अग्निमांद्य-भुक कमी होणे
मंदाग्निचा अर्थ पचनशक्तीत विकार उत्पन्न होणे हा आहे, खाल्लेल्या अन्नाचे पचन ज्या कारणांनी होते त्यात बिघाड होऊन अन्नाचे पचन चांगले होत नाही. ह्याचेच नांव मंदाग्नि आहे. अन्नाने शरीराची वाढ होते आणि दैनंदिन काम करण्यामुळे शरीरातील ज्या द्रव्याचा क्षय होतो ती द्रव्यें शरीरास न मिळाली तर शरीराचा क्षय होणे निश्चितच आहे. प्रत्येक दिवशी खालेल्या जेवणामुळे शरीरातील या द्रव्यांच्या क्षयाची भरपाई होते. परंतु मंदाग्निमुळे अन्नाचे पचन नीट न झाल्यामुळे शरीरास ही द्रव्ये योग्य प्रमाणात मिळत नाहीत व त्यामुळे शरीर हळूहळू क्षीण होऊ लागते. केवळ भोजन करण्यानेच शरीर क्षीण होते असा ह्याचा अर्थ नाही परंतु चार पाच वेळ चांगले, स्वादिष्ट व बलकारक भोजन करूनही मंदाग्नीमुळे अन्नाचे पचन होत नाही. अशावेळी शरीर क्षीण होणे हे निश्चितच आहे.
आजकाल मंदाग्नीचा रोग फार पसरला आहे. ह्याचे महत्वाचे कारण असे आहे की, लोकांनी सरळ प्राकृतिक जीवन जगणे सोडून दिले आहे. शहरातील दुषित हवेबरोबरच हल्ली बौद्धिक कामेही जास्त करावी लागतात. यंत्रांमुळे लोकांनी शारीरिक कष्टाची कामे बहुतेक सोडल्यासारखीच आहेत. हल्लीचे सुशिक्षित लोक चार पाच वेळ खाणे आवश्यक समजतात. परंतु भारतीयांसाठी दोन वेळ जेवणे पुरेसे आहे, तिसरी वेळ म्हणजे सकाळची नास्ता एक वेळ योग्य मानली जाईल; परंतु चार पाच वेळ भोजन करणे म्हणजे रोगाला निमंत्रण देणे होय. शिवाय आजकाल शहरांत शुद्ध खाद्य पदार्थ मिळणे देखील कठीण झाले आहे. तुप, तेल, लोणी, दूध, दही कणीक इत्यादी सर्व वस्तुत भेसळ झाली आहे. ह्यामुळे देखील मंदाग्नी या रोगाची वाढ झाली आहे.
बुद्धिमान मनुष्याने हे ध्यानात घेतले पाहिजे की, मनुष्याचे जीवन केवळ चार पाच वेळ खाण्याकरिता नसून जिवंत राहण्यासाठी भोजन केले जाते. अर्थात भोजनासाठी जगणे हे जीवनाचे सार्थक नसून जगण्यासाठी भोजन आहे. अशा प्रकारची धारणा झाल्यानंतर चमचमीत, मसालेदार व स्वादिष्ट पक्वान्नांची काहीच जरूरी नाही. जेवढी भूक असते तेवढे अन्न पोट मागतेच. भोजन जबरदस्तीने पोटात उतरविण्यासाठी मसाल्याची काय आवश्यकता आहे ? जे भोजन कोणत्याही मदतीवाचून आपोआप पोटात जाते तेच खरे भोजन समजावे. भाजी वरण चटणी इत्यादीत मसाले वगैरे निरनिराळ्या प्रकारच्या वस्त् अशासाठीच टाकल्या जातात की त्यायोगे जास्तीत जास्त अन्न पोटात जाते. आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न पोटात जाण्याने काही दिवसानंतर मंदाग्नीचा रोग उत्पन्न होतो. फक्त बौद्धिक काम करूनच जीवन घालवु नये. परमेश्वराने मनुष्य शरीरात फक्त मेंदूच दिलेला आहे असे नाही, तर इतरही अवयव दिले आहे. त्या सर्व अवयवा पासून देखील काम करून घेतले पाहिजे. शारीरिक श्रम न करता फक्त बौद्धिक काम करणाऱ्यांना मंदाग्नीचा विकार फार लवकर जडतो.
मंदाग्निची साधारण लक्षणे –
अग्निमांद्य रोग झाला असता, खाल्लेले अन्न पचवत नाही, अन्नावर वासना नसते, भुक लागत नाही, शौचास साफ होत नाही, काही प्रसंगी जुलाबही होतात, सर्व रोगांचा राजा अग्निमांद्य आहे, म्हणुनच अग्नी प्रदीप्त होऊन पचनशक्ती वाढविण्याविषयी उपाय अवश्य करावे. उपेक्षा केली असता अतिसार, आमांश, उदर, संग्रहणी, उदर, मूळव्याध, क्षय वगैरे भयंकर रोग होतात. मधून मधून शौचास साफ न होणे, कधी मलबद्धता तर कधी पातळ शौचास होणे, भूक नाहीशी होणे, पोट फुगणे, पोटात वात धरणे, पोट दुखणे, पोट भारी वाटणे, ढेकर येणे, जीव मळमळणे, छातीत जळजळ, वांति, तोंडाला पाणी सुटणे, आळसटल्या सारखे वाटणे, श्वासोच्छवासाबरोबर दुर्गध येणे, छाती धडधडणे, डोके दुखणे, चांगली झोप न लागणे इत्यादीमुळे मंदाग्नीचा रोगी हळूहळू अशक्त व रक्तहीन होऊ लागतो. मंदाग्नीच्या रोग्याने आपले दात अवश्य तपासुन घ्यावे कारण मंदाग्नीच्या रोग्यास बहुधा दंतरोग होतो किंवा दंतरोग होऊन मंदाग्नी होतो.
अग्निमांद्याची मुख्य कारणे
पुर्वी या रोगाचे आज एवढे व्यापक प्रमाण नव्हते. पण हल्ली हा रोग घरोघरी आढळतो. याचे कारण अगदी उघड आहे. भुकेपेक्षा अधिक खाणे, वाजवीपेक्षा जास्त श्रम करणे, झोपेचा अभाव, अवेळी खाणे, अनावश्यक पेय पिणे, रुक्ष पदार्थ खाणे, शिळे अन्न किंवा शिळे पदार्थ खाणे, मलावरोध करणे, पण आमच्या अज्ञानाने, छंदिष्टपणाने किवा तयार खाद्य पेय, किंवा चहा, कॉफी, मद्य, सोडा, कोल्ड्रिंक्स, इत्यादी निरुपयोगी पेये व जाहिरातीत दाखवलेलीअनावश्यक केक, बिस्किटं, फ्रोझन पदार्थ, ब्रेड, साॅस, शिळे डबाबंद पदार्थ निष्कारण खातो. यास्तव सुज्ञांनी विचार करून यापासून अलिप्त राहावे.
पाचकरसाची कमतरता, पाचकरसाची उत्पत्तीच अपुरी होते त्यामुळे व्हावे तसे अन्नाचे पचन होत नाही. कोठ्याच्या स्नायुंची इतकी दुर्बलता असते की, अन्न कोठ्यातून योग्य वेळी खाली ढकलले न गेल्यामुळे ते निरोगी स्थितीतल्यापेक्षा अधीक काल तेथेच राहते.
पण एकदा अग्नि बिघडला म्हणजे मात्र इतर अल्प शुल्लक कारणे ही अग्नि जास्त बिघडवण्यास पुरेसे होतात आणि पौष्टिक अन्न तर राहोच, पण साधे व हलके अन्नही पचेनासे होते. मग क्षीणता येते,आणि अखेर शरीरक्षय होतो. याकरिता हा रोग न होण्याविषयी आहाराचे नियम पाळावे हेच इष्ट आहे.
अग्निमांद्यावर उपाय
आरोग्याच्या नियमाचे पालन न केल्यास मंदाग्नीची चिकित्सा करणे व्यर्थ आहे. एखाद्या औषधाने मंदाग्नि नष्ट होईल परंतु तो फक्त काही काळापुरताच. म्हणून मंदाग्निच्या रोग्याने औषधापेक्षा आरोग्याच्या दिनचर्या, ऋतुचर्येच्या नियमानुसार वागण्यावर अधिक लक्ष द्यावे. नियमांचे पालन करीत असतानाच औषधाचे सेवन केल्यास रोग्याला लवकर बरे होता येते.
अग्निमांद्य पथ्यापथ्य –
- मंदाग्निच्या रोग्याचे भोजन हलके व पुष्टकारक असावे. अन्न फार थोडे किंवा मुळीच खाऊ नये.
- फळातही नारंगीचे सेवन उत्तम आहे. कच्ची किंवा पिकलेली पपई फार गुणकारी आहे.
- तेलकट पदार्थ, खवा, मसाला, लोणचे, तिखट पदार्थ, मिठाई, गुळ, मद्य, तंबाखू इत्यादि खाऊ नयेत.
- आहारात तुपाचा समावेश अवश्य असावा. जाड कणकेची पोळी व पाणी (मांड) न काढलेल्या तांदुळाचा भात खाणे हितकर आहे.
- लिंबू, आले, पुदीना किवा सांबार खाणे लाभदायक आहे. मधून मधून उपवास करून पोटाला विश्रांती देणे आवश्यक आहे.
- जे काही खातो ते हळू हळू व चांगले चावुन चावुन टीवी, मोबाईल, गप्पा न मारता खावे.
- जेवताना जास्त पाणी पिऊ नये नये. जेवणानंतर अर्ध्या तासाने तहान लागल्यावर पाणी प्यावे.
- मंदाग्नीच्या रोग्याने खाण्याचा लोभ मुळीच करू नये. हे नक्कीच लक्षात ठेवावे की, खाल्लेले पदार्थ चांगल्या रीतीने पचतील तरच ते शरीराला उपयोगी पडतील खाल्लेले अन्न पचलेच नाही तर ते अन्न निरनिराळे विकार उत्पन्न करते. म्हणून नेहमी भुकेपेक्षा थोडे कमी खावे.
वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे