शरीरामध्ये निरनिराळ्या अवयवांची अलग अलग आणि एकत्रित अशी कामे ठरलेली असतात त्याचा आपण शिकत असताना लहानपणापासून विचार अभ्यास करीत असतो त्या अभ्यासात आपण भारतीय असून देखील आयुर्वेद शास्र विचारांचा मागमूसही नसतो त्याचा परिणाम म्हणुनच वैद्य, डाँक्टर्स, होमिओपॅथी यांच्या मानसिकतेवर आणि उपचारांवर येतो.
वृक्काची उत्पत्ती आयुर्वेदानुसार प्रसादरूप कफ उत्तम रक्त आणि मेद धातु यापासून सांगितली आहे त्यामुळे जठरातील पचन, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, चुकीचे व चुकीच्या पद्धतीने अन्न सेवन हे वृक्कांच्या निकामी होण्याचे प्रधान कारण आहे.
यकृत व प्लीहा हे रक्ताचे मुलस्थान असल्याने त्यांना बिघडविणारे लवण, क्षारीय पदार्थ, काही औषधे, कावीळ, शीतपूर्वक ज्वर, विष सेवन, पाण्डूरोग, मुळव्याध, उदर, खोकला, दमा, फुप्फुसाचे विकार, तीव्र रक्तदाब , तीव्र त्वचारोग, मधुमेह , मधुमेह जन्य दूषित जखमा, मुख, दंत, जिव्हा यांचे विकार;
तीव्र अतिसार, तीव्र उलट्या, अति जागरण, अति मैथुन, अति चिंता, अति क्रोध, अजीनो मोटो युक्त चायनीज पदार्थ, पाणिपूरी, भेळ, मिसळ, खर्डा, ठेचा यांसारखे तीव्र दाहक पदार्थ, विषारी प्राण्यांचे दंश, जीर्ण ज्वर, अनायुर्वेदिय पद्धतीने बनविलेली धातूंची भस्मे, मुतखडे, जन्मजात वृक्क विकार विकृती, पारा शिसे यांनी बनलेली भांडे यातील अन्न सेवन, आघात, गर्भारपण, ओजोमेह, इत्यादी कारणांमुळे वृक्काची विकृती होते.
व्यायामाचा संपूर्ण अभाव, दुपारी विनाकारण जेवल्यावर झोपणे, दारू पिणे या कारणांमुळे शरीरातील मेद विकृत होतो. या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून किडनीचे काम बिघडू लागते.
आयुर्वेदाने शिर, हृदय व बस्ति ही 3 मर्म प्रधान म्हणून सांगितलेली आहेत त्याचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे आणि त्यामूळेच प्राधान्याने या अवयवांवर होता होईतो शस्त्रकर्म करू नये करणेच झाल्यास तज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेवून आहार, विहार, औषधी निद्रा, ब्रम्हचर्य यांचे योग्य पालन करून सात आठवड्याने शस्रकर्म करून घ्यावे अन्यथा हृदयाचे ऑपरेशन करताना वृक्वावर परिणाम झाला किंवा मस्तिष्कात रक्तस्राव झाला असा वेगवेगळे उपद्रव उत्पन्न होऊ शकतात. वृक्करोपण करून घेतानाही हाच विचार लागू आहे.
वृक्क निकामी होत असल्यास लक्षणे निसर्ग कितीतरी आधीपासून देत असतो परंतु रूग्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, किंतु त्याला कळताच नाही कि हे लक्षणे नेमकी वृक्काशी संबंधित आहेत ते व इन्द्रियांच्या आहारी जात राहतो.
लक्षणे :-
- मांड्या पोटरया दुखणे
- संध्याकाळी अंग गरम होणे
- अंगावर शीतपित्त उठणे
- अंगाला खाज सुटते
- अम्लपित्त सुरू होणे
- वृषणात दुखणे
- डोके सुन्न होणे
- शौचाला साफ न होणे
- संध्याकाळी थकवा येणे
- चालताना तोल जातो असे वाटते
- दम लागतो
- खोकला लवकर थांबत नाही
- सांधे दु:खू लागतात
- भुक मंदावते
- क्षणिक भोवळ येते
- हात पाय डोके यांची आग होते
- पोटात गुबारा धरतो.
- लघवी गरम होते
- लघवी आलेली असली तरी कित्येक तास दाबून धरता येते
- तोंड येते, घसा लाल होऊन खवखवतो
- संध्याकाळी अंग रगडून घ्यावे वाटते
- निद्रा कमी कमी होत जाते
- पोट गच्च वाटते
- अर्धे अंग शक्तिहीन वाटते
- वारंवार सर्दी होते, उन्हाळे लागतात
- फोडनीच्या वासाने मळमळ व उलट्या होऊ लागतात
- आजार वाढल्यास झटका येतो
- भ्रम झाल्यासारखे होऊन एखादे काम,विचार हा पुर्ण केलेला आहे की नाही याविषयी संशय गफलत होऊ लागते
- पोटात गॅस होतो
- लघवीचे प्रमाण कमी होऊन चेहर्यावर व इतरत्र सुज येऊ लागते
- ही लक्षणे इतर व्याधीतही होऊ शकतात परंतु यापैकी बरीचशी दिसू लागल्यास योग्य निदान करवून घ्यावे.
वृक्क विकारांमध्ये आधुनिक निदान व आयुर्वेद शास्र यात तफावत असु शकते याचे कारण दोन्ही शास्रांची पायाभूत तत्वे होय.
काही वृक्क विकाराचे रूग्णांनी पाण्डू रोगाची, काहींना प्रमेहाची, काहींना रक्तपित्ताची, काहींना उन्मादाची, काहींना तापाची, काहींना मुत्राघाताची, काहींना सुजेची, काहींना मुळव्याधीची अशा अनेक प्रकारे उपचार प्रणाली वापरावी लागते.
वृक्क निकामी झालेल्या रूग्णांना पुढील आयुर्वेदीय विचार प्रणाली उपयुक्त ठरणे:-
- रूग्णांची स्वेदप्रवृत्ति (घाम) वाढविणे.
- बस्ति उपचार करून मोठ्या आतड्याची रक्ताची सततची शुद्धी वैद्यांच्या मार्गदर्शनाने करणे.
- यकृताचे व जठराच्या कामाची कार्यक्षमता व कार्यक्षेत्र वाढविणे.
- विरेचन करणे.
- त्वचेतून रक्तगत विषार बाहेर काढण्यासाठी औषधी स्नान अवगाहांचा प्रयोग करणे
- स्थावर जंगम विषांची आयुर्वेदोक्त उपचार करणे.
- योग्य ते प्राणायाम आणि आहार विषयी नियम पाळणे.
- संपुर्ण ब्रम्हचर्य पालन करणे.
- मस्तिष्क आणि हृदयाचे रक्षण करणारे उपचार करणे.
- वारंवार होणारा पाण्डूरोग आणि रक्ताल्पता वेळोवेळी दुरूस्त करणे.
या सर्वांचा परिणाम 3 प्रकारे दिसतो-
रूग्ण प्रथम व द्वितीय अवस्थेपर्यंत सुधारू शकतो, रूग्णांचे आयुष्य आणि आयुष्याची गुणवत्ता वाढू शकते, जरूर पडते तेव्हाच डायलिसिस आणि त्यासह वरील हे उपचार झाल्यास रूग्णांना याप्यत्व येते.
रूग्ण बरा होत नाही परंतु औषधोपचार चालु आहेत तोवर लक्षणे कमी होतात.
मुत्रप्रवृत्ती मात्र जवळजवळ बंद होते. ( किंवा ते होते परंतू त्यात मुत्रातील अंश नसतात.)
या आजाराची तो होण्यापूर्वीच काळजी घेणे जास्त इष्ट ठरते.