अम्लपित्त टाळा स्वतःला वाचवा | Ayurvedic Medicine for Acidity

घसा व अन्न नळी यांची जळजळ करीत तोंडावाटे आंबट अथवा कडु चवीचे पिवळ्या रंगाचे पित्त पडते. या पित्ताबरोबर न पचलेले अन्नही पडते. पित्ताने होणारे अजीर्ण म्हणजे विदग्धाजीर्ण होय आणि हेच अजीर्ण फारच वाढले म्हणजे अम्लपित्ताचा-अ‍ॅसिडिटी-Acidity विकार होतो.

अम्लपित्त कशामुळे होते | Causes of imbalance in the Amlapitta dosha?

  • आहार विहारातील चुकीच्या सवयी
  • पित्त वाढविणाऱ्या अन्नाचे सेवन – तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट खाणे.
  • पावटे, कुळीथ, भात, पित्तकारक पदार्थांनी वगैरे आंबट विपाक होणारे पदार्थ जास्त खाणे
  • प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे
  • जास्त उकळलेला चहा, कॉफी, ब्लॅक टी, लेमन टी. सारखे पीणे.
  • सिगरेट, अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ सेवन करणे.
  • व्यायामाचा अभाव, आळस, जेवल्यावर झोपणे, दिवसा झोपणे
  • मासांहारी पचनास जड पदार्थ खाणे.
  • अतिशय उशीरा जेवणे, रात्री भरपूर जेवणे.
  • सतत चिंता, राग, मानसिक स्वास्थ नसणे, भावनिक ताणतणाव, झोप नसणे, जागरण
  • पाण्याचे चुकीचे सेवन.
  • जास्त गरमीत प्रवास अथवा आगी शेजारी काम करणे, अतिश्रम, अधिक उन्हात फार वेळ राहणे किंवा सतत उन्हात काम करणे, शेतात काम करणे.
  • मैथून क्रिया अधिक करणे याने शरीरात उती प्रमाणात उष्णता निर्माण होऊन परिणामी पित्त वाढते.विशेषतः उन्हाळ्यात ही क्रिया करणार्या मंडळीना जास्त त्रास होतो.
  • बध्दकोष्ठ, खाणं न पचणे,गँसेस तयार होण्याची क्रिया सतत होणे.
  • जेवणाच्या वेळा निश्चित नाही.
  • मोहरीचे तेल अतिप्रमाणात खाणार्या मंडळींना, तसेच फिल्टर केलेले तेल खाणारी मंडळी.
  • वरचेवर अजीर्ण झाले असता त्यासाठी आवश्यक उपचारांकडे दुर्लक्ष करणे,
  • पोटात वायू जास्त प्रकोपीत होणे.
  • इतर रोग, आमाशयात पित्ताची अतिरिक्त वाढ.

वर लिहिलेल्या कारणांनी आमाशयात पित्त वाढते त्यावेळी पित्ताचे प्रमाण अधिक झाल्यामुळे अन्न पचत नाही अथवा अर्धवट पचते, त्यामुळे अधिक झालेले पित्त व अर्धवट पचलेले अन्न यामुळे आमाशय बिघडतो. आमाशयाची आतली त्वचा सुजते, तिला चिरा पडतात व काही दिवसांनी आमाशयाच्या आतील त्वचा जाड होते, सुज येते. यामुळे आमाशयातील वायु व कफ हे दोषही बिघडतात त्यामुळे प्रथम पित्तामुळे होणारा विकार पुढे त्रिदोषात्मक होतो. अजीर्ण नियमित होत असल्यामुळे अजीर्णाची लक्षणे दिसत असतात. जेव्हा पक्वाशयाच्या वरच्या व आमाशयाच्या शेवटच्या भागाला सूज येते त्यावेळी आमाशयातील अन्न पक्काशयात जाण्यासही अडचण होते.

आमाशयात पित्त वाढण्याची सुरुवात होते तेव्हा फक्त दररोज घशाशी जळजळणे व थोडेसे अपचन आणि आंबट उलटी एवढीच लक्षणे असतात. असे काही दिवस सुरु राहिल्यावर पुढे आमाशयाच्या त्वचेचा अम्लाने दाह होतो. त्या वेळी पोटात आग, तहान, खोटी भूक, थंड पदार्थांची आवड व ज्या भागात दाह (आमाशयाची आतील त्वचा सोलल्यासारखी होणे) असेल तेथे चुणचुणल्यासारखे दुखणे ही लक्षणे होतात.

यापुढील अवस्थेत आमाशय विस्तार पावतो, त्यामुळे पाठीत व बरगड्यात खुपल्यासारखे दुखते. सुजल्यामुळे आमाशयाची त्वचा जाड होते व ही सुज पक्काशयाच्या तोंडाजवळ आल्यावर आहाररस पक्काशयात पुढे सरकण्यास अडचण होते व जो आहाररस पक्काशयात हळूहळू जातो, तो जात असता पोट दुखते. हाच विकार अन्ननळीच्या आमाशयाच्या तोंडाजवळ होतो, त्या वेळी अन्न पोटात जाताना खुपते. अन्न पोटात न जाता छातीतच अडकले असे रोग्याला वाटते. ही या रोगाची तिसरी अवस्था आहे. यापुढील अवस्था म्हणजे आमाशयात छिद्र पडणे किंवा जखम होणे ही आहे.

आंबट अथवा कडु चवीचे पित्त घशाशी जळजळून ओकून पडणे हे मुख्य लक्षण आहे. उलटी बहुतकरून जेवल्यावर एक ते चार तासांच्या दरम्यान होते. पोटात असलेले सर्व अन्न व त्याबरोबर पिवळे, तांबूस, हिरवट रंगाचे पित्त पडते, त्याला एक प्रकारचा आंबुस वाईट वास येतो. सर्व पित्त पडेपर्यंत उलटी-मळमळ होत असते. उलटी होतेवेळी घाम सुटतो, तोंडाला पाणी सुटते, अंगावर शहारे येतात. पित्ताचे आधिक्य असल्यास उलटी पातळ पाण्यासारखी होते, परंतु कफमिश्रित असल्यास वांतीतील पदार्थ दाट, चिकट, फेसाळ व कमी आंबट असतो आणि वांतीही थोडथोडी अडकत अडकत होते. केव्हा केव्हा खारट अथवा किंचित गोड अशीही उलटी होते.

अम्लपित्त-amlapitt-acidity

पित्ताचा प्रकोप अधिक असल्यास जेवणापूर्वीही वांति होते. छातीत व कुशीत आग होते व डोके दुखते.

उलटी साफ झाली म्हणजे डोके दुखणे कमी होते. रोग्याच्या लाळेची चव आंबट होते व दात नेहमी शिवशिवतात. केव्हा केव्हा अंगावर पित्ताच्या गांधी – शितपित्त उठतात. अरुचि, हातापायांची आग, बारीक ताप, कंप, रागीटपणा, चेहरा तांबूस असणे, बेसावधपणा, अंग गळणे, पोट दुखणे, डोळ्यांपुढे अंधेरी येणे ही लक्षणे होतात. या विकारात अजीर्ण नियमित होते असते व अजीर्णाच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळी लक्षणे दिसतात. हा विकार सावकाश वाढतो.

अम्लपित्तविकारामुळे अनेक आजार उत्पन्न होतात. याचे कारण अम्लपित्तरोग म्हणजे एक प्रकारचे अजीर्णच होय. अर्थात अजीर्ण फार दिवस राहिले म्हणजे पोट साफ होत नाही, गुल्म, जेवल्यावर पोट दुखणे, मूळव्याध, जुनाट ताप, रक्त कमी वगैरे अश्या अनेक रोगांस कारण ठरते. अम्लपित्त जेव्हा अस्थिधातुगत होते, त्यात संधिशूल, अस्थिक्षय आदी लक्षणे रुग्णात आढळतात.

अनेक वेळा असे आढळते की, डोके दुखणे, दमा, ताप, पोट दुखणे हे विकार अम्लपित्ताने होतात. या विकारांना कारण असलेले अम्लपित्त उलटी होऊन पडत नाही. जेव्हा हे पित्त शरीरात मुरते त्या वेळी हे विकार होतात. अशा तऱ्हेचे अम्लपित्त काही ठराविक दिवसांनी तयार होते व त्याने होणारे विकार महिना पंधरा दिवसांच्या अंतराने होत असतात.

एक दोन दिवसांनी पित्त उलटीवाटे पडून गेले म्हणजे हे विकार आपोआप थांबतात व रोगी पुन्हा पित्त वाढेपर्यंत चांगला असतो. काही दिवसांनी विकार वाढला म्हणजे वरील डोके दुखणे, दमा वगैरे नियमित होते.

अम्लपित्तामुळे आमाशयात विद्रधी (गळु) होतो, अथवा यकृताचा विकार होऊन उदर होते किंवा आमाशयात जखमा अथवा मांसार्बुदाचा विकार (कॅन्सर) होतो. फक्त अम्लपित्त असलेल्या रोग्यास त्रास भोगावे लागता, परंतु मृत्यू येत नाही.

पित्तामुळे होणारे लक्षण आजार | Symptoms of Pitta Dosha Imbalance

  • घसा व छातीत जळजळ होणे.
  • तोंडात, घशात आबंट व खारट पाणी येणे.
  • करपट ढेकर येणे
  • पित्ताची उलटी होणे
  • पोटात आग पडणे
  • सतत पोट दुखणे
  • तोंडाला सतत कडू चव असणे किंवा पाणी येणे.
  • केस गळणे, केस पिकणे.
  • सतत डोके दुखणे
  • अंगावर पित्ताचे चट्टे (गांधी) उठणे
  • अति घाम येणे व त्याला दुर्गंधी असणे
  • झोप न लागणे
  • सतत खा-खा सुटणे (खोटि भूक लागणे)
  • सतत हातापायांची आग होणे
  • जेवल्यावर १-२ जुलाब होणे
  • कामात उत्साह नसणे
  • सतत जुलाबाचा त्रास होणे
  • अंगातून गरम वाफा येण्याचा भास
  • वारंवार तोंड येणे
  • जुलाब होणे, मूत्राचा रंग लाल किंवा पिवळी होणे.
  • मधेच जाग येऊन झोप न लागणे.
  • जास्त थकवा वाटणे.
  • बेशुध्दी, अंधारी,चक्कर येणे.
  • डोळ्याची जळजळ होणे, धूसर दिसणे.
  • अम्लदाह, पोटातील व्रण
  • उन्हाने त्वचेचा क्षोभ, इसब, मुरूम, त्वचेचे रोग
  • ताप, कावीळ, थायरॉइड ग्रंथीचे विकार
  • रक्तात गुठळ्या आणि पक्षाघात
  • मुत्रपिंडाचा संसर्ग
  • सांधेदुखी, सांध्यात वारंवार सूज येते.
  • झोपेत घामाघूम होणे.
  • तळपाय, तळहाताला प्रचंड घाम, वारंवार घाम येणे. घामाला वास येणे
  • चेहऱ्यावर तीळ, मस, पिंपल्स, डाग
  • अंगात ताप नसून अंग गरम जाणवते.
  • सतत खा खा होणे, तहान- थंड पदार्थ आईस्क्रीम, सरबत, पेय पिण्याची भावना होणे वाढते.
  • हातापायाची प्रचंड आग
  • सतत चिडचीड, औदासिन्य
  • मासिक पाळी होताना पोटात खूप दुखणे, पाळीस रक्तस्त्राव जास्त होणे, वारंवार घोणा फुटणे, रांजणवाडी,
  • मुळव्याध – शौचावाटे रक्त पडणे
  • घशाला कोरड पडणे.
  • डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे
  • त्वचा काळवंडतो अथवा छोटे छोटे त्वचा रोग होतात.
  • रोगप्रतिकार क्षमता कमी होणे.

अम्लपित्तासाठी रुग्णाच्या आहार व दिनचर्या यांची माहिती घेऊन औषधयोजना सुरु करावी लागते. अम्लपित्ताचा विकार पथ्यानेच अधिक लवकर व कायमचा बरा होणारा आहे म्हणून या विकारास पथ्य कोणते हे ठरवावे लागते. अम्लपित्ताच्या रोग्यास मानवणारे व न मानवणारे पदार्थ ठराविक सांगता येत नाहीत. तर ते रुग्णानुसार वेगवेगळे ठरवावे लागतात.

प्रकृतिभेदाने आणि पित्ताच्या विशेष स्वरुपामुळे एका रुग्णास जे पदार्थ मानवतात तेच दुसऱ्या रुग्णास त्रासदायक होतात. ताक हे कित्येक अम्लपित्ताच्या लोकांना मानवते तर दुसऱ्या कित्येकांस थोड्याशा ताकानेही अतिशय त्रास होतो. उसाचा रस, दूध, तूप, फळांचा रस वगैरे अनेक पदार्थाचाही निरनिराळ्या रोग्यांच्या अम्लपित्तावर वेगवेगळा परिणाम होतो. म्हणून या विकारात कोणते पदार्थ पथ्याचे आहेत हे रुग्ण तपासुनच त्यास योग्य वाटेल त्यानुसार औषधांचा व पथ्याचा उपयोग सांगितला जातो.

अम्लपित्त आहार-विहार | Diet for Amlapitta – Acidity

आम्लपित्तावर घरगुती उपाय / ऍसिडिटी वर उपाय

अम्लपित्तात प्रत्येक पदार्थाचा अम्लविपाक होतो. (पोटात आंबट रसाचा पदार्थ तयार होणे) व त्यातल्या त्यात आंबट, तिखट या रसांचे पदार्थ पित्त वाढवणारे असल्यामुळे फारच पित्त वाढवतात. चवीला गोड असणारे परंतु पोटात गेल्यावर आंबट होणारे पदार्थही या विकारात आंबट रसाचे पदार्थांइतकेच नुकसान करतात. म्हणून अम्लविपाक होणारे, चवीने आंबट असणारे व तिखट असे पदार्थ, अजिबात खाऊ नयेत.

पोहे, भात, कुळीथ, तुरीची डाळ, पालेभाज्या, सुरण, पिकलेल्या गोड आंब्याशिवाय बहुतेक सर्व फळे, हरभरे, बाजरी, वरई, मसाल्याचे पदार्थ, गूळ, उसाचा रस, तेल, लोणी हे सर्व पदार्थ अम्लविपाकी आहेत.

अम्लपित्ताच्या रोग्याने चहा, कॉफी वगैरे सकाळी घ्यावयाची पेये घेऊ नयेत.

पाणी अम्लविपाकी होत असल्यामुळे बेताने प्यावे, ते तापवून थंड केलेले असावे. तहान नसेल तर पाणी पिऊ नये. अम्लपित्तमधे कित्येक रोग्याना तहान लागत नाही. अन्नपचनाकरिता जरूर असलेला द्रव पदार्थ आपोआपच पोटात अधिक उत्पन्न होत असल्यामुळे अम्लपित्त विकारात पाणी पिल्याने भुक न लागण्याचे प्रमाण जास्त दिसते. दोन वेळांपेक्षा जास्त वेळा खाऊ नये.

गव्हाचे पदार्थ म्हणजे चपाती, शिरा, शेवया वगैरे मुगाच्या डाळीचे वरण, दूधीभोपळा, पडवळ, घोसाळी, कोबी, फ्लावर, नवलकोल या भाज्या व साखर, तूप, दूध हे पदार्थ खाण्यात असावे.

गव्हाची चपाती, दूध, तूप, साखर, आवळकाठी अथवा आमसुलाची चटणी एवढेच पदार्थांमुळे बहुतेक अम्लपित्ताच्या रोग्यांना बरे वाटते. रिकामे -आळशी बसू नये, जागरण करू नये, उन्हात अगर उष्णतेजवळ बसू नये, रागावू नये.

जेवण सकाळी दहाच्या आत व सायंकाळी सहाच्या आत करावे.

सतत शौचाला साफ करणारे औषध घेऊ नये. पोट साफ न होण्याची तक्रार असल्यास बस्तीचा जरूर उपयोग करावा.

काही रोग्यांस वरील प्रकारच्या राहणीने मुळीच फायदा होत नाही. त्यांस ताक, दही, फळे वगैरे आंबट पदार्थ खाल्ल्यानेच फायदा होतो. मात्र अशा रोग्यांना कोणतेही अन्न भात, चपाती वगैरे पचत नाही, याकरिता असे न पचणारे अन्न खाऊ नये.

अम्लपित्तात काहींना मिठाई, पेढे, बर्फी इत्यादी जड पदार्थच उपयोगी ठरतात. पिकलेले गोड आंबे खाणे सर्व प्रकारच्या अम्लपित्तावर गुणकारी आहे.
अम्लपित्ताच्या विकारात भुक लागण्याचे प्रमाण फार कमी असते म्हणून वर लिहिलेले पदार्थही थोड्या प्रमाणानेच खावेत. काही दिवस नुसत्या गाईच्या दुधावरच रहावे.

अम्लपित्तासाठी औषधे त्रास पूर्णपणे बरे होईपर्यंत घ्यावी लागतात. वमन करून पोटातील अम्लपित्त निघून गेल्याने ताबडतोब बरे वाटते. वमन कर्मानंतर विरेचन द्यावे. सोबत अम्लपित्ताचे शमन करणारी औषधे घ्यावी लागतात.

व्याधीचे निदान जरी एकच असले तरी प्रत्येक मनुष्यात प्रकृति, सार, सात्म्य, आहार विहार आदी गोष्टी वेगवेगळया असतात. त्यामुळे व्याधी किंवा रोग उत्पन्न करणारे घटक एकच असले तरी शरीरात दिसणारे आजारांची लक्षणे एकसारखे असतीलच असे नाही. दोष आणि स्थानानुसार शरीरात रोग घडण्याचे स्वरूप बदलते व हे बदलले की, चिकित्सा बदलते. या रोग घडवणाऱ्या व वाढवणाऱ्या कारण घटकांचा नाश करणे म्हणजे शुध्द चिकित्सा होय. थोडक्यात केवळ लक्षणानुरुप उपचार न करता रोग उत्पादक दोषांचा, स्थानांचा, आशयांचा संप्राप्ती इत्यादींचा विचार करुन जर उपचार मिळाले तर रुग्णास निरोगी जीवन नक्कीच मिळेल.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

वेदाकेअर आयुर्वेद पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version