वय वर्ष 35 नंतर शरीराच्या होणारया झीजेमुळे वातप्रकोप होऊन मानदुखीचा आजार हा दिसुन येतो.
मानदुखीची कारणे:-
अतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्यातील जन्मजात विकृती, चुकीच्या पद्धतीने झोपणे, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग, डोक्यावर फार ओझे वाहुन नेणे इ. अनेक कारणांमुळे मानदुखी, खांदेदुखी अशी लक्षणे उत्पन्न होतात.
या व्यतिरिक्त संधीवात, आमवात, वातरक्त, तृतीयक आणि चातुर्थिक ज्वर (तापाचे प्रकार) याचा परिपाक म्हणुन सुद्धा लक्षणरुप खांदेदुखी व मानदुखी आढळते.
काही वेळा मानेतील जास्तीची बरगडी या आजाराचे कारण असु शकते. डाव्या हातातील, मानेतील,खांदयातील वेदना बर्याचदा हृदयविकाराची शक्यता दर्शवतात.
खुप जळजळीत,तिखट,आंबट,खारट पदार्थ खाणाऱ्या लोकांच्या बाबतीत रक्त, मांस, मेद बिघडून विश्वाचि, अवबाहुक ( कोपरापर्यंत किंवा हाताच्या पंज्यापर्यंत वेदना होणे ) हे आजार उत्पन्न होऊ शकतात.
मानदुखी उपाय:-
मानदुखीसाठी आयुर्वेदिय उपचारांची दिशा वरील आजारांसाठी पुढील प्रमाणे असते.
- वैद्याच्या देखरेखीखाली पंचकर्मातील वमन, विरेचन प्रथम करून घ्यावे. कोठ्याची याप्रमाणे शुद्धी झाल्यानंतर आयुर्वेदिय औषधे चांगला गुण देतात.
- संपुर्ण शरिराला तीळाचे तैल दररोज लावावे. नंतर गरम पाण्याच्या पिशविने किंवा फडक्याने शेकुन घ्यावे.
- दुखणाऱ्या भागावरती आठवड्यातून 3 वेळा 2 ते 3 जळवा लावून रक्तमोक्षण करावे.
- दोन्ही नाकपुडीत जेवणानंतर बृहण नस्याचा वापर करणे अत्यंत लाभदायक असते.
- मानेला आणि खांद्याला लेप आणि अळशीचे पोटीस आलटून पालटून लावावे.
- अनुलोम विलोम, कपालभाती आणि उज्जायी या तीन प्राणायामांचा उपयोग करावा. व्यायाम आणि योगासने यांचा वापर वेदना कमी झाल्यानंतरच करावा.
- इतके उपचार करून सुद्धा ज्यांना उपशम येत नाही, त्यांना योग्य बस्तीचा वापर केल्याने व दररोज कोठा साफ ठेवल्याने चांगला गुण येतो.
- खाण्यामध्ये डाळी आणि फळभाज्या यांचा वापर करावा.
- रात्रीचे जागरण व दिवसा जेवणानंतर झोप या आजाराला वाढवते.
- पाठीच्या मणक्यातील गाठी, टी.बी इत्यादी आजारांसाठी तज्ञ वैद्याचा सल्ला घ्यावा.