निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली - आयुर्वेद

आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदशास्त्राचे प्रयोजनच मुळी

“ स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्‌ आतुरस्य विकारप्रशमनम्‌ च ” हे आहे.

अर्थात निरोगी व्यक्‍तीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि एवढे करूनही जर रोग झालाच तर त्यावर उपचार करणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. यामध्ये निरोगी व्यक्‍तीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. रोगावर उपचार करणे ही दुय्यम बाब आहे. वृक्षाचे मूळ कायम ठेवून फक्त त्याच्या शाखादी विस्तार तोडून टाकता असता त्यास कालांतराने शाखा वगेरे फुटून तो पुर्ववत होतो, त्याचप्रमाणे शरीरातील दोष जर समूळ पंचकर्माने काढुन टाकले नाहीत, तर पुन्हा ते काही कारणाने वाढुन रोग उप्तन्न करतात. रोगाच्या मुळ कारणाकडे दुर्लक्ष करुन केवळ बाह्य लक्षणांवर उपचार करण्याऐवजी रोगाचे समूळ उच्चाटन करण्यावर आयुर्वेद भर देतो. म्हणूनच आयुर्वेद हे आजार कायमचा बरा करुन व रोगप्रतिकारशक्ती सुधारून संपुर्ण व दीर्घकाळ स्वास्थ्य प्रदान करणारे शास्त्र आहे.

सध्या सरासरी आयुर्मान हे साधारण ७० वर्ष आहे. आयुर्मान वाढते आहे पण ते काही रोग मुक्त नाही. बहुतेकांना मधुमेह, रक्‍तदाब, संधीवात, पोटाचे आजार, अम्लपित्त इ. विविधआजारांसोबत जगावे लागते. त्यामुळे निरामय अर्थात कुठलाही आजार नसलेले दीर्घायुष्य सर्वांना प्राप्त होण्याच्या दृष्टीने आयुर्वेदिक आहार विहार इ. सूत्राचा अवलंब करून सर्वांनी आनंदी, निरोगी दीर्घकाळ रहावे. आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी आयुर्वेदाचा किती भर आहे हे आयुर्वेदाच्या सगळ्याच ग्रंथातुन स्पष्ट केले आहेच. दीर्घायुष्य जगण्यासाठी कुठलाही आजार नसणे अत्यंत आवश्यक बाब आहे. कुठलाही आजार नाही त्या व्यक्‍तीला निरोगी म्हणायचे का? आरोग्य म्हणजे काय? असा प्रश्‍न समोर येणे स्वाभाविकच आहे. याबाबत आयुर्वेदाने आरोग्याची पुढीलं व्याख्या केली आहे.

समदोष: समाग्निश्च समधातु मल:क्रिया: ।
प्रसन्नात्मेद्रियमन: स्वस्थ इत्यभिधीयते ।।

अर्थात शरीराला धारण करणारे तीन दोष (वात, पित्त, कफ) सात धातू (रस, रक्‍त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) तीन मल (मूत्र, स्वेद, पुरीष) आणि अग्नि, पचनशक्‍ती हे १४ घटक यांची कार्य प्राकृत असणे, इंद्रिये (ज्ञानेंद्रिये, कर्मेद्रिये) आणि त्याचबरोबर मन, आत्मा प्रसन्न असणे हे “स्वस्थ” अर्थात निरोगी माणसाचे लक्षण आयुर्वेदाने सांगितले आहे. कारण सध्या प्रचंड धावपळ, ताणतणाव यामुळे शारिरीक आजारांसह मानसिक विकारांचे प्रमाण वाढत आहे. निरोगी अवस्थेत दीर्घायुष्य पाहिजे असेल तर आजार का होतात हे समजून घेणे खूप आवश्यक आहे.

शरीराचे निरोगी राहण्यासाठीचे उठण्या, झोपण्याचे, जेवणाचे नियम न पाळल्यास आपणच आपल्या शरिरात आजाराचा पाया रचत असतो व कालांतराने त्याला हेतुंचा संबंध मिळाल्यावर आजार आपले रूप दाखवतो. म्हणुनच आपले शरीर निरोगी राहण्याच्या दृष्टीने निरोगी राहण्याचे वेळापत्रक नको का करायला? कधी झोपायचे, सकाळी कधी उठायचे, जेवणाच्या वेळा, व्यायाम, प्राणायाम, योगासने, प्रार्थना, ध्यानधारणा याचे एक वेळापत्रक करणे आणि त्या वेळापत्रकानुसार अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण दिवसाचे जे नियोजन आहे. त्यालाच आयुर्वेदात “दिनचर्या” असे म्हटले आहे. यामध्ये ब्राह्ममुहूर्तावर उठणे, मलमुत्रविसर्जन दंतधावन व जिव्हानिर्लेखन, नस्य, गंडूष, अभ्यंग, व्यायाम, उटणे लावून स्नान करणे इ. बाबींचा अंतर्भाव होतो.

आयुर्वेदाने एका वर्षांचे सहा वेगवेगळ्या कालामध्ये विभाजन केले आहे. या सहा कालखंडालाच ऋतु असे म्हटले आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतुमध्ये वातावरणातील होणाऱ्या बदलानुसार आपला दैनंदिन वेळापत्रकात थोडाफार बदल करावा लागतो. यालाच आयुर्वेदात “ऋतुचर्या” असे म्हटले आहे. प्रत्येक ऋतुत आढळणारे हवामान, आजुबाजूची परिस्थिती त्या त्या कालावधीत शरीरात असणारी वातपित्तकफ या त्रिदोषांची स्थिती या सर्वांचा समग्र विचार करून शरीरासाठी हितकर आरोग्यदायी अशा बाबींचे सविस्तर मार्गदर्शन म्हणजे ऋतुचर्या. अशाप्रकारे दिनचर्या आणि ऋतुचर्येचे पालन करण्याचा संकल्प आपण केला तर निश्‍चितपणे संभाव्य आजार टाळून निरोगी असे दीर्घायुष्य जगता येणे शक्‍य होईल. दीर्घायुष्य जगण्यासाठी व्यायाम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचे, स्थान अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने दररोज व्यायाम करून निरोगी राहणे हे हिताचे आहे. आरोग्य कायम टिकवण्यासाठी आहारातील बदल, श्रमानुसार आहाराची योजना करावी.

तच्च नित्य प्रयुञ्जित स्वास्थ्यं येनानुवर्तते ।
अजातानां विकाराणां अनुत्पत्तिकरं च यत्‌ ।।

ज्या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य टिकून राहते आणि जो आहारविहार रोग निर्माण होऊ देत नाही त्याचे सेवन करावे, असे मार्मिक मार्गदर्शन आयुर्वेदात सांगितले आहे.

बलमारोग्यमायुश्च प्राणाश्यायी प्रतिष्ठिता: । च. सू. २०

माणसाचे बल, आरोग्य व आयुष्य ही अग्नीवर अवलंबून असतात. यासाठी अग्नि किंवा पचनकार्य सतत चालू ठेवण्यास त्यास योग्य आहाररुपी इंधन देणे आवश्यक असते. आहाराचा मुख्य परिणाम मनावर होतो. आपण सात्विक, राजस किंवा तामस ज्या स्वरूपाचा आहार ठेवू त्यानुसार आपले मन बनणे अवलंबून असते. अन्न हे मनाचे सामर्थ्य वाढविते. म्हणुनच आहाराचे नियम पाळणे हे निरोगी जीवन जगण्यासाठीचा पहिला पाया आहे.

आहार, निद्रा व ब्रह्मचर्य हे आयुर्वेदात त्रिस्तंभ अर्थात अत्यंत महत्वाच्या बाबी सांगितल्या आहे. आहार योग्य नियमानुसार घेणे, जागरण न करता झोप वेळेत घेणे आणि ब्रह्मचर्याचे संयमाने पालन करणे या तिन्ही बाबी आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.

सदवृत्त अर्थात आचार रसायन हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. सदाचार संपन्न जीवन जगणे ध्यानधारणा योग इ. पालन करणे ह्या बाबी अंतर्भूत आहे. यामुळे ताणतणावजन्य होणारे आजार (मधुमेह, रक्‍तदाब, पोटाचे आजार,अम्लपित्त इ.) टाळून आपली मनस्थिती उत्तम राखण्यास मदत होते.

आयुर्वेदात स्वास्थ्य टिकवण्यासाठी अनेक रसायने द्रव्ये सांगितली आहेत. त्यांचा वापर अवश्य करावा. आपण कुठल्याही वयाचे असाल तेथपासून आपले उर्वरित आयुष्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने दिनचर्यची आखणी करावी. जीवनभर औषधांच्या कुबडयांनी जगायचे नसेल तर योग्य दिनचर्या, ऋतुचर्या, आहार व विहार नियमाचे पालन अनिवार्य आहे. आयुर्वेदामुळे जगातील सर्वांचे स्वास्थ्यरक्षण, संवर्धन, निरोगी व चांगली प्रतिकारशक्ती राखण्यासाठी करण्यास सक्षम आहे. मला वेळ नाही ही सबब न सांगता आरोग्यासाठी वेळ काढण्याचा संकल्प करून आजच निरामय आरोग्यासाठी आयुर्वेदाचा अंगिकार करूया.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!