आजच्या धावपळीच्या, इंस्टट, बैठ्या जीवनशैलीने दिलेल्या अनेक वरदान-शापाच्या यादीत सध्या सगळ्यांना सतावणाऱ्या आजारांमध्ये पोटाचे आजार अग्रणी आहे.
पोटाचे पचनाचे आजार व उपचार आहारशैलीत झालेला बदल, व्यायामाचा अभाव, शारीरिक मेहनती ऐवजी यंत्रांचा वाढता वापर, वाहनाचा अतिरेक, वाढलेले वजन, बैठी जीवनशैली ही कारणे दिसतात. रूग्ण दवाखान्यात येतो, सोबत रिपोर्टची थप्पी असणारी फाईल असते, सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात, पण तरीही रूग्णाची तक्रार असते की, डॉक्टर फ्रेश वाटत नाही, झोपावेसे वाटते, कितीही झोपले तरी झोप पूर्ण होत नाही आणि विशेष म्हणजे हा जडपणा कोणत्याही टेस्टमध्ये येत नाही.
चुकीचे खाणे, जेव्हा खायचे तेव्हा न खाता चुकीच्या वेळी खाणे रात्रीचे जागरण करणे, कँटीनचे जेवण, हॉटेलींग, रात्रीचे जागरण, फ्रोझन फुड्स, इन्स्टन्ट रेडी टू ईट, जंक फूड, पिझ्झा, बर्गर,तळलेले/आंबवलेले पदार्थ, गिरणीवर दळलेली कोंडा काढून टाकून खाण्यात येणारी पिठे
मैद्याचे पदार्थ अधिक प्रमाण खाणे, पॅकेज ज्यूस, हॉटेलमधील रसायनमिश्रित पदार्थ, चायनीज/ इटालिअन सॉस, ताज्या पदार्थांचा आहारातील अभाव, शीतपेयांचे / सोडा असलेली पेये यांचे प्रमाण आहारात वाढणे, ताज्या फळांचा आहारातील अभाव, पचायला जड अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश, चहाकॉफीचा अतिरेक, मद्य धूम्रपानादि व्यसने वाढणे.
आहारात नियमितपण नसणे, तासन्तास कॉम्प्युटर, मोबाईल किंवा टि.व्ही. समोर बसणे, सतत खात रहाणे, अनेक दिवस शौचाला न जाणे. डोक्यावरील ताण, सतत विचार यामुळे मनापासून न जेवणे, अवेळी खाणे, जरूरीच्या मानाने कमी-अधिक खाणे, एखाद्या ठराविक देशात, काळी, निःसत्व खाणेपिणे यामुळे समाजात आरोग्याचा ऱ्हास होतोय.
बुध्दिजीवी, पांढरपेशी व्यक्ती व श्रमजीवी सर्वच वर्गात ही परिस्थिती आढळते. आपल्या प्रकृतीला, शरीरश्रमांना देशपरिस्थिती काल स्वरूपाला अनुरूप आहार न घेतल्याने पोटाचे विकार उत्पन्न होतात.
या सगळ्यांचा दुष्परिणाम शारीर अग्निवर होतो. ज्याचा अग्नि दीप्त किंवा चांगला आहे तो अनेक वर्षे निरोगी जीवन जगतो. अन्नपचनाला मुख्यतः अग्नि म्हणजेच शरीरातील पित्त हे कारण आहे. अग्नि शरीरात पित्ताच्या आश्रयाने रहातो. रसापासून रक्त बनणे हे धातूंचे पचनही धात्वग्निवरच अवलंबून असते.
आपण जो आहार घेतो, त्या आहाराचे पचन होऊन आपले दोष, धातु, मल हे पोसले जाणे हे खरे अग्निचे काम आहे. अग्निमांद्य होऊन त्यातून अजीर्ण, मलावष्टंभ, जडपणा, आळस याला सुरूवात होते. आमविष (न पचलेले विषारी अन्न) तयार होऊन शरीरात आजारसदृश्य स्थिती निर्माण होते व कोणत्याही क्षणी शरीर व्याधींचा बळी ठरू शकते.
भूक न लागणे, पोट साफ न होणे, गॅसेस, छातीत जळजळ, करपट ढेकर, घशात आंबट पाणी येणे, कामात उत्साह नसणे, शौचास वारंवार चिकट होणे, पोट दुखणे, कमी खाऊनही वजन वाढणे, चेहरा निस्तेज होणे, खुप तहान लागणे, बद्धकोष्ठता, मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन म्हणजेच रोजच्या भाषेत – पोट साफ न होणे.
मळभाग नीट तयार न होणे, तुकडे-तुकडे, पाणी अशी स्फुटीत मलप्रवृत्ती, शौचाला चिकट, फेसकट मलप्रवृत्ती, आव पडणे, पोट साफ झाल्यावर समाधान न होणे, जीभेला पांढरट थर रहातो, आणि पोट साफ झाल्याचे समाधानही होत नाही, इत्यादी प्रत्येक लक्षण तुमचे पोट बिघडल्याचे सुचित करते.
बदललेल्या जीवनपद्धतीमुळे पोटाचे आजार हि केवळ एवढीच व्याप्ती नसून याचा परिणाम म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीची कार्यक्षमता, तत्परता, एकाग्रता अनेक पटीने कमी झाली आहे. अनेक रुग्ण अभ्यासात लक्ष न लागणे, बुद्धि, स्मृति, एकाग्रता वाढविणे, वाचलेले लक्षात न राहणे, परीक्षेला किंवा इंटरव्हूला बसल्यावर छातीती धडधड होणे इत्यादी समस्या घेऊन येतात.

वरवर पाहता पोटाच्या तक्रारी या किरकोळ समस्या वाटत असली तरी त्यामुळे होणारे दुष्परिणाम अत्यंत भयावह असतात. जसे मधुमेह, हृद्रोग, उच्चरक्तदाब, आम्लपित, हाडी ताप, रक्त कमी, अलर्जी सर्दी खोकला, मासिक पाळीचे आजार, मायग्रेन, स्वप्नदोष, वंध्यत्व, मुळव्याध, भगंदर, फिशर, संधिवात, आमवात, विविध त्वचाविकार, झोपेच्या तक्रारी, केसांच्या तक्रारी, डोळ्यांच्या तक्रारी, वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, शरीराची योग्य वाढ न होणे इत्यादीचे मुख्य कारण खराब पोट आहे.
पोटाचे आजार व उपचार
पोटाचा आजार असल्यास लगेच सावध होणे आवश्यक आहे, कारण पोटाकडे दुर्लक्ष केले तर मोठमोठे आजार आपल्या शरीरात पाय रोवायला सुरुवात करतात. बऱ्याच लोकांना तर आपले पोट खराब आहे हेच समझत नाही. त्यामुळे वारंवार तात्पुरते उपचार केले जातात आणि ज्यावेळी लक्षात येते त्यावेळी शरीर हे बऱ्याच आजारांचे घर झालेले असते.
रोज सकाळी नियमित रितीने मलविसर्जन झाले की शरीर शुद्ध व हलके वाटते. मन उत्साही व आनंदी होते. सर्व दिवस उत्साह टिकतो. ज्यादिवशी पोट खराब होतो तेव्हा शरीर जड रहाणे, भूक न लागणे, अन्नाची रूचि व स्वाद नीट न लागणे, तोंडाला वास येणे, तोंडाला चिकटपणा असणे, जेवणावरची इच्छा जाणे, तसेच मन उत्साही नसणे ही लक्षणे दिसतात.
ज्यांना मलावरोधाची सवय असते, त्यांना महिनोंमहिने अशाच अवस्थेत जातात. अधिकश्रमाने थकवा येतो. पर्यायाने संपूर्ण आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे प्रयत्नपूर्वक नव्याने झालेले किंवा कितीही जुने असलेले पोटाचे विकार बरे केले पाहिजे. यासाठी औषध, आहार व व्यायाम ह्या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे.
पोटाचे रुग्णांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की या रुग्णांमध्ये पोटांच्या तक्रारीसोबतच प्रचंड मानसिक तणाव, डिप्रेशन, भीती, आत्मविश्वास नसणे, चिडचिड, वैफल्य, कमालीची उदासीनता, गोष्टी विसरणे, खुप आळस, अनेक लैंगिक समस्या, मुल न होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसतात. विशेष म्हणजे यातील ९० % रुग्णांचा वयोगट हा २० ते ३५ वर्ष हा आहे, म्हणजे मोठ्याप्रमाणावर आपली तरुणपिढीला याने पोखरलेले आहे. आणि बऱ्याच जणांना याची कल्पना ही नाही.
प्रत्येक रुग्णाला आयुर्वेदिक पद्धतीने पूर्ण तपासून, नाडीपरीक्षानाद्वारे निदान करून, योग्य औषधोपचार, आहार-विहार मध्ये बदल आणि पंचकर्मद्वारे आजाराची तीव्रता लगेच कमी केली जाते. चांगले खाणे-पिणे-वागणे, योग्य आयुर्वेदिक औषधे, पंचकर्म यांच्या मदतीने पोटाच्या सर्व तक्रारी आणि आणि त्यातून उत्पन अनेक आजारांवर यशस्वीपणे मात करता येते.
मोठमोठ्या डॉक्टरांकडे अनेक वर्ष लाखोरुपये खर्च करूनही बरे न होणारे आणि शेवटी हा तुमचा मनाचा आजार आहे म्हणून बोळवण केलेल्या रुग्णांना आयुर्वेदाने पुनर्जन्म दिलेला आहे.
आयुर्वेद आणि पंचकर्म यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बाजार मांडला आहे, त्यामुळे आयुर्वेदिक उपचार घेतांना आपण योग्य आणि तज्ञ वैद्याकडून घेत आहोत याची खात्री करून घ्यावी, तज्ञ वैद्याच्या सल्ल्याशिवाय आयुर्वेदिक औषधे खाणे हे आरोग्यास खुप हानिकारक ठरू शकते.
त्यामुळेच रोगाच्या सुरूवातीच्या अवस्थेत घरगुती उपायांचा, पेपरमध्ये वाचून, पुस्तकात वाचून, जाहिरातीमधील औषधांचा मारा केला जातो. वैद्यकीय सल्ला घेऊन प्रकृती, ऋतु इ. चा विचार करून औषधांची निवड करावी लागते. हा विचारही त्यांच्या मनात येत नाही. त्यामुळे सर्रास सारक औषधे घेतली जातात.
पोट विकार तज्ञ- पोटाचे डॉक्टर
आयुर्वेद शास्त्राने व्याधी होऊच नये यासाठी अर्धे ज्ञान हे दिनचर्या, ऋतुचर्या, आहारविधीविधान असे नियम (स्वास्थ्याचे) सांगण्यात खर्च केले आहे. यातील असे नियम संकलित केले आहेत, ज्यांचा शरीर स्वास्थाची जवळचा संबंध आहे. आहारविहारातील अशा नियमांचे पालन केल्यास पोटाचे आजार,त्यामुळे होणारे दुष्परिणाम व अन्ततः विकारी मन यापासून लांब रहाता येईल.
पोटाला औषधांनी बनवलेले तेल लावणे. नंतर खरखरीत टॉवेलने पुसून काढून घ्यावीत. यामुळे स्थानिक त्वचा कार्यक्षम रहाते.
बैठी कामे करणाऱ्यांनी दिवसातून फक्त दोनच वेळा माफक आहार घेऊन थोडा तरी पोटाचा व्यायाम करणे जरूरी असते.
पुष्कळ पाणी प्याले की हा विकार नाहीसा होतो असे काही लोक सांगतात. पाणी गरज नसताना प्यायले की त्याचे अजीर्ण होते, अग्नि मंद होतो. तहान लागेल तेव्हाच व आवश्यक तेवढेच पाणी प्यावे. पाणी उभ्याने, घाईघाईत पिऊ नये. तहान लागल्यावरच माफक प्रमाणात तोंड ग्लासला लावून घोट घोट प्यावे. वरून पाणी पिऊ नये. जेवणाच्या सुरूवातीला व लगेच पाणी पिऊ नये,जेवतांना घोट – घोट पाणी प्यावे.
मिताहार हाच हिताहार… एकभुक्त योगी, द्वीभुक्त भोगी तर त्रिभुक्त रोगी यातील मर्म विसरू नका. जेवण नीट चावून खा. फार घाईने अन्न गिळू नका. दात फक्त तोंडात असतात, पोटात नाही हे ध्यानात ठेवा. तोंडात लाळेसोबत अंशतः पचन होत असते. ते नीट न झाल्यास आतड्यांवर ताण येतो. सावकाश म्हणजेच थोडी जागा वाताच्या चलनवलनास शिल्लक ठेवून जेवा. पोटाला तडस लागेल एवढे जेऊ नका.
कारण नसतांना सतत पोट साफ करणारी औषधे घेऊ नका. त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते. तीव्र रेचके वारंवार घेतल्यने स्वास्थ्यरक्षणाचा पायाच ढासळतो. अधूनमधून जाड रव्याचा सांजा, भरड भाजणीचे थालीपीठ, अळूची भाजी, पेरू, आंबा, मनुका, अंजीर इत्यादी जे उत्कृष्ट सारक आहे ते खावे.
ऋतूप्रमाणे बदलणारे आहार-विहार असावे. उदा. काकडी उन्हाळ्यात थंड असते, तर हिवाळ्यात कफ करू शकते. अंजीर, मोसंबी, मनुका, पेरू, डाळिंब, सफरचंद, आंबा, आवळा, चिकू, पिकलेले अननस, छोटे ,गोड द्राक्षे खावीत. फळे जेवणापूर्वी व जेवणानंतर 2 ते 3 तासांनी खावीत.
आहार षडरसात्मक असावा. तिखट, मसाले बेतानेच वापरावेत. बटाटा, हरबऱ्याची डाळ अधिक नको. तुरट-कडू रस थोड्या प्रमाणात का होईना जेवणात असावा.
जेवणानंतर शतपावली अवश्य करा. लगेच झोपू नये.
मन, जीभ व पोट यांना सैल सोडू नका! खरोखरच पोट अधूनमधून आत घेणे, आवरणे, आरोग्यदायक आहे. त्याने कोष्ठस्थ इंद्रिये दक्ष व कार्यक्षम रहातात.
बसताना, उभे रहाताना नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवा व श्वासोच्छवासही पूर्ण घ्या. पोक काढणे, गलथान उभे रहाणे, बसणे टाळा. एवढ्यानेही आरोग्याची अर्धी लढाई जिंकता येते.
जीभ व पोट आवरता आले पाहिजे. जीभेसाठी नव्हे तर पोटासाठी जेवावे. वजन सुयोग्य राखणे, कमी-जास्त करणे हे आपल्याच हाती आहे.
स्त्रियांना आरोग्यासाठी व शरीरसौष्ठवासाठी व्यायाम हा अधिक हितकर व सुलभ असतो. मासिक पाळी, गर्भारपणीचे पहिले व शेवटचे अडीच महिने व प्रसूत्यूत्तर तीन महिने काळ व्यायामास वर्ज्य आहे.
व्यायाम शांतपणे, लयबद्ध, क्रमवार करावा. रिकाम्या पोटी करावा. श्वासोच्छ्वासही तोंड बंद करून नाकाने करावा.
सकाळचे जेवण 10 ते 1 दरम्यान करणे. रात्रीचे जेवण 5 ते 7 दरम्यान करणे. जेवणाची दररोजची वेळ नियमीत ठेवावी. रात्रीचे जेवण व झोप यामधे 2 ते 3 तासांचे अंतर असावे. जेवतांना टी. व्ही. पाहणे, गप्पा मारणे, मोबाईल,चिंता हे टाळावे. दररोज रात्री उशीरा जेवु नये.
ऋतूनुसार फळभाज्या चालतील, पालेभाज्या पोटात आग, जळजळ होत नसेल तर चालतील अन्यथा बंद करणे.
हलके पदार्थ – उपीट, शिरा, भाजणीचे थालीपीठ, भाजलेल्या लाह्यांचा चिवडा चालेल, साळीच्या लाह्यांचा चिवडा चालेल.
शिळे पदार्थ – फोडणीचा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे पदार्थ – शिळया भाज्या, भाकरी, पोळी, शिळीकढी, आमटी, फ्रीजमध्ये ठेवलेल्या मळलेल्या कणकेच्या पोळ्या बंद करणे.
बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, हरबऱ्याचे पदार्थ,तिखट तेलकट, चमचमीत पदार्थ, समोसा, कचोरी, पाणीपुरी, भेळ, भडंग, रगडा पॅटीस इ. बंद करणे.
रात्री जागरण व दिवसा झोपणे टाळावे. रात्री जागरण झाल्यास जितके तास जागरण झाले त्यातील निम्मा वेळ सकाळी जेवण्याआधी झोपावे.