गुळवेल सेवनाचे प्रकार
अमृततुल्य गुळवेलाचे अनंत लाभ असल्याकारणाने त्याला अमृता असे संबोधले आहे. गुळवेलाच्या नित्य उपयोगाने आपण निरोगी राहून अनेक रोगांपासून सुरक्षित राहू शकतो. गुळवेलींचे खोड ओळखण्याची प्रमुख ओळख म्हणजे ताणा आडवा कापला असता आतला भाग चक्राकार असतो.
गुळवेलीचा तुकडा कुठेपण ठेवला तरी त्याला नवीन अंकुर फुटून गुळवेल वाढते, तसेच तोडून आणलेला गुळवेलीचा तुकडा घरात कित्तेक दिवस न सुकता तसाच टिकून राहतो.
गुळवेल सर्व रोगांवर वापरता येते. परंतु फक्त गुळवेलाचा एकेरी वापर फारसा होत नाही. वेगवेगळ्या औषधांसह गुळवेलचे सत्व, स्वरस, काढा, फांट इत्यादींचा उपयोग कमी अधिक प्रमाणानुसार वापरता येतो. गुळवेलीचे गुण सगळ्यांनाच माहित आहेत आण ही गुळवेल कोणकोणत्या प्रकारे सेवन करता येते याची माहिती बघूया.
स्वरस
ताजी गुळवेलाची कांड आणून प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. वरील साल काढून आवश्यक तेवढी खलबत्त्यात किंवा दगडी खलात बारीक कुटून फडक्यातुन पिळून रस काढावा. हा रस चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे.
चुर्ण
ताजी गुळवेल तोडून बारीक कापुन उन्हात कोरडी केल्यावर चुर्ण करून वापरावे. हे चुर्ण १ ग्राम एवढ्या प्रमाणात वापरता येते
सरबत
गुळवेलीचा काढा तयार करुन घ्यावा व त्यामध्ये सम प्रमाणात साखर मिसळावी, व काढा तसाच सुमारे ३-४ आठवडे ठेऊन द्यावा. कालांतराने त्यात्त तळाशी गाळ जमा होईल. तो वरील मिश्रण गाळून घेऊन काढून टाकावा. वरचा काढा वापरावा. सोय म्हणून असे टिकाऊ काढे वापरले जात असले तरीही त्यात मिश्रित केलेल्या पदार्थांमुळे मूळ काढ्याचे गुणधर्म काही प्रमाणात बदलतात, हे निश्चितच. म्हणून शक्य असेल त्या वेळी काढा ताजाच वापरणे.
काढा
कोरड्या गुळवेलाची भरड किंवा ताजे कांड आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी १ भाग गुळवेल घेतल्यास त्याच्या १६ पट पाणी घालावे. हे मिश्रण१/४ होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे.
फांट
गुळवेळीचा फांट हे उत्तम गुणकारी औषध आहे. गुळवेळ दगडाचे खलात ठेचून व पाण्यात घोटून घ्यावी, उपळसरी चुर्ण प्रत्येकी १०० ग्राम १ लिटर गरम पाण्यात दोन तास बंद भांड्यात ठेवावे व नंतर गाळून घ्यावे. याने लघवीची जळजळ थांबते व लघवी साफ होऊ लागते.
प्रमाण:- ३०मिली फांट दिवसातून तीन वेळ घ्यावे.
कल्प
गुळवेल चा ताजा रस २०० मिली + खडीसाखर १००० ग्राम एकत्र करून १ तास भिजत ठेवणे. जाड बुडाच्या भांड्यात मंद आचेवर साखरे सारखे कोरेडे दाणे बनेपर्यंत हलवत राहणे. गुळवेलीचा कडु काढा पिण्यास कंटाळा करणाऱ्या लहान मुलांमध्ये वापरण्यासाठी हा गुळवेल कल्प उत्तम आहे.
गोळ्या
गुळवेलीचे चुर्ण १०० भाग, गूळ ६ भाग; तूप २० भाग एकत्र घोटून गोळी करावी व सकाळ सायंकाळ योग्य मात्रेने सेवन करावी.
सत्व
अंगठ्या एवढी जाड गुळवेल आणुन त्याची पान व वरील त्वचा काढुन स्वच्छ करून दगडाने ठेचुन बारीक करून भांड्यात पाण्यात ६ तास भिजत ठेवावी. त्यांनतर हाताने कुस्करून त्यानंतर रवीने जोरजोरात घुसळून घेणे. यामुळे भाड्याच्या तळाशी गुळवेल सत्व जमु लागेल. उरलेली गुळवेल कपड्यात घेऊन त्यातील उरलेले आणि पिळुन त्याच भांड्यात एकत्र करावे. यानंतर पाणी गाळून घेऊन ४ ५ तासासाठी स्थिर होण्यासाठी ठेवावे.
संथ झाल्यावर वरील पाणी सावकाश काढून घेऊन उरलेलं सत्वमिश्रित पाणी उन्हात कोरडे होऊ देणे. यामुळे तपकिरी हिरवट पांढरट सत्व मिळते. हे सत्व चवीला कडवट असुन अर्धा ग्राम या प्रमाणात मध, गुळ, किवां मुरब्ब्यासोबत घेता येते
भाजी
गुळवेलाच्या पानांची भाजीसुध्दा केली जाते. गुळवेलाची पाने ही खोडाएवढी गुणकारी नसली तरी पानांची भाजी आरोग्यदायी आहे. भाजीपासून केलेले पराठेही किवां भजी चवदार लागतात.
या भाजीची कृती पुढीलप्रमाणे : साहित्य: गुळवेल कोवळी पाने, जिरे, कांदा, लसूण, तेल, मिरची व मीठ.
कृती: सर्वप्रथम गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन आणि बारीक चिरून घ्यावी. त्यानंतर कांदा चिरून घ्यावा आणि तेल गरम झाल्यावर जिरे व कांदा तेलावर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. ह्यात लसूण व मिरची बारीक कापुन घालावी. त्यानंतर गुळवेलीची चिरलेली पाने परतून घ्यावी. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ही भाजी वाफेवर शिजवून घ्यावी.
गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी केली जाते. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते.मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी.वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेलाची भाजी हितावह ठरते. त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे. कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.
तेल
ताजी गुळवेल ५० ग्राम स्वच्छ धुवुन वरील साल काढुन बारीक ठेचुन घेणे, घाणीचे शुद्ध तिळाचे तेल १०० ग्राम, पाणी ४०० मिली.
गुळवेल व तेल एका पातेल्यात घ्यावे. नंतर त्यात पाणी घालून सर्व मिश्रण एकत्र करून गॅसवर मंद आचेवर ठेवावे. मिश्रण मधुनमधुन ढवळावे, बुडाला लागणार नाही / करपणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रणावर फेस येऊ लागल्यावर गॅस बंद करावा. अशा प्रकारे तयार झालेल्या मिश्रणात कापसाची वात बनवून ती गॅसवर पेटवावी, तड्तडू आवाज आल्यास सिध्द केलेल्या तेलात पाणी आहे असे समजून परत तेल उकळावे. मिश्रण पुन्हा थोडे उकळल्यावर वातीची परीक्षा पुन्हा करून बघणे. तडतड आवाज न आल्यास तेल सिध्द झाले आहे असे समजावे. मिश्रण थंड झाल्यावर गाळून घेवून एका स्वच्छ काचेच्या बाटलीत भरून ठेवणे.
हे तेल जुनाट वाताचे दुखणे, वातरक्त यावर परिणामकारक आहे.
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे