नेत्र तर्पण- Netra Tarpan
तर्पयतिति, तृप्तीकरं यद् तद् तर्पणम् ।
ज्या क्रियेमुळे अवयवास तृप्ती मिळते त्या क्रियेस तर्पण असे म्हणतात.
डोळ्यांना झालेले विविध आजारांच्या चिकित्सेमध्ये डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आयुर्वेद शास्त्राने नेत्रतर्पण हा एक चिकित्सा उपक्रम सांगितलेला आहे.
नेत्रतर्पणाने मानेवरील अवयवांचे व नेत्रगत असलेल्या दोषांचे स्त्रावरूपाने शोधन व शमन केले जाते.
नेत्र तर्पण विधी :-
नेत्रतर्पण सकाळी किंवा सायंकाळी वारा, ऊन, धुळ, धूर येणार नाही अशा खोलीत, अन्नपचन पूर्ण झालेले आहे अशा व्यक्तीस चांगल्या शय्येवर उताने झोपवावे.
दोन्ही डोळ्यांभोवती दोन बोटे उंच अशी उडीद पीठ कणकेची, एकसारखी व त्यामधून तर्पणाचा द्रव बाहेर झिरपणार नाही अशी गोल पाळी तयार करावी.
डोळे मिटलेले ठेवून आवश्यक त्या औषधांनी सिद्ध केलेले दूध, तूप, तुपावरील निवळी गरम पाण्यामध्ये ठेवून सुखोष्ण केलेले, धार धरून पाळीमध्ये सोडावे.
पापण्यांचे व भुवयांचे केस पूर्ण बुडतील एवढे औषधीद्रव सोडावे व डोळ्यांची हळूहळू उघडझाप करावी.
योग्य नेत्रतर्पण झाल्यानंतर डोळ्यांच्या कानाकडील बाजूस पाळीला छिद्र करावे व तर्पणद्रव्य बाहेर काढून पाळी काढावी. नंतर जवाच्या गोळ्याने मर्दन करावे. आवश्यक असल्यास औषधी धुमपान करून सुखोष्ण जलाने तोंड धुवावे.
तर्पण झाल्यानंतर आकाश, ऊन, सूर्यप्रकाश, टी.व्ही., कॉम्प्युटर पाहणे, प्रवास करणे, जास्त लहान पदार्थ, गरम पदार्थ पाहणे टाळावे.
तर्पणाचे फायदे :-
- डोळे कोरडे होणे
- वाकडे किवा खोल जाणे, रुक्ष होणे, डोळे अडकणे, शुष्क होणे
- पापण्या वाकड्या होणे
- उघडझाप करण्यास त्रास होतो
- डोळ्यांमधून अश्रू न येणे, किंवा जास्त अश्रू येणे
- डोळ्यांसमोर अंधारी येणे, पापण्यांचे केस गळणे
- डोळे मलूल होणे, डोळ्यांमध्ये टोचल्याप्रमाणे दुखणे, पापण्यांचे केस वाकडे होणे
- टी.व्ही., कॉम्प्युटर प्रदुषण इ.मुळे डोळ्यांवर होणारे परिणाम
- डोळे लाल होणे
- वारंवार रांजणवाडी येणे, फोड येणे
- पापण्यांच्या केसांच्या मुळाशी कोंडा जमा होणे व खाज येणे
- डोळ्यांचा नंबर वाढत जाणे, नजर कमी व धुसर होणे
- मधुमेह व रक्तदाब, ताप व इतर शारीरिक आजारांमुळे डोळ्यांवर होणारे परिणाम
- डोळ्यास जखम होऊन टीक पडल्यास
- डोळ्यामध्ये विष गेल्यास इ. डोळ्यांच्या आजारांमध्ये नेत्रतर्पणाचा चांगला उपयोग होतो.
तर्पण केंव्हा करू नये:-
- वातावरणामध्ये फार उष्णता असल्यास किंवा जास्त थंडी असल्यास, जास्त पाऊस असल्यास किंवा खराब दिवस असताना,
- नेत्ररोग उपद्रव असल्यास, तसेच ज्याने पोट भरून जेवण केले आहे.
- स्निग्ध पदार्थ, मध, कृत्रिम विष, पाणी इ.चे सेवन केलेले आहे.
- नवीन जखम असल्यास, ज्यास वमन, विरेचन, बस्ति दिलेली आहे.
- जी स्त्री गर्भिणी किंवा प्रसुत झालेली आहे.
- ज्या व्यक्तीस नवीनच सर्दी, खोकला, दमा, ताप आला आहे, डोळे लाल होऊन फार दुखत असल्यास,
- डोळ्यातून चिकट स्त्राव येत असल्यास, सतत मल येऊन डोळे चिकटत असल्यास यांमध्ये नेत्रतर्पण केले जात नाही.
औषधी द्रव्ये :-
नेत्रतर्पणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषधीसिद्ध तुप, दुध, काढे, ताज्या वनस्पतींचा कल्क, यांचा उपयोग केला जातो. नेत्रतर्पण हे डोळ्यांमध्ये असलेल्या दोषांनुसार किंवा अवयवानुसार योग्य त्या रुग्णामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांकडून व त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या औषधांनी सिद्ध केलेल्या घृत किंवा दुधाने करून घ्यावा.