शिरोधारा Shirodhara

आजच्या धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण, जागरण, स्पर्धा, या सर्व हेतूमुळे शरीरात वाताची वृद्धी होताना दिसते. अशावेळेस शिरोधारेचा वापर त्या विकृत वाताला जिंकण्यासाठी करतात. वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स व स्पामध्ये शिरोधारेचा वापर करून लोंकाना रिल्याक्सेशन् दिले जाते. शरीराला रिल्याक्सेशन मिळणे एवढाच तोकडा फायदा आयुर्वेदाला अपेक्षित नाही. शिरोधारेचे बरेच फायदे ग्रंथात सांगितलेले दिसतात.

प्राणा: प्राणभूतां यत्राश्रिता सर्वन्द्रियाणि च ।
यदुतमाङ्गमाङगानां शिरस्तदभिधीयते ।।

चरकसंहिता सूत्रस्थान १७/१२

सर्व प्राणिमात्रांच्या, इंद्रियांचे, प्राणाचे व मनाचे स्थान असणाऱ्या शिराला ‘उत्तमांग’ असे आयुर्वेदात म्हटले आहे. प्राण (प्राणवायू) व मन ह्या दोन महत्त्वाच्या अशा शरीर घटकांचा शिराच्या ठिकाणी आश्रय आहे. त्यामुळेच शिरासंबंधी करण्यात येणाऱ्या “शिरोधारा” या उपक्रमाला आयुर्वेदिय चिकित्सेत अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.

विशिष्ट प्रकारच्या औषधी तेलांची/औषधांची डोक्याच्या मध्यभागी (भुवयांच्या मध्ये) धरण्यात येणारी धार म्हणजे शिरोधारा.

शिरोधाराची पद्धत :-

शिरोधारा करण्यासाठी (तेल, तूप, ताक, दूध वा औषधी द्रव्यांची धार) रुग्णाच्या डोक्यावर साधारणत: १२ इंचावरून धरली जाते. धारा एक सतत स्वरुपात भुवयांच्या मध्यभागी सोडणे अपेक्षित असते. शिरोधारेचा वापर वेगवेगळ्या आजारांमध्ये वैद्य वर्गाकडून होताना दिसतो. बऱ्याचशा जुनाट व्याधींमध्ये शिरोधारा केल्यानंतर लक्षणांमध्ये सुधारणा आढळते.

शिरोधारा कसे काम करते :-

प्राणवायूच्या नियंत्रणामुळे शरीरातील प्राणवायूची जी काही सर्व कर्मे आहेत, त्यात व्यवस्थितपणा शिरोधारेमुळे आणला जातो. प्राणवायू हा शरीरातील मुख्य वायू असल्याने शरीरातील इतर वायूंच्यावर देखील त्यामुळे नियंत्रण मिळवता येते. प्राणवायूवरील नियंत्रणामुळे जसे वायुच्या इतर प्रकारांवर व प्राणांवर नियंत्रण मिळविता येते; त्याचप्रमाणे उभयात्मक इंद्रिय म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे अशा मनावर देखील आपल्याला ताबा मिळविता येतो. शिराच्या भ्रृमध्यप्रदेशी सोडलेल्या औषधाचा उपयोग प्राणाची अग्नि नियंत्रित करण्यासाठी होतो. शरीरातील दोषांची गति शिरोधारेच्या साहाय्याने शाखेतून कोष्ठाकडे आणली जाते.

शिरोधाराचे फायदे :-

  • इंद्रियाचे संतर्पण (ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये बळकटी)
  • मानसिक ताण, मनाची एकाग्रता व  धारणशक्ती वाढविणे, 
  • इंद्रियांचे व मनाचे स्थैर्य
  • केसांचे सौंदर्य (केस गळणे किंवा केस पिकणे थांबवते)
  • त्वचेची कांती सुधारणे
  • शरीरबल वाढविणे
  • धृति-धारण शक्‍ती वाढविणे
  • स्वर-माधुर्य येते
  • डोळ्यांचे तिमिर, अभिष्यन्द व्याधी दूर होतात
  • शुक्र रक्‍त आदि धातूंचे पोषण व्यवस्थित होते
  • शरीरातील उष्णता कमी होते
  • झोप व्यवस्थित येते

काही व्याधी व शिरोधारा :-

  • उच्चरक्तदाब
  • पक्षाघात 
  • संधिवात 
  • अर्दित (तोंड वाकडे होणे)
  • पोटाचे जुनाट आजार
  • उन्माद
  • अपस्मार (वारंवार फिट येणे)
  • स्त्रियांच्या पाळीविषयक तक्रारी (PCOD) इ. विकारात उत्तम फायदा होतो.

तक्रधारा :-

शिरोधारेतील औषधी द्रव्यांऐवजी तक्राचा उपयोग करून वरील पद्धतीनचे केलेल्या शिरोधारेस तक्रधारा असे म्हणतात. ह्या तक्रधारेची योजना खालील व्याधीत विशेषत: केली जाते.

१) सोरायसिस
२) हातापायांना भेगा पडणे
३) शरीरातील अतिरिक्त उष्णता
४) अरुषिका (डोक्यातील खवडे)

अशा प्रकारे विविध आजारांना योग्य त्या द्रव्यानी सिध्द केलेली तैल ,तुप,ताक इ. द्वारे शिराधारा व बस्ती उपक्रम करून आपण त्याचे फायदे अनुभवू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *