केस वाढीसाठी उपाय

सौंदर्याची कल्पना सुंदर केसांशिवाय पूर्ण होत नाही! काळे, लांब, घनदाट, निरोगी कुंतल म्हणजे सौंदर्यच अशी संकल्पना आहे. आरशात बघितलं की सर्वप्रथम आपण आपली केश रचना ठीकठाक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात, परंतु खरंच यांचा केसांना फायदा होतो का?

केसांची मूळ उत्पत्ती ही गर्भावस्थेत असताना साधारण ६ व्या महिन्यापासून होते. विशेषतः ८व्या महिन्यात बाळाला घनदाट जावळ येते. नैसर्गिक सुदर केसांचे बीज मातेच्या गर्भावस्थेतील आहार-विहाराला असते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केस हा आपल्या हाडांचा मळ आहे. हाडे चांगली सशक्त व सुदृढ असतील तर केस चांगले राहतात. हाडांचा काही आजार झाला झाल्यास केस भरपूर गळू लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. हाडांच्या आजारावर उपचार केल्यानंतर केसांची वाढ पूर्ववत सुरु होते. नख व केस हे अस्थिधातूच्या मलस्वरूपात तयार होत असतात. ज्यांचा अस्थिधातू श्रेष्ठ बलवान असतो अशा व्यक्‍तींमध्ये नैसर्गिकपणे केस व नखे यांची वाढ चांगली होताना दिसते.

केशस्वास्थ्याचा विचार करतांना आहारातील काही घटकांचा परिणाम होतो का हे समजणे पण आवश्यक आहे. शरीरातील रस रक्तादी धातू तर नख-केसांपर्यंत सर्व गोष्टी आपल्या आहारातूनच तयार होत असतात. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर शरीरातील धातूंमध्ये त्याचे परिणाम आजाराच्या स्वरुपात दिसू लागतात. केसांना पोषण मिळते आपल्या आहारतूनच. आहारात काही घटक कमी-अधिक होत असतील तर केसांच्या गळण्याला निमित्त होऊ शकते.

केसांचा विचार करताना प्रकृतीनुरूप वेगवेगळे स्वरूप आढळते. वात प्रकृतीमध्ये केस हे धूसर, पातळ, विरळ व कोरडे दिसतात, दुभंगलेले असतात. पित्तप्रकृतीमध्ये केस हे नाजूक, पिंगट रंगाचे, विरळ असतात. अशा केसांमध्ये घाम अधिक येतो. तेलकटपणा रहातो. कफप्रकृती व्यक्तींमध्ये सुंदर, घनदाट व काळेभोर केस हे वैशिष्ट्य दिसते. केसांची घनता व वाढ संतुलित असते. गळण्याचे प्रमाण खूप कमी असते कारण कफाच्या स्निग्ध गुणामुळे केसांची मुळे घट्ट बसतात.

सध्या दवाखान्यात येणाऱ्या अनेक स्त्री-पुरूष रूग्णांना विशेषतः वय १५ ते ४० मध्ये प्रामुख्याने केस गळण्याची तक्रार आढळते. पूर्वी थंडीमध्ये याचे प्रमाण अधिक असे, परंतु सध्या वर्षभरच रुग्ण केस गळण्याचे सांगतात. हवामानानुसार पावसाळा व उन्हाळ्यात केसात दमटपणा असल्याने टाळूची त्वचा ओलसर राहाते. त्यामानाने थंडीमध्ये त्वचा कोरडी राहाते. त्यानुसार केस गळण्याचे प्रमाण बदलते.

केसांचे विकार

केस गळणे, कोंडा होणे अणि अकाली पांढरे होणे हे मुख्यत: तीन आजार केसांच्या बाबतीत पहायला मिळतात. वास्तविक ह्यांना आजार म्हणावं का इथपासुनच सुरुवात करुया.

थोड्याफार प्रमाणात केस गळणे हे नैसर्गिक आहे. त्याला आजार म्हणणे योग्य नाही. हे प्रमाण जर खूप जास्त असेल तर मात्र आजार समजला पाहिजे आणि त्याचे कारण शोधून मग इलाज केला पाहिजे.

दुसरी तक्रार म्हणजे कोंडा होणे, कोंडा हा मुळात केसांचा आजार नसून केसांच्या खालची त्वचेचा (Scalp) आजार आहे.

अकाली केस पांढरे होणे हा आजार म्हणावा का? हा पण एक समजून घेण्यासारखा विषय आहे. ही तक्रार पित्तप्रकृती व्यक्तींमध्ये अधिक दिसतात. केसांचा मूळ रंग पांढराच असतो. मिलेनिन नावाचे एक काळे रंजक द्रव्य केसाला काळा रंग देते. वय वाढत गेल्यावर हे मिलेनिन निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते आणि म्हणून केसांचा रंग पांढरा होऊ लागतो.

केसांच्या समस्या – प्रमुख कारणे

सध्याच्या जीवनशैलीमध्ये जागरण, अनावश्यक मानसिक ताण, हॉर्मोन्सचा वाढत्या वयात होणारा बदल यामुळे शरीरात उष्णता वाढते.

केसांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ. मीठ म्हणजे केसांचा एक नंबरचा शत्रू. आहारात मीठ जास्त घेण्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे वाढते. ज्यांच्या खाण्यात मीठ व मिठाचे पदार्थ थोडे जास्त असतात त्यांचे केस तुलनेने कमजोर असतात व गळू लागतात. म्हणून केसांची खरोखर काळजी घ्यायची असेल तर किंचित वरचढ मिठापेक्षा थोडे अळणी अन्न घेणे आवश्यक आहे. लोणची, पापड, सॉसेस, वेफर्स, फरसाण ह्यांसारख्या पदार्थांमध्ये मुळातच मीठ भरपूर असते. तिखट, चमचमित, विरुद्धन्न पदार्थ शक्यतो टाळावेतच.

मानसिक ताण, चिंता, क्रोध हे केसांच्या समस्यांचे महत्वाचे कारण आहे. अशा मानसिक असंतुलनामुळे पित्ताची वाढ होऊन केसांना धोका संभवतो निद्रानाश, अतिबुद्धीची कामे, तणावात काम, सतत कॉम्पुटर समोर काम करणे, या मानसिक हेतूंमुळे जेव्हा केस गळण्याचे प्रमाण वाढते, त्यावेळी त्या हेतूंच्या विपरित चिकित्सा करावी.

पोटाचे आजार, अम्लपित्त, ग्रहणी, जुनाट ताप, सततची कावीळ, त्वचा रोग, टाळूच्या त्वचेची रूक्षता वाढल्याने व उष्णता वाढल्यानेही केस स्फुटीत होऊ शकतात, तुटू शकतात, केसाचा तुकडा पडू शकतो.

प्रदूषण हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा. पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिनेशन करण्याची पद्धत आहे. ह्या पद्धतीत क्लोरिनचे प्रमाण अधिक झाले व केस धुण्यासाठी असे पाणी वापरले तर केस गळती झपाट्याने होऊ लागते. ह्यावर सोपा उपाय म्हणजे स्नानासाठी वापरावयाचे पाणी २ – ३ तास बादलीत काढून ठेवावे. ह्याने त्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाते व केसांना होणारी इजा टाळता येते.

प्रदूषित हवा, त्यातील कमी झालेले प्राणवायूचे प्रमाण व वाढलेले इतर घातक वायु हे असंतुलन रोखणे जवळजवळ अशक्यच आहे. यामुळे देखील केसांच्या आरोग्यावर विपरीत परिमाण घडून केसांच्या तक्रारी वाढतात.

वर बघितल्याप्रमाणे ‘केस गळणे, कोंडा होणे आणि अकाली पांढरे होणे’ हे केसांचे तीन प्रमुख विकार आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केस हा आपल्या हाडांचा मळ आहे. हाडे चांगली सशक्त व सुदृढ असतील तर केस चांगले राहतात. हाडांचा काही आजार झाला झाल्यास केस भरपूर गळू लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. हाडांच्या आजारावर उपचार करुन ठीक झाल्यानंतर केसांची वाढ पूर्ववत सुरु होते.

शरीरात हाडांमध्ये वात दोष प्रामुख्याने असतो आणि वातासाठी सर्वात श्रेष्ठ औषध म्हणजे तेल. अशा प्रकारे केसांचा आणि तेलाचा अप्रत्यक्ष संबंध आहे. केसांना नियमित तेल लावणार्‍यांचे पण केस गळून टक्कल पडते तर काहीजण अजिबात तेल लावत नाहीत तरीपण केस गळत नाहीत. याचे कारण म्हणजे हाडांचे आरोग्य. शरीरात एक दोष वाढला की तो दुसर्‍या दोषाला कमी करतो. केसांच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो.

केसांच्या सुयोग्य पोषणासाठी आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांची व कॅल्शियमची नितांत आवश्यकता आहे. दूध, मांसाहार, द्विदल धान्य, सोयाबीन अशा पदार्थांमध्ये सकस प्रथिने असतात. तीळ, पालेभाज्या, केळी, संत्री, बदाम, कोबी, फ्लॉवर सारख्या अनेक गोष्टींमध्ये प्रचुर प्रमाणात कॅल्शियम असते. संपूर्णपणे शाकाहारी असणाऱ्यांनी ह्यांचे सेवन आहारात नियमितपणे केले पाहिजे.

अनुवांशिकता हे केसांच्या विकारांचे एक प्रमुख कारण आहे. केस हा पित्रुज भाव असल्याने वडिलांच्या गुणसूत्रानुसार ह्याचे स्वास्थ्य असते. अनुवंशिकतेचा विचार केला तर वडिलांचे केस ज्या विशिष्ट वयात गळू लागले त्याच वयात मुलांमध्येही केस गळती सुरु होऊ शकते.

आयुर्वेदात वर्णन केलेल्या काही वनस्पतींच्या सेवनाने ह्या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येते.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

best-ayurvedic-clinic-in-Pune

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

वेदाकेअर आयुर्वेद पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!