ताक

ताक

तक्रं लघु कषायाम्लं दीपनं कफवातजित्‌ ॥ ३४ ॥
शोफोदरार्शोग्रहणीदोषमूत्रग्रहारुचीः 
प्लीहगुल्मघृतव्यापग्द्रपाण्डवामयाज्जयेत्‌ ॥ ३५ ॥
ताक हलकें, आंबट व किंचित्‌ तुरट, वातनाशक, कफघ्न व दीपक असून सूज, उदर, मूळव्याध, संग्रहणी, मूत्ररोग, ग्रह ( बालग्रह इत्यादि ), अरुचि, पांथरी, गुल्म, पांडू व विष आणि घृतजन्य विकार यांचा नाश करिते.
हा दुधापासून बनणारा पदार्थ आहे. दुधाचे दही व दही घुसळून ताक केले जाते. याचे दोन प्रकार असतात.
१] सजल म्हणजे पाणी घालून घुसळलेले. सजलाचे हे दोन प्रकार होतात.
अ] सस्नेह – स्निग्धता असलले – लोणी असलेले
ब] नि: स्नेह – स्निग्धता नसलेले. लोणी नसलेले 
[२] निर्जल म्हणजे पाणी न घालता घुसळलेल्या दह्यापासून बनविलेले.
पाणी न घालता सायीचे दही घुसळून तयार होणाऱ्या पदार्थास ‘घोल’ असे म्हणतात. पाणी न घालता बिनसायीचे दही घुसळून होणाऱ्या पदार्थास ‘मथित’ असे म्हणतात.
दह्याच्या एक चतुर्थांश (पाव) भाग पाणी घालून घुसळल्याने होणाऱ्या पदार्थास ‘ताक’ म्हणतात. दह्याच्या अर्धाभाग (१/२ भाग) पाणी घालून केलेल्या पदार्थास ‘उदश्वित असे म्हणतात. बिन सायीचे दही घुसळून होणाऱ्या मथितातून लोणी काढल्यावर जे तयार होते त्यास “’छच्छिका”’ म्हणतात.
ताक तुरट, आंबट चवीचे असते. चवदार असते. याचा शरीरावर होणार परिणाम मधुर व उष्ण असा असतो. पचायला अत्यंत हलके, पथ्य म्हणजे शरीरास हितकर असते. भूक वाढविते, तृप्ती करविते, मनास प्रसन्नता देते. मळ बांधून काढते.

प्रकारानुरूप गुणधर्म
१] ताजे ताक – जळजळ करत नाही.
२] कच्चे ताक, शिळे ताक घशाशी कफ तयार करते. (सारखे खाकरण्याची सवय लागते), पित्त वाढविते.
३] घोल – दह्यासारख्या गुणाचे समजावे.
४] नि:स्नेह तक्र – हे पथ्य असते
५] सस्नेह तक्र – पचायला जड, शरीर पुष्टी करणारे, कफ करणारे असते.
६] “मथित’  वारंवार जुलाब व खडा अशा प्रकारे मळ येणे, शरीर सुकत जाणे, अशक्तपणा वाढत जाणे इत्यादी लक्षणांनी युक्त असा ग्रहणी रोगात विशेष लाभदायी असते. 
७] ताक – थंडीच्या दिवसात, भूक नसताना, चव न समजणे व वातरोगात विशेष उपयुक्त.
८] उदश्वित – कफ वाढविणारे, बल देणारे आमदोष (अन्न न पचल्याने निर्माण होणारा शरीरातील विषारी पदार्थ म्हणजे आम) घालविणारे आहे. 
९] छच्छिका – पचायला अत्यंत हलकी, पित्त कमी करणारी, श्रम म्हणजे थकवा व तृषा म्हणजे तहान कमी करणारी आहे.
buttermilk-ताक
यशा सुरणामृतं सुखाय, तथा नराणां भुवि तक्रमाहू: ।
ज्याप्रमाणे स्वर्गात अमृत देवांना प्रसन्नता देते, त्याप्रमाणे पृथ्वीवर ताक मनुष्याला प्रसन्नता देत असते.
अनेक लोकांना दूध आवडत नाही किंवा पचत नाही. त्यांच्यासाठी ताक अत्यंत गुणकारी असते. ताजे ताक मनाच्या सात्विकतेच्या व आहाराच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे.
ताक कोणी घ्यावे.
ताक वायुनाशक आहे; परंतु ताक थंड असते हा फार मोठा गैरसमज आहे. जे स्पर्शाला थंड असेल ते गुणकर्मानी थंड असतंच असं नाही. गुणधर्मानुसार पाहता ताक उष्णवीर्य आहे. सर्व अम्ल पदार्थ हे भले स्पर्शाला शीत असले तरी त्यांचे परिणाम उष्ण आहेत म्हणूनच सर्व अम्ल पदार्थ हे पित्त वाढवणारे आहेत. ताक हे रसात्मक असुन यातील मधुरादी सहा रसापैकी ताकातील तुरट व मधुर रस पित्तप्रकोप शांत करून थंडावा देतात.

अम्लोऽग्निदीप्तिकृत्स्निग्धो हृद्यः पाचनरोचनः |

उष्णवीर्यो हिमस्पर्शः प्रीणनः क्लेदनो लघुः ||

करोति कफपितास्रं मूढवातानुलोमनः |

सोऽत्यभ्यस्तस्तनोः कुर्याच्छथिल्यं तिमिरं भ्रमम् ||

कण्डूपाण्डुत्ववीसर्पशोफ विस्फोटतृड्ज्वरान् |

ताक हे ऋतुनुसार बदलणे आवश्यक आहे, अन्यथा १२ महिने एकाच स्वरूपाचे ताक पिल्याने अमृतरुपी ताक हे विषासारके अपाय करेल. 
कोणत्या ऋतूंत कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी ताकाचा उपयोग कशा प्रकारे करावा याची शास्त्रशुद्ध माहिती नसल्याने अशा प्रकारे ताकाविषयी बरेच गैरसमज निर्माण झाला आहे.
ताजे गोड दह्याचे बनविले ताक तुरट किंचित कडु व गोड असल्याने पित्तशामक असल्याने ते थंडावा व पोषक घटक देणारे असते.
ताक शरीरात गेल्यानंतर ते जठर, ग्रहणी व आतडी यांवर परिणाम करते. त्यामुळे पचनव्यवस्था सुधारण्यास मदत होते आणि शरीरातील आंतरिक विषारी घटक नष्ट होण्यास मदत होते.
ताकाने हृदय मजबूत बनते, रक्‍त शुद्ध होते व विशेषतः ग्रहणीची क्रिया अधिक व्यवस्थित बनते. त्यामुळे महास्त्रोताच्या विकारांत  ग्रहणीरोग, अर्श, अजीर्ण, उदररोग, तोंडाची चव जाणे, अतिसार, शूळ, लघवी व मलप्रवृत्ती बंद होणे, तहान आजार, पोटात गोळा उठणे, उलटी व यकृताच्या (प्लीहेच्या) रोगांत ताक अत्यंत उपयुक्त ठरते.
• ताकात आंबटपणा असल्याने ते अग्निदीपक आहे, ते अन्नाची रुची निर्माण करते व अन्नाचे पाचन करते. ज्यांना भूक लागत नसेल, अन्न पचत नसेल, पोट फुगून ज्यांना ढेकर येत असेल व जीव घाबरा होत असेल त्यांच्यासाठी ताक उत्तम आहे.
• ताक रुक्ष असते, त्यामुळे ते कफशोषक असते. ताक कफशोषक असल्याने स्थूल लोकांसाठी देखील ते खूप उपयुक्‍त असते. ते मेद कमी करते व हृदयाची दुर्बलता व रक्‍तदाब या विकारांत आरोग्यदायी बनते.
• नियमानुसार सेवन केलेल्या ताकाने शरीराचा वर्ण व कांती तेजस्वी बनते.
• ताक आतड्यातील व्याधींवर उपयुक्त असते. ताकामुळे आतडी संकोचली जाऊन ती क्रियाशील बनतात व जुने मलदोष बाहेर फेकले जातात. ताकाच्या मलशोधनाच्या गुणामुळे मलोत्पत्ती व मळाचा निचरा सहजतेने होतो. त्यामुळे जुन्या मलदोषाच्या संचयामुळे उत्पन्न झालेल्या टॉइफॉइडमध्ये ताक दिले जाते. ताकामुळे टॉइफॉइडने निर्माण झालेली आतड्यातील गरमी, आतड्यात पडलेले व्रण आणि परिणामी येणारा ताप, शरीराचा दाह व तृषारोग दूर होतो.
ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे आम दोष दूर करणे हा आहे. आपण जो आहार घेतो त्यातून पोषणासाठी लागणार रस पचन न होता तसाच पडून राहतो त्याला ‘आम’ असे म्हणतात. यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. हे आम दोष दूर करण्यासाठी
ताक अत्यंत उपयुक्त ठरते. आमज दोषातील चिकटपणा दूर करण्यासाठी आंबटपणाची  आवश्यकता असते. हा आंबटपणा ताकामुळे प्राप्त होत असतो. ताकामुळे आतड्यातील चिकटपणा हळूहळू दूर होऊन तो बाहेर ढकलला जातो. मुरडा झाला असता इंद्रजव चूर्णाबरोबर व अर्शमध्ये हिरड्याच्या चूर्णाबरोबर ताक घेतले असता ते फायदेशीर ठरते.
संग्रहणी झालेल्या रोग्यांना केवळ ताकावरच राहण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा कमकुवत झालेली आतडी खाल्लेले काहीच पचवू शकत नाहीत, जे पोटात येईल ते विकृत ग्रहणी सर्वच्या सर्व बाहेर ढकलते. अशा अवस्थेत ताक आतड्यांना बलवान बनवते, ग्रहणीची ग्रहणशक्ती वाढवते आणि आवश्यक ते पाचक रस निर्माण करून ग्रहणीला क्रियाशील बनवते. यास्तव संग्रहणी झालेल्या रुग्णाला ताकावर ठेवावे व तक्रप्रयोगाने त्याला व्याधीमुक्‍त करावे. संग्रहणीसारख्या रोगांत रुग्णांनी गाईच्या दुधाच्या ताकात सुंठ व पिंपळचूर्ण घालून ताक ध्यावे. आहारात मात्र ताक व भातच घ्यावा.
गाईच्या दुधाचे ताजे ताक प्यायल्याने रक्‍तवाहिन्यांमधोल रक्‍त शुद्ध होते व ते रस, ताकद व पुष्टीकारक असते; तसेच त्याने शरीराचा वर्ण उजळतो, प्रसन्नता प्राप्त होते व वात आणि कफाच्या अनेक व्याधी दूर होतात.
ताक पितांना एकच घरात वेगवेगळ्या प्रकृतीचे लोक राहत असल्याने ताक पितांना प्रत्येकाच्या प्रकृतीचा, सद्य असणाऱ्या आजारांचा दोषाचा विचार होणे आवश्यक आहे तेव्हा कुठे ताक सगळ्यांनाच अमृताप्रमाणे लाभदायक ठरेल. यासाठी आपल्या वैद्याचा सल्ला मोलाचा ठरेल.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
९१७५० ६९१५५

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version