नेत्रधावन
।। सर्वेन्द्रियाणां नयनं प्रघानम् ।।
सर्व इंद्रियांमध्ये नयन (नेत्र, डोळा) हे प्रधान इंद्रिय आहे. डोळा व दृष्टी ही परमेश्वराने मानवाला दिलेली पंचज्ञानेंद्रियांतील सर्वोत्कृष्ट देणगी आहे. मानवाचे बहुतांशी ज्ञान व जीवनपद्धती ही डोळा व दृष्टीवर अवलंबून असते.
अशा प्रधान इंदियांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व इंद्रियास झालेल्या आजारांच्या चिकित्सेसाठी आयुर्वेद शास्त्राने ‘नेत्रधावन’ हा एक चिकित्सा उपक्रम सांगितेलेला आहे.
॥ प्रक्षालनम् धावति शुद्धति इति धावनम् ।।
धावन म्हणजे प्रक्षालन शुद्धी करणे, धुऊन काढणे होय. ज्या उपक्रमामध्ये डोळ्यांची शुद्धी केले जाते. त्या उपक्रमास ‘नेत्रधावन’ असे म्हणतात. डोळा हा अगभिगुणभुयिष्ट आहे. त्यास कफापासून विरुद्ध गुणाने भय असते. कफ हा जलिय, पिच्छिल आहे. म्हणून त्यास स्त्राव रुपाने बाहेर काढण्यासाठी नेत्रधावण केले जाते. नेत्रधावनाने डोळ्यामध्ये स्थित, संचित असलेल्या दोषांची शुद्धी केले जाते.
नेत्रधावन पद्धती :
नेत्रधावन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. व्यक्तिला वारा लागणार नाही अशा खोलीमध्ये उताणे झोपवावे. दुसऱ्या व्यक्तिने डोळा डाव्या हाताच्या बोटांनी उघडून उजव्या हाताने, धावनासाठीच्या द्रवामध्ये स्वच्छ कापूस किंवा कापड बुडवून दोन बोटे उंचीवरून नाकाच्या बाजूस द्रव सोडावा. पूर्ण डोळा भरेल एवढा द्रव सोडून उघडझाप हळूवारपणे करावी.
आयवॉशकपाने बसलेल्या अवस्थेमध्ये नेत्रधावन केले जाते. आयवॉश कपामध्ये द्रव घेऊन, डोळा आयवॉश कपावर ठेवावा. व मान वरच्या दिशेने करावी. व डोळ्यांची हालचाल उघडझाप हळूहळू करावी.
बशीमध्ये द्रव घेऊन त्यामध्ये डोळ्यांची उघडझाप हळूहळू करावी. धावन सुरू असताना व नंतर डोळ्यामधून स्त्राव येण्यास सुरूवात होते. स्त्राव स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावा. व सुखोष्ण जलामध्ये वस्त्र बुडवून त्याने हलकासा शेक द्यावा. धावनाने फक्त डोळ्यातीलच नव्हे तर मानेवरील असलेल्या संधी, श्रृंगाटक, तोंड, नाक यांच्या स्त्रोतसांमध्ये जाऊन दोषांचे शोधन केले जाते.
॥ प्रक्षालयेत् मुखं नेत्रे स्वस्थ शीतोदकेन वा ।। सु.चि.
स्वस्थ व्यक्तिने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी थंड जलाने धावन करावे. जल हे स्वच्छ, शुद्ध व निर्जुतुक असणे आवश्यक आहे.
धावनाचे उपयोग :
डोळे जड होणे, डोळ्यांना सूज येणे, खाज येणे, मलूल पडणे, लाल होणे, चिकट पाणी येणे, डोळे संकोचित होणे, धुसर दिसणे, दृष्टी दोष, अलर्जी, डोळ्यांना कॉम्प्युटर व प्रदुषणामुळे होणाऱ्या त्रासांमध्ये नेत्र धावनाचा उपयोग करता येतो. डोळ्यांचे आजार बरे झाल्यानंतरही ते आजार पुन्हा होऊ नयेत म्हणून नेत्रधावनाचा उपयोग केला जातो.
धावन औषधी द्रव्ये :
यष्टी, त्रिफळा, दारूहळद, अडुळसा, सातू, चंदन, शतावरी, मुस्ता इंत्यादींच्या काढ्याने, भिजत ठेवून किंवा सिद्ध केलेल्या जलाने, तुरटी जलाने, शेळीचे दूध, गायीचे दूध, जिवनीय औषधांनी सिद्ध केलेले दूध इत्यादींचा उपयोग युक्तिपूर्वक व वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावा.
औषधी द्रव अति तीक्ष्ण, अति उष्ण, थंड जास्त प्रमाणामध्ये किंवा कमीप्रमाणामध्ये, जास्त घट्ट असे वापरू नये. असे औषधीद्रव वापरल्यास डोळे लाल होणे, डोळ्यांना थकवा येणे, डोळ्यातून पाणी येणे, घासल्याप्रमाणे व टोचल्याप्रमाणे दुखणे, डोळे लहान व संकोचित होणे, वारा सहन न होणे इत्यादी त्रास होतात.
नेत्रधावन चांगले झाल्यास डोळे शांत होणे, रोग शांती होणे, सहजपणे उघडझाप होणे, वारा व ऊन यांचा काही त्रास न होता सहन करता येणे. ही लक्षणे आढळून येतात. नेत्रधावन हे सकाळीच केले जाते.
धावनाचे फायदे :
नेत्रधावन योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणामध्येच केल्यास, डोळ्यामधील बुबुळ, पांढरा भाग, लालभाग, पापण्या स्पष्ट व निर्मळ होतात. पापण्या मऊ होतात. डोळ्यांचे तेज व दुष्टी वाढते. दिसण्यास स्पष्टपणा येतो, वारा, ऊन सहजपणे सहन करू शकतात, सर्व साधारण डोळ्यांचे आजार होत नाहीत. इ. फायदे होतात.
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे