस आतड्यांमध्ये अन्न असताना जर आला तर तो विषारी असल्यामुळे उलटी, जुलाब, पोट बिघडणे, शौचावर ताबा न राहणे, असे प्रकार घडतात आणि अन्न असताना उपलब्ध झाला नाही, तर पोट साफ न होणे, गॅसेस, पोट फुगणे असे प्रकार घडतात. अशी विसंगत क्रिया होऊ नये, योग्यवेळी, योग्य प्रमाणात पाचक रस उपलब्ध व्हावा याच कारणाने, याच उद्देशाने पित्ताशयाची निर्मिती निसर्गाने केलेली आहे.
पित्ताशय: रचना व कार्य:-
आपल्या पचनसंस्थेतील यकृत, पित्ताशय (gall bladder) आणि लहान आतडे यांचा संबंध चित्रात दाखविला आहे. यकृत आणि पित्ताशयांच्या नलिका एकत्र होऊन अखेर लहान आतड्यांत उघडतात. त्याद्वारे पित्तरस हा पचनादरम्यान आतड्यांत सोडला जातो.
पित्तरस प्रथम यकृतात तयार होतो. पुढे तो नलिकांद्वारे पित्ताशयात पोचतो. तिथे सुमारे ५० मिली रस एकावेळेस साठवलेला असतो. पित्ताशयात त्यातील पाणी शोषले जाऊन तो अधिक दाट होतो. जेव्हा अन्नातील मेद लहान आतड्यांत शिरतात तेव्हा तिथून हॉर्मोन स्त्रवते. त्याच्या प्रभावामुळे पित्ताशयाचे आकुंचन होऊन त्यातील रस आतड्यांत सोडला जातो. त्याच्यातील विशिष्ट क्षारांमुळे मेदाचे पचन होण्यास मदत होते.
का होतात पित्ताशयात खडे? :-
आपल्या शरीरात पित्ताची निर्मिती ही यकृतामध्ये होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते त्याला पित्ताशय (गॉल ब्लॅडर) असे म्हणतात, यामध्ये जास्त तयार झालेले पित्त साठवून ठवले जाते आणि प्रत्येक जेवणाच्या वेळी अन्न पचनासाठी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडले जाते. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात.
पित्ताशयातील खडे होण्याची कारणे :-
चयापचय (Metabolism) संबंधीत विकृतीमुळे पित्ताशयात खडे निर्माण होतात.
पित्ताशय शोथ हे विशेष कारण आहे. पित्ताशय शोथ हा पित्ताशयचा विकार असून यामध्ये पित्ताशयाला सूज आलेली असते. पित्तलवण (Bile salts) व कोलेस्टेरॉल यांच्या असंतुलनामुळे. पित्तामध्ये Bilirubin ची मात्रा अधिक झाल्याने पित्ताशयात खडे निर्माण होतात.
पित्ताशयाच्या आजारांमुळे, स्त्रियांमधील हार्मोनल बदल, पाळीच्या अनियमितता यामुळे पित्ताशयात खडे निर्माण होत असतात. यकृतामधून येणारे पित्त पित्ताशयात साठते. तेथे त्याचे कॉन्सन्ट्रेट (घट्ट होणे) होणे हे कोलेस्टेरोल नावाच्या घटकाने होऊन त्याचा जास्त घट्ट होऊन जमतात व कोलेस्टेरॉलचे खडे तयार होतात.
तसेच पित्ताशयातून लहान आतड्यात जाणार्या नळीत अडथळा असेल, तर त्यामुळे तेथे पित्त साठून तेथे खडे होतात. पॅन्क्रियाज या अवयवाला जर सूज असेल तरी Gall Stone होतात.
जेवणातल्या चुका आणि पित्त:-
खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, रूक्ष आहार घेणं, चरबी, मेद युक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे, अति तूपकट-तेलकट खाणे. फास्ट फूड, जंक फूड सेवनाच्या अतिरेक, अतिलठ्ठपणा, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभावामुळे, तणावग्रस्त जीवनशैली, अवेळी झोप आणि सवयीमुळे अनेकदा पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो. यामधूनच पित्ताचा त्रास बळावतो. पित्ताचा त्रास वारंवार होत असल्यास शरीरात त्याचा गंभीर परिणाम दिसून येतो. परिणामी आजकाल पित्ताशयांमध्ये खडे होण्याचा त्रास अधिक वाढला आहे.
- अनेकजण मूतखड्याप्रमाणेच हा त्रास असेल असे समजून काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हा त्रास जसजसा वाढतो तसे रूग्णांमध्ये पोटात तीव्र वेदना जाणवणं, उलट्यांचा त्रास बळावतो.
स्त्रियांमध्ये ही प्रवृत्ती अधिक आढळते. सकाळी उठल्यापासून एखादा चहा घेऊन सर्व कामं पूर्ण करून दुपारी केव्हातरी दोन-अडीच वाजता जेवणं हा सर्व साधारण स्त्रियांचा परिपाठ असतो. त्यामुळे दरम्यानच्या काळात भूक लागली तरी कामाच्या घाईगर्दीत त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यामुळे शरीरात निर्माण झालेलं पित्त वायुमुळे रूक्ष होतं. परिणामस्वरूप स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक आढळतं.
आयुर्वेद असं सांगतं की, साधारणत: दोन तासाच्या आत भोजन घेऊ नये किंवा खाऊ नये आणि पाच तासाच्या वर उपाशी राहू नये असा सर्व साधारण नियम आहे. यामध्ये प्रकृती, वय, देश, काळ, अग्नी यानुसार फरक पडू शकतो. ज्यांचा दोन जेवणांमध्ये बराच कालावधी जातो किंवा जे भूक मारतात त्यांना हा विकार प्राय: होतो.
पित्ताशय खडे प्रकार :-
पित्ताशयातील खडे म्हणजे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका (ती यकृत पित्ताशय, आतड्याला जोडते) दोन्हींमध्ये याचा प्रादुर्भाव आढळतो.
पित्ताशयात पित्तातील पाणी शोषले जाऊन ते दाट होत असते. या प्रक्रीयेदरम्यान पित्तातील काही घन पदार्थ न विरघळलेल्या अवस्थेत राहू शकतात. जर त्यांचे प्रमाण वाढते राहिले तर मग ते लहान स्फटिकांच्या रुपात वेगळे जमा होऊ लागतात. पुढे ते तिथल्या म्युकसमध्ये पकडले जाऊन तिथे गाळ तयार होतो. कालांतराने अनेक छोटे स्फटिक एकमेकात विलीन होऊन पित्तखडे तयार होतात. हे खडे ३ प्रकारचे असतात.
1) कोलेस्टेरॉलयुक्त खडे:
हे तयार होण्याची प्रक्रिया मध्यमवयानंतर वाढू लागते तसेच ते तुलनेने स्त्रियांत अधिक होतात. हे खडे मऊ व गुळगुळीत असतात.
एखाद्या व्यक्तीत खालील घटक किंवा आजार असल्यास खडे होण्याची प्रक्रिया अधिक संभवते:
1) लठ्ठपणा
2) गरोदरपण : अनेक वेळा आल्यास
3) आजाराची अनुवंशिकता
4) मधुमेह व उच्चरक्तदाब
५) काही औषधांचे परिणाम: मुख्यत्वे गर्भनिरोधक गोळ्या आणि रक्तातील मेदाचे प्रमाण कमी करणारी काही औषधे.
हे खडे स्त्रियांत अधिक प्रमाणात का होतात हा कुतूहलाचा विषय आहे. स्त्रीच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही हॉर्मोन्स त्यास जबाबदार आहेत. त्यांच्या प्रभावाने पित्तरस अधिक दाट होतो, त्यातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते तसेच पित्ताशयाचे आकुंचनकार्य देखील मंदावते. अनेक वेळा गरोदर राहिलेल्या स्त्रियांत प्रोजेस्टेरॉनची पातळी सातत्याने वाढलेली राहते. स्त्रीयांमध्ये पित्तखडे होण्याची ४ प्रमुख कारणे ‘फ’ या अक्षराशी संबंधित आहेत : फॅट, फर्टाईल, फिमेल ऑफ फोर्टी’ दीर्घकालीन मधुमेहात कोलेस्टेरॉलची रक्तपातळी वाढलेली राहते आणि पित्तात जाणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते राहते.
2) बिलिरूबिनयुक्त खडे:-
बिलिरूबिन हे रंगद्रव्य हिमोग्लोबिनच्या विघटनातून तयार होते. निरोगी अवस्थेत शरीरात रोज ठराविक प्रमाणात लालरक्तपेशी मृत होतात आणि मग त्यातल्या हिमोग्लोबिनच्या विघटनातून बिलिरूबिन तयार होते. लालरक्तपेशींच्या काही आजारांत नेहमीपेक्षा कित्येक पट पेशी मरतात आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात बिलिरूबिन तयार होते. अशा वेळेस त्याचे पित्तातील प्रमाण वाढलेले असते. पुढे त्याचा कॅल्शियमशी संयोग होऊन काळ्या रंगाचे खडे तयार होतात.
3) मिश्र प्रकारचे खडे :
काही रुग्णांत वरील दोन प्रकारच्या खड्यांचे मिश्रण होऊन ‘मिश्रखडे’ देखील बनू शकतात.
त्रास न होणारे खडे (Silent or Asymptomatic stones)
बहुतेक वेळेस पित्ताशयातील खड्यांचा काहीही त्रास होत नाही आणि त्यांची लक्षणे दिसून येत नाहीत. पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७०-८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खडय़ांना सायलेंट खडे म्हणतात. जर खडय़ांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल व केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून पित्ताशय काढावेत हे गरजेचे नाही. परंतु अश्या रुग्णांमध्ये पित्ताशयाला सूज, स्वादुपिंडाला सूज येते. पित्ताशयाला सूज येऊन ते फुटणे, पित्ताशयाला गॅंगरीन होणे, पित्ताशयाचा कर्करोग इ. गंभीर आजारही या लक्षण नसलेल्या खड्यांमुळे होऊ शकतात. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व वैद्याच्या सल्ल्यानेच उपचार करावे.
पित्ताशय खडे लक्षणे – पित्त पथरी के लक्षण-
Gall Stone Symptoms :-
पित्ताशयात खडे पडून राहिल्यास सहसा कोणतेही लक्षणे जाणवत नाहीत. मात्र जेंव्हा खडे पित्ताशयातून पित्तवाहिनीत सरकतात तेंव्हा लक्षणे जाणवू लागतात.
सुरुवातीची लक्षणे अॅसिडिटीच्या त्रासासारखीच असतात. जळजळ होऊ लागते, काही वेळेस भोजनानंतर वेदना अधिक होणे, करपट, खारट ढेकर येणे व त्याला दुर्गंध असणे, पोटात जडपणा, गॅसेस होतात. जड, चरबीयुक्त अन्नपदार्थ न पचणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात.
बर्याच रुग्णांना वर दिलेल्या लक्षणांमधील कुठलीच लक्षणे जाणवत नाहीत व खड्यांचा काहीही त्रास होत नाही. बहुतेक वेळेस पित्ताशयातील खड्यांचा काहीही त्रास होत नाही आणि त्यांची लक्षणे दिसून येत नाहीत. फक्त दोन-चार टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसतात.परंतु अश्या रुग्णांमध्ये पित्ताशयाला सूज, स्वादुपिंडाला सूज येते. पित्ताशयाला सूज येऊन ते फुटणे, पित्ताशयाला गॅंगरीन होणे, पित्ताशयाचा कर्करोग इ. गंभीर आजारही या लक्षण नसलेल्या खड्यांमुळे होऊ शकतात.
पित्ताशयातील खडय़ांमुळे पचनतंत्र विकृती, पित्ताशयाला सुज, कावीळ (Obstructive Jaundice), स्वादुपिंडाला (Pancreases) सुज येणे, स्वादुपिंडदाह हे विकारही होऊ शकतात.
गडद पिवळ्या रंगाचे मुत्रविसर्जन होणे.
कावीळ होणे – एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतड्यात नेणारा मार्ग बंद होतो व पित्तरस यकृतात साचू लागते, त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळते व काविळीची लक्षणे दिसू लागतात अत्यंत तीव्र अवस्थेमध्ये आतड्यांचा अवरोध असेल तर कावीळ होणे व सतत उलट्या होणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे, अंगाला खाज येऊ शकते, तसेच शौचाचा रंग पांढरट/मातकट होऊ शकतो.
पोटात कळ येऊन दुखणे- पोटाच्या बेंबीच्या वर उजव्या बाजूस कळ येऊन तीव्र वेदना होते. त्याठिकाणी स्पर्श केल्यास वेदना अधिक जाणवणे. तसेच ही वेदना पाठीकडेही जाऊ शकते. वेदनासमयी उलटी होणे, मळमळणे, थंडी वाजून ताप येणे.
Pingback: पित्ताशयातील खडय़ाचे आयुर्वेदिक उपाय - www.harshalnemade.com
अमली पित्त आहे पोहे खाल्ल्यावर पित्त होते चहा पिल्यावर दूध पिल्यावर
Pingback: पित्ताशयातील खडय़ाचे आयुर्वेदिक उपाय - www.harshalnemade.com
Pingback: पित्ताशयातील खडे आयुर्वेद उपचार - www.harshalnemade.com
Pingback: पित्ताशयातील खडे आयुर्वेद उपचार - www.harshalnemade.com
Pingback: पित्ताशय खडे आयुर्वेद उपाय - www.harshalnemade.com