पुटपाक
पुटपाक हा नेत्रतर्पणानंतर केला जाणारा एक चिकित्सा उपक्रम आहे. तर्पणानंतर डोळ्यास आलेली क्लिन्नता दूर करण्यासाठी, नेत्रबल वाढविण्यासाठी पुटपाक उपक्रम केला जातो. नेत्रतर्पणाने डोळ्यातील दोष, रोग शांत झाल्यानंतरच पुटपाक द्यावा. तर्पण करण्यायोग्य व्यक्तीमध्येच किंवा रुग्णांमध्ये पुटपाक केला जातो. पुटपाकासाठी वापरली जाणारी औषधे व डोळ्यांच्या विविध रोगांमध्ये केल्या जाणाऱ्या उपयोगानुसार पुटपाक तीन प्रकारे करता येतो.
पुटपाकाचे प्रकार
१ ) स्नेहन पुटपाक :-
स्नेहन पुटपाकामध्ये पाण्यातील प्राण्यांचे मांस, मेद, वसा, मज्जा, गोड पदार्थ, स्निग्ध औषधीद्रव्य, जीवनियगण, काकोली, क्षीरकाकोली, यष्टी, शतावरी, जीवन्ती इ. औषधांचा उपयोग करतात.
उपयोग :
स्नेहन पुटपाकाचा डोळे कोरडे पडणे, संकोचित होणे, मलिन होणे, तिरळे होणे, पापण्या कोरड्या पडणे, वाकड्या होणे, पापण्यांमध्ये टोचल्याप्रमाणे वाटणे, पापण्यांचे केस गळणे, फार मोठे होणे, केस न येणे, डोळे चोळू वाटणे, डोळ्यांतून अश्रू न येणे किंवा जास्त येणे इ. आजारांमध्ये उपयोग करतात.
२ ) लेखन पुटपाक :
लेखन पुटपाकामध्ये जंगलातील पशू व पक्षी या प्राण्यांचे मांस, यकृत, मौक्तिक, प्रवाळ, शंख, तांबे, लोह, स्त्रोतोंजन, सैंधव, हिराकस, सुरमा इ. लेखन करणारी औषधी द्रव्ये, दही, दह्यावरील निवळी, मध यांचा उपयोग करतात.
उपयोग :
लेखन पुटपाक डोळे जड होणे, डोळ्यांना सुज येणे, डोळे चिकटणे, चिकट स्त्राव येणे, खाज येणे, वारंबार मल येणे, दृष्टि मंद होणे, धुसर दिसणे, डोळ्यामध्ये मांस वाढणे, डोळ्यामध्ये मंद वेदना होणे इ. डोळ्यांच्या आजारांमध्ये उपयोग करतात.
३ ) प्रसादन व रोपन पुटपाक :
पुटपाकामध्ये जंगलातील पशू, पक्षी यांचे मांस, मज्जा, वसा, मधुर किंवा कडू औषधीद्रव्ये, गाईचे दूध, शेळीचे दूध, लिंब, पटोल, वसा, गुळवेल, पुनर्नवा इ. औषधी द्रव्यांचा उपयोग केला जातो.
उपयोग :
प्रसादन पुटपाक वातदोष, पित्तदोष व रक्तदोषामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या विकारांमध्ये / आजारांमध्ये उपयोग करतात. डोळे लाल होणे, जळजळ होणे, दुखणे, कमी दिसणे, ऊन, प्रकाश सहन न होणे, पापण्या लाल होणे, डोळ्यांना दोर्बल्य येणे इ. डोळ्यांच्या आजारांमध्ये उपयोग करतात. रोपण पुटपाकाचा प्रामुख्याने डोळ्यास जखम झाल्यास किंवा मार लागल्यास उपयोग केला जातो.
वरीलप्रमाणे सांगितलेली औषधी द्रव्ये बारीक कुटून त्याचा गोळा करून तो तेल लावलेल्या एरंड, कमळ, केळ यांच्यापैकी एका पानामध्ये गुंडाळावा. त्याभोवती कुश किंवा दोरा याने बांधावे. व त्यावर दोन बोटे जाडीचा चिकण मातीचा लेप करावा. मातीच्या गोळ्यास गोवर्यांच्या निखाऱ्यातून लाल झाल्यानंतर काढून बाजूला घेऊन माती, दोरा व पाने काढून आतील औषधाचा गोळा एका पातळ वस्त्रामध्ये घेतला जातो. व त्याचा रस काढून वस्त्रगाळ करून तर्पणविधीप्रमाणे डोळ्यांवर धारण केला जातो.
पुटपाकानंतर ऊन, आकाश, आरसा, तीव्र प्रकाश, वारा, अगदी लहान पदार्थ पाहण्याचे टाळावे. पुटपाकानंतरही तर्पणाप्रमाणेच औषधी धुमपान व सुखोष्ण पाण्याने तोंड धुवावे.
योग्य पुटपाक झाल्यास वरील डोळ्यांचे आजार नि:संशयपणे बरे होतात. बुबुळावरील तांबड्या रेषा, डोळ्यांसमोर येणार काळे डाग, रेषा, डोळ्यांवर कामाचा येणारा ताण, कॉम्प्युटर, टी. व्ही.मुळे डोळ्यांवर होणारा परिणाम, धूळ, ऊन, वारा, प्रदुषण इ.मुळे होणारे डोळ्यांचे आजार, मधुमेह, प्रमेह, अतिरक्तदाब व इतर शारीरिक आजारांमुळे होणारे डोळ्यांचे आजार किंवा नजर कमी होणे इ. डोळ्यांच्या आजारांमध्ये तर्पण व पुटपाक चिकित्सा उपक्रम आयुर्वेदिक डॉक्टरांकडून करून घ्यावा.
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9175069155
9028191155
वेळ
सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे