दम्याने दमु नका तर दम भरा

सामान्यतः दम लागल्यावर सर्वात प्रथम आठवते ते नेबुल्याझेशन म्हणजेच औषधीवाफ किंवा इंजेक्शन ज्यामुळे संकुचित श्वासवाहिन्यांचे प्रसारण होते व त्यातील अडकलेला कफ मोकळा होतो. या औषधांनी त्वरित्‌ पण तात्पुरते बरे वाटते, परंतु याने दमा कायमस्वरूपी बरा होत नसतो. श्वासवाहिन्यातील संकोच / अवरोध घालवणेसाठी पुन: पुन: इनहेलर स्प्रे, इंजेक्शन, वाफ घेणे, स्टेरॉईड्स्‌ हे वारंवार घ्यावे लागतात. हे असं सारखं सारखं करून नंतर नंतर या औषधांचे साईड इफेट्स जाणवतात, मग दमा जुनाट झाल्यावर दम लागल्यावर पूर्वीपेक्षा औषधांचा डोस वाढवावा लागतो, होणाऱ्या त्रासाची तीव्रता वाढते या बाबी सुरु राहतात. तरीपण आपण दम्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना न करता वर्षानुवर्ष तात्पुरता दम कमी करणारी इनहेलर स्प्रे, इंजेक्शन, स्टेरॉईड्स्‌, औषधांचे सेवन करतच असतो व श्वासवाहिनीत दम निर्माण करणारी, संकोच / अवरोध करणारे रोगकारक घटक तसेच असल्याने हळूहळू फुफ्फुसांची कायमस्वरूपी कार्यहानी होते. यांचे शरीरावर अनिष्ट परिणाम दिसतात जसे हृदयावर सीओपीडी, सीसीएफ, कायमस्वरूपी खोकला,सततची चोंदणारी गळणारी सर्दी, छाती फुप्फुस यात व्रण, छातीत पाणी, न्युमोनिआ ई.

आयुर्वेदात दमा घालविण्यासाठीचा कानमंत्र म्हणजे दमेकरयाने छाती, पाठ, गळा यांना नियमित सैंधवयुक्त औषधसिद्ध तेल लावुन शेक घेणे. व पुनःपुन्हा दम लागु नये यासाठी पंचकर्मातील वमन, विरेचन कर्मे करावीत.

आज जागतिक दमा दिनाच्या निमित्ताने आपण दमा असलेल्यांनी आपल्या आहारात काय असावे काय नसावे याची माहिती घेऊया.

पथ्य – आहारात समावेश असावा.

  • गहू, सातू, तांदूळ, तांबडी साळ ही धान्ये, तर कुळीथ, मसूर, मूग, तूर ह्या डाळी खाण्यात असाव्यात.
  • भेंडी, तोंडली, वांगी, पडवळ
  • बोकड, कोंबडा यांचे मांसरस
  • द्राक्ष, महाळुंग, ग्रेपफ्रूट ही फळे खावीत
  • गाईचे दूध, तूप, लोणी उत्तम
  • लसूण, ओली हळद, आले, मध, वेलची, केशर, तमालपत्र, दालचिनी, लवंग, बदाम, जर्दाळू, तीळ, धणे, जिरे, काळी मिरी हे नियमित आहारात समावेश असावा.

अपथ्य – आहारात समावेश नसावा

  • मका, शेवगा, तांबडा भोपळा, मेथी, वाल, मटकी, वाटाणे, मटार.
  • मांसामध्ये मेंढी, मासे यांचे मांस नको
  • अननस, ताडगोळे, कच्ची अर्धवट पिकलेली केळी (अपक्व), जांभूळ, फणस, पीच इत्यादी आंबट फळे खाऊ नये
  • दही, ताक नको
  • थंड, फार दिवसांचे शिळे पाणी मुळीच पिऊ नये.
  • शक्‍यतो कोणतीही कंदमुळे आहारात खाणे टाळा
  • तळून केलेले पदार्थ, पापड, लोणची, चिंच, पिस्ता, अक्रोड, पाणीपुरी, भेळ यांसारखे विदाही पदार्थ वापरू नयेत.
  • श्रम, स्नान, व्यायाम, मैथुन, उन्हात फिरणे, वाऱ्यावर फिरावयास जाणे, धुळीच्या, धुराच्या किंवा इतर सुगंधी द्रव्याच्या संपर्कात राहणे टाळावे.

काही उपाय योजना

  • मुगाचे ऐवजी तीळ भरपूर घालून केलेली तांदळाची  खिचडी भरपूर तूप घालून खावी. याने फुफ्फुसांना ताकद मिळते.
  • जर दम्याच्या रोग्यास पोट साफ होत असेल व ताप नसेल तर कुळथाचे पाणी, सुंठ, सैंधव हे मिश्रण उत्तम लाभ देते.
  • उष्णोदक, विश्वोदक (सुंठीचे पाणी).
  • दम लागल्यावर संपुर्ण आराम करणे, लगेच छातीला तेल लावून गरम गरम शेक घेण्याने पटकन आराम पडतो.
  • आल्याचा रस + मध हे वारंवार चाटवावे. याने कफ पडून श्वास कमी होतो.
  • जर कफ सुकला असेल तर ज्येष्ठमधाचा काढा साखर व मीठ घालून घ्यावा. याने कक पातळ होऊन सुटू लागतो.
  • लवंग, जायफळ, काळी मिरी, सुंठ व खडीसाखर याचे मिश्रण मधासह चाटवावे.
  • ज्येष्ठमध व काळी मिरी यांचे चूर्ण तुपावर किंवा तिळाच्या तेलावर परतून घ्यावे व साखरेचा पाक घालून त्याची गोळी करावी. ही गोळी तोंडात धरून ठेवावी. याने खोकल्यासह असलेला दम कमी होतो.
  • अतिशय घाबरल्यासारखे होत असल्यास अर्धा शेर पाण्यात १ मोठा चमचा खडीसाखर घालून ते पाणी उकळावे व एक-चतुर्थांश भाग शिल्लक ठेवून प्यावे.
  • लहान मुलांमध्ये दम लागल्यास वेखंड मधातून चाटविल्याने कफ पडून जाऊन दम कमी होतो.
  • दम्याचा वेग तीव्र असताना पुढे वाकून बसले असता किंचित आराम वाटतो. यावेळी रुग्णास बसवून त्याचे छातीस व गळ्यास, गाईच्या तुपात किंवा तिळाच्या / मोहरीच्या तेलात सैंधव किंवा त्या अभावी साधे मीठ घालुन त्याचे मालीश करावे.
  • त्यानंतर पाणी उकळून ठेवून त्यात ओवा, तुळस, पुदिना, कापुर घालून त्याची वाफ नाकाने आत घ्यावी व त्याच पाण्यात दोन कापडाचे तुकडे उकळत ठेवून एका तुकड्याने छाती, गळा, पाठ शेकावी; कापड थंडगार झाल्यावर पुन्हा पाण्यात टाकून दुसऱ्या तुकड्याने शेकावे. याचवेळी शक्‍य झाल्यास रुग्णाचे दोन्ही पाय गरम पाण्यात बुडवून ठेवावे. याप्रमाणे १० ते १५ मिनिटे करावे. घरी तीळ तेल असल्यास १ ते ३ चमचेपर्यंत तेल साखरेसह घ्यावे. याने उत्तम लाभ होतो.
  • जर अपचनामुळे दमा लागला असेल तर काळ्या मनुका, काळी मिरी, आलेरस, सुंठचूर्ण व मध हे मिश्रण वरचेवर चाटवावे.
  • मलावरोध असुन पोट साफ होत नसल्यास मृदू विरेचन म्हणून मनुका, सुके अंजीर नियमित खावे
  • जुनाट दम असल्यास गूळ १ चमचा व मोहरीचे तेल १ चमचा असे मिश्रण २१ दिवस सकाळी घ्यावे. याने फुफ्फुसातील कफ सुटतो. 

 

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

1 thought on “दम्याने दमु नका तर दम भरा”

  1. Pingback: पोटाचे आजार व आयुर्वेद - www.harshalnemade.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!