लेप म्हणजे ओढा घालणे असा व्यवहारात साधा अर्थ आहे, परंतु चरक ॠषींनी शरीराच्या आजारांसाठी आभ्यन्तर शुद्धी ( पंचकर्म व पोटातील औषधी ) तसेच बाह्यशुद्धी साठी अंगाला तेल लावणे, उटणे लावणे, लेप लावणे इ प्रकार सांगितले आहेत. आजार समूळ जाण्यासाठी म्हणूनच लेपाचा प्रभावीपणे वापर करता येतो.
लेपामूळे त्वचा विकार, सोरायसिस , वातरक्त, रक्त साकळणे, फुप्फुसात पाणी साठणे, जलोदर , गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, टाचा दुखणे, हातापायांच्या भेगा , डोक्यात कोंडा होणे, डोळ्याखालील काळी वर्तुळे, वांग, निलिका , चामखिळ, तारूण्यपिटीका, केस पांढरे होणे, स्री विशिष्ट अवयवांची ( स्तन व नितंब ) यांची योग्य वाढ न होणे, शरीराचा दाह होणे, शरीर अत्यंत गार होणे, जास्त प्रमाणात घाम येणे, मेंदूला मार लागून रूग्ण कोमात जाणे , नाकाचे हाड वाढणे, बीजग्रंथी व वृषणग्रंथीमध्ये गाठी निर्माण होणे, शरीरावर गाठी , अर्बूद , पूययूक्त गळवे , रूक्ष त्वचा, स्निग्ध त्वचा , ग्रहबाधा व शरीराची दुर्गंधी इ. अनेक प्रकारच्या आजारांसाठी लेपांचा आयुर्वेदाने उत्तम प्रकारे वापर करून घेतला आहे.
लेप म्हणजे फक्त ओढा देणे नसून त्वचेतील भ्राजक पित्त, रसधातु, वातदोष, त्वचेवरील रोमकुप व स्वेदवह पोकळ्या यासह औषधाचा योग्य वापर या दोघांची एकत्रित रोग बरा करण्याची उपचार पद्धती आहे. शरीराचा संबंध त्वचेच्या हिशेबाने वातावरणातील ऊन आणि वारा इ. घटकांशी येत असतो. त्याच्या परिणाम शरीरातील पचनसंस्थेवर देखील घडत असतो, त्याचे कारण आईच्या पोटात गर्भ तयार होत असताना तोंडापासून अन्ननलिकेचा काही भाग आणि गुदमार्गापासून काही भाग याची उत्पत्ती बाह्यत्वचेपासून होते त्यामूळे त्वचेवर लेप लावण्याचा संबंध हा अन्नपचनाशी आणि पर्यायाने सर्व व्याधींशी येतो.
ज्याप्रमाणे डोळ्यांमध्ये किंवा नाकामध्ये औषध घालुन पोटामधील कावीळ आणि गुद मार्गातील मुळव्याध घालवता येते. त्याप्रमाणे निरनिराळ्या लेपांचा वापर करून शरीराच्या आतील आणि बाहेरील आजार घालवता येतात.
गुडघेदुखीसाठी कांद्याचा आणि घोतर्याचा पानांचा रस याचा लेप करावा. दम्यासाठी अळशीचा लेप करावा , नाकाचे हाड वाढले असता कोंबडनखी, हळकुंड, सुंठ, याचा नाकाला लेप करावा, कंबरदुखीसाठी डिंक, काळाबोळ, अळशी, गुग्गुळ ह्यांचा लेप कमरेला करावा, पायाला उत्पन्न होणार्या वेरीकोज व्हेन साठी भात आणि निर्गुंडीच्या लेपाचा वापर करावा. काही वेळेला लेप गरम करून वापरावा लागतो किंवा काही वेळेला गार वापरावा लागतो. लेप किती जाड असावा ह्याचेही शास्र आहे.
अशाप्रकारे जळवा लावणे, लेप लावणे, शेक करणे आणि पोटातील औषधांचा, पंचकर्माचा वापर करणे ह्यामूळे शरीरातील निरनिराळ्या अवयवांच्या वेदना आणि आजार घालवता येतात.