तोंड येणे (माऊथ अल्सर)
तोंड येणे हा विकार फारच सामान्य आहे.
तोंड आले की आजकाल प्रत्येकाच्या तोंडात प्रथम ‘बी- कॉम्प्लेक्स’ च येते. कारण नेहमी याच्याच कमतरतेमुळे हा होतो असे आपल्याला वाटते.
मात्र आयुर्वेदात याचे काही वर्णन आहे का व यावर काही उपाय आहेत का हे जाणून घेऊया.
आयुर्वेदात तोंड येणे याला ‘मुखपाक’ किंवा ‘सर्वसर’ असे म्हणतात.
जिभेला, घशाला, टाळ्याला व ओठाचे आतील बाजूस बारीक बारीक फोड येऊन त्यावरची त्वचा जाते व त्याच्या भोवतील लाल रंगाची सूज दिसते, तेथील त्वचा सोलवटली जाते.
अल्सरचा केंद्र पिवळसर किंवा धूसर दिसू शकतो, तेथील भाग लाल होतो, अतिथंड किंवा उष्ण पदार्थाचा स्पर्श सहन होत नाही. शब्दांचे उच्चार स्पष्ट होत नाहीत. अशी मुखपाकाची लक्षणे दिसू लागतात.
मुखपाकामध्ये आंबट, खारट, तिखट पदार्थ तोंडाला झोंबतात. विकार तीव्र असेल तर पाणीसुद्धा झोंबते, लाळ चिकट असते व ती फार येते. तोंडात जीभ फिरवण्यानेही त्रास होतो. तोंडाच्या हालचाली करण्यास त्रास होतो, स्पष्ट बोलता येत नाही.
साधारणत: पित्त वाढले की तोंड येते असे सामान्यपणे समजले जाते. मात्र आचार्य वाग्भटांनी याचे वातज, पित्तज, कफज, रक्तज आणि सांनिपातिक असे पाच प्रकार सांगितले आहेत.
पित्तवर्धक आहार करणे, आहारात तिखट व मिठाचे प्रमाण अधिक असणे, गरम पदार्थाचे सतत सेवन, वेळी अवेळी जेवण करणे, फार काळ उपाशी राहणे, रात्री उशिरा जेवण करणे, रात्री जागरण करणे, दिवसभर अधिक प्रमाणात चहा घेणे, तंबाखू, पानमसाला, गुटखा इत्यादींचे सतत सेवन करणे इत्यादी कारणांमुळे मुखपाक होतो.
मुखपाक स्वतंत्रपणे कफ व रक्त हे दोष बिघडून होतो, परंतु पुष्कळवेळा संग्रहणी, अम्लपित्त, अपचन, मूळव्याध, मलावरोध, जीर्ण ज्वर, इत्यादी विकारांचे लक्षण म्हणूनही असतो, ही गोष्ट ध्यानात ठेवावी.
जेव्हा हा विकार स्वतंत्र असतो तेव्हा स्थानिक उपचारांनी बरे वाटते. परंतु दुसऱ्या रोगाचे लक्षण म्हणून तोंड आले असता मूळ विकारावर औषध द्यावे लागते.
बहुतांशी मुखपाकांचे कारण हे पोटात दडलेले असते. ज्याप्रमाणे आपली जीभ हा आपल्या पोटाचा आरसा आहे असे समजले जाते. त्याचप्रमाणे आपल्या जिभेवर, ओठांवर अथवा गालाच्या आतल्या बाजूला आलेले मुखपाक हे बिघडलेल्या पोटाचे द्योतक आहे.
किंबहुना बऱ्याचदा पोटातील अल्सर व मुखातील अल्सर हे एकाच प्रकारचे असतात. कारण आपली आभ्यंतर त्वचा मुखापासून गुदापर्यंत एकच आहे. म्हणूनच ज्यांना सततचा मलावष्टंभाचा त्रास होत असतो त्यांना सारखेच मुखपाक होत असतात.
पण बरेच दिवस असणारे, स्राव असणारे, ज्यांच्या कडा जाड झाल्या आहेत असे मुखपाक वेळीच तपासून घ्यावेत.
कारण बऱ्याचदा यांचे रूपांतर भविष्यात कर्करोगामध्ये होण्याची शक्यता असते किंवा हे इतर एखाद्या पोटाच्या मोठय़ा आजाराचेही द्योतक असू शकतात.
अशा प्रकारांत सततचे तंबाखू, गुटखा अशा अमली पदार्थाचे सेवन हा हेतूसुद्धा असू शकतो.
बहुतांशी मुखपाकाचे कारण हे बिघडलेले पोट असते, म्हणून प्रथम आपली पचनशक्ती चांगली करण्याकडे लक्ष द्यावे.
अनेक आजारांत लक्षण स्वरूपात मुखपाक होत असतो म्हणून प्रत्येक मुखापाकाचे कारण शोधून चिकित्सा करावी तसेच सर्वच विकारांत प्रथम तोंडचे विकार बरे करावेत.
कारण मुखामध्ये आपल्या अन्नपचन प्रक्रियेची सुरुवात होत असते. ही सुरुवातच बिघडल्यास अन्नपचन प्रक्रियाच बिघडू लागते व छोटा वाटणारा हा आजार भविष्यात पोटाच्या एखाद्या मोठय़ा आजाराला निमंत्रण देतो.
अनेक आजारांत जिभेला फोड लक्षण स्वरूप असते म्हणून त्याचे कारण शोधून जिभेला फोड येण्याचे उपाय सर्वप्रथम करावे
तोंड येणे-जिभेला फोड येणे-उपाय
प्रत्येक मुखपाक हा वेगळा समजून त्याचे निदान शोधून वैद्याच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे हाच याच्या त्रासापासून कायम मुक्त होण्याचा मार्ग आहे.
- पण साधारणत: सामान्य कारण जाणवल्यास पूर्वीच्या काळी घरगुती औषधांमध्ये जाईची पाने खडीसाखर चघळण्यासाठी दिली जात असत. त्याने लाळ गाळली की मुखपाक बरा होत असे. तोंड आले असता लाळ चिकट असेल तर लाळ सुटणारी औषधे द्यावी.
- आवळकठी दुधात वाटून तोंडाला लेप द्यावा व थोड्या वेळाने कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या.
- मध तोंडात धरून टाकणखार व मध तोंडाला चोळावी.
- लाळ पातळ असून जीभही पातळ व लाल असेल तेव्हा व्रणरोपक औषधे द्यावी.
- काताचे पाणी, दूध, तूप, नारळाचा आंगरस, खैराचे सालीचे पाणी, कच्चे केळे, ज्येष्ठमध, खडीसाखर, फणसांबे वगैरे औषधे तोंडात धरून चघळावी म्हणजे तोंड बरे होईल.
- तोंडातील कोणतेही विकारावर रेचक औषधाने उत्तम उपयोग होतो, कारण तोंडातील विकार प्राय कफ व रक्त हे दोष बिघडून होतात व त्या दोहोंवर रेचक हे उत्तम औषध आहे. कफाचे आधिक्य असता ओकारीचे औषधानेही तोंड बरे होते.
- ग्रहणी रोगात जर मुखपाक हे लक्षण असेल तर शिंगाड्याची खीर किंवा तवकीर पाण्यात शिजवून भरपूर घ्यावी. याने मुखपाक (तोंड येणे) कमी होतो.
- थंड पाण्यात मध मिसळून त्याने गुळण्या केल्यानेही लगेच आराम पडतो.
- तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यासही मुखापक लवकर बरा होतो.
- हे उपाय अल्प कारणांनी उत्पन्न मुखपाकात तात्काळ आराम देतात. परंतु काहींना पडलेले व्रण कित्येक दिवस बरेच होत नाहीत. काहींचे काहीही औषध न घेताच दोन-तीन दिवसांत बरे होतात. तर काहींना आहे त्रास 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास, वेदना न होता त्या भागात त्रास होऊन मुखपाक नवीन भागात पसरत असल्यास, मुखपाक मोठे होत असल्यास, मुखपाक सोबतच रक्तस्त्राव, बाह्य त्वचेवर फोडी,अन्न गिळतांना त्रास असल्यास मुखपाकांसाठी वैद्याच्या सल्ल्याने औषधे घेणे केव्हाही चांगले.
Pingback: तोतरे बोलणे उपाय - www.harshalnemade.com
Pingback: वमन - www.harshalnemade.com