विरेचन

पंचकर्म ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण शरीर शोधन चिकित्सा पद्धती असून हे आयुर्वेदाचे भूषणच म्हणावे लागेल. या पंचकर्म उपचारांनी शरीरातील बिघडलेल्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषांना (वात-पित्त-कफ) योग्य रितीने शरीराबाहेर काढून टाकले जाते, त्यामुळे दुर्धर रोग, वारंवार उद्‌भवणारे आजार, लहानसहान शारीरिक तक्रारी चांगल्याप्रकारे बऱ्या होतात. शिवाय निरोगी माणसाचे आरोग्य उत्तम टिकवले जाते.

पंचकर्म चिकित्सेपैकी ‘विरेचन’ या उपक्रमात शरीरातील बिघडलेले दोष जुलाबावाटे, गुदद्वारामार्गबाहेर काढले जातात. विशेषत्वाने पित्त आणि कफ वातासाठीही उपक्रम उपयुक्त आहे. रोजच्या रोज मलप्रवृत्ती होणे हा निसर्ग नियम असल्याने विरेचनाद्वारे शरीरशोधन करण्यास सुलभ जाते.

दोष व मलांशांना अधोमागनि किंवा गुदमागाने बाहेर काढणारे कर्म म्हणजेच विरेचन कर्म होय. विरेचन हा पंचकर्मातील दुसरा उपक्रम आहे. अधोभागहर असे महत्वाचे व विशेषत्वाने पित्तप्रधान व्याधीत उपयोगात आणावयाचे हे संशोधन कर्म आहे.

उपयोगिता –

विरेचन हा पित्ताच्या शोधनासाठीचा विशेष उपक्रम आहे. पित्तदोषासाठी पित्तप्रधान दोषांसाठी, कफासाठी तसेच पित्तस्थानगत कफासाठी विरेचन हा उपचार प्रशस्त आहे. कारण पित्त व कफ या दोघांचे स्थान आमाशय आहे.

पित्त व कफाप्रमाणे वाताचादेखील हा उपक्रम आहे. यांने अपानवायूला अनुलोम गती प्राप्त होते. म्हणून वातरोगांमध्ये स्नेहनस्वेदनपूर्वक मृदुविरेचन देतात. पित्त व रक्‍त यांच्या आश्रयाश्रयी भावामुळे रक्‍तदुष्टीसाठी हा उपक्रम उपयुक्‍त आहे.

मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या धातूंमधील विकारांमध्ये विरेचनाचा उपयोग होतो. स्तन्यदोष व योनीदोष यामध्ये महत्वाचा उपचार आहे.

मनोविकारांमध्ये विरेचन चिकित्सा ही महत्वाची आहे.

शरीरमलांचे शोधन करणारा रोगहर असा हा उपक्रम आहे.

वमनाप्रमाणे ऊर्ध्वभागहर व सकष्ट नसलेली सरळ व अधोगामी प्रक्रिया असल्याने विरेचनामध्ये विनासायास शोधन होते.

पचनक्रियेच्या दुसऱ्या अवस्थापाक अवस्थेमध्ये पच्यमानाशयांतर्गत आमाशयाचा अधोभाग, ग्रहणी, लघ्वान्त्र, यकृत, पित्ताशय, अग्नाशय आदि पित्तस्थानांसंबधित क्षेत्र हे विरेचनाचे कार्यक्षेत्र आहे. संपूर्ण शरीरातील अणुरेणूंमध्ये शोधन घडवून आणून त्यातील मलांश काढून घेण्याची शक्‍ती विरेचन कर्मामध्ये आहे.

विविध आजारांतील विरेचन चे फायदे

 • ताप
 • त्वचारोग,
 • गळवे,
 • गाठी,
 • धावरे,
 • गुल्म,
 • उष्णतेचे विकार,
 • सर्वांगाचा किंवा विशिष्ट अवयवाचा दाह,
 • प्रमेह,
 • रक्ताशी संबंधीत आजार,
 • यकृत,
 • प्लीहेचे रोग
 • पांडू,
 • हृदयरोग,
 • डोळ्यांचे आजार,
 • अजीर्ण,
 • अम्लपित्त,
 • मूळव्याध,
 • भगंदर,
 • मुत्राशय,
 • गुल्म,
 • अर्बुद,
 • गलगंड,
 • ग्रंथि,
 • मूत्राघात,
 • जंत,
 • नागीण
 • पांडु,
 • जुनाट डोकेदुखी,
 • डोळ्यातुन पाणी येणे,
 • दमा,
 • बरा न होणारा खोकला,
 • कावीळ,
 • अपस्मार,
 • उन्माद,
 • गाऊट,
 • योनिदोष,
 • शुक्राचे आजार,
 • तिमिर,
 • पोटात पाणी जमणे,
 • पोटात दुखणे,
 • पोटात काहीतरी अडकल्याची भावना,
 • सुज,
 • बऱ्या न होणारया जखमा,
 • संडासची जागेत आग पडणे,
 • कानात जळजळ होणे,
 • पोट फुगणे,
 • खोकला,
 • दमा,
 • गर्भाशयाचे विकार,
 • वातरक्त आणि
 • निरोगी व्यक्तिसाठी शरद ऋतुत विरेचनाने उत्तम फायदा होतो.

विरेचन प्रक्रिया :

पंचकर्मोक्त विरेचन ही शोधन प्रक्रिया व्यक्तिची सार्वदेहीक शुद्धी करून बऱ्याच प्रमाणात दोषांनां बाहेर काढते. यात नुसतेच आतडे साफ करणे हा उद्देश नसतो. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही उत्तम वैद्यांच्या देखरेखीखाली करावी व या कालावधीत वैद्यांच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

कोणत्याही पंचकर्म चिकित्सेपूर्वी शरीराची पूर्व तयारी गरजेचे असते. यात सर्वांगाला तेल लावणे व पोटात औषधी तुप देऊन शरीर आतून बाहेरून स्निग्ध केले जाते. व हा दिलेला स्नेह पचून शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्यासाठी नंतर सर्वांगाला स्वेदन (वाफ) केले जाते. या काळात विशिष्ट पद्धतीने आहार विहाराचे पालन करणे गरजेचे असते.

स्नेहपान यथाक्रम झाल्यानंतर रुग्णास स्निग्ध, द्रव, उष्ण असा आहार सेवन करावा. भात, सार, मांसरस, अम्लफळांचा रस, चिंचा सार, कोकम सार, आमसुलाच सार असा आहार १ ते ३ दिवस द्यावा व पिण्यास गरम पाणी वारंवार वापरावे.

योग्य प्रकारे स्नेहन स्वेदन झाल्यावर (हलकेपणा, हुशारी त्वचा स्निग्ध होते, भूक वाढते, स्नेहयुक्त मलप्रवृत्ती होते. तूप, तेलासारखे स्निग्ध पदार्थांचा तिटकारा वाटतो.) आदल्या दिवशीचे भोजन पचून गेलेले आहे, झोप नीट झालेली आहे व विरेचन घेण्यास उत्सुक

असलेल्या रुग्णाला शुचिर्भुत होण्यास सांगून सकाळी विरेचन द्यावे.

शरीरशुध्दीसाठी सप्टेंबर, ऑक्टोबर (शरद) मध्ये व मार्च एप्रिल (वसंत) मध्ये विरेचन करावे. इतर ऋतूंत कोणत्याही त्रासदायक रोगाने त्रास होत असल्यास वमन वा विरेचन करता येते.

विरेचन विधी :

 • स्नेहन, स्वेदन, वमन झाल्यानंतर संसर्जनक्रम करुन पुन्हा स्नेहन स्वेदन झाल्यावरच मध्ये १ ते ३ दिवस थांबून विरेचन करावे
 • विविध औषधींचे काढे, चूर्ण, गोळ्या, एरंडेल, अवलेह इ. वापर केला जातो.
 • वैद्य रुग्णाचे वय, बल, त्यांचा आजार, ऋतु इ. चा व्यवस्थित विचार करून मग औषध व त्याची मात्रा ठरवतो.
 • विरेचनाचे औषध घेऊन झाल्यावर गरम पाणी प्यावे. तोंडातील कडवट चव जाण्यासाठी आले, लवंग इ. खावे. जुलाब सुरू होईपर्यंत झोपून राहावे.
 • मल प्रवृत्तीची भावना नसतानाही मुद्दाम कुंथणे, जोर लावणे, थंडपाणी घेणे, वाऱ्यात बाहेर जाणे, इतर वेगळीच कामे करणे या प्रकारच्या गोष्टी टाळाव्यात. मन पूर्णत: विरेचन प्रक्रिया उत्तम होण्यासाठी शरीरावर एकाग्र करावे.
 • जुलाबाचे औषध शरीरात गेल्यावर पचून रक्तातात मिसळून आपल्या गुणांनी शरीरात वाढलेल्या व दुषित पित्ताला पेशी व अवयवांमधून काढून आतड्यात आणते व या सर्व दोषांना घेऊन संडासवाटे शरीराबाहेर जाते. योग्य विरेचन योगाने सर्व प्रथम मळ मग पित्त ब कफ उत्सर्जित होतात. शेवटी शेवटी तर फक्त चिकट पाणी व वात विसर्जन होते.
 • विरेचन पूर्ण झाल्यानंतर आपोआप मल प्रवृत्तीची भावना थांबते. सर्व शरीरात हलकेपणा व उत्साह जाणवतो. थोडा थकवा येतो त्यामुळे व्यवस्थित विश्रांती घ्यावी.

घ्यावयाची काळजी :

 • विरेचन सुरू असतानाच पोट दुखल्यास पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. चिमूटभर ओवा खाऊन वर गरम पाणी घ्यावे. शरीराला हवा न लागणाऱ्या खोलीत बसावे. विरेचन वेग आल्यास जवळच असलेल्या शौचालयात शौचास जावे. वेगावरोध करू नये. विश्रांती घ्यावी. मात्र झोपू नये. वे व पानार्थ उष्णोदक वापरावे. शीतोदक कदापिही वापरू नये.
 • संडासाची जागा धुण्यासाठी कोमाट पाणी वापरावे, संडासच्या जागेची आग झाल्यास गुदूद्वाराला साजूक तूप, शतधौत घृत व कैलासजीवन लावावे.
 • अति प्रमाणात जुलाब, रक्ती जुलाब, खूप थकवा, चक्कर, घबराट होणे, उलटीची भावना झाल्यास तोंडावर पाणी मारावे, लिंबाची फोड थोडी चोखावी इ. उपद्रव जाणवल्यास लगेच वैद्यांचा सल्ला घ्यावा.
 • विरेचन वेग येऊन पूर्ण झाल्यावर शीत जलाने चेहरा धुवावा.
 • जोरात बोलणे, जास्त भोजन करणे, एका जागेवर जास्त वेळ बसणे, खूप फिरणे, चिडचिड करणे, दुःख करणे, शीत सेवन, मैथुन, रात्री जागरण, दिवसा झोपणे, विरूध्द भोजन, वेगावरोध हे सर्व विषय रुग्णाने विरेचन चालु असताना व झाल्यावर टाळावेत.

विरेचनानंतर वैशिष्ट्यपूर्ण आहार सेवन :

 • विरेचन पूर्ण थांबल्यावर थोडा वेळ विश्रांती घ्यावी. व त्यानंतर संसर्जनक्रमाचा म्हणजेच वैशिष्ट्यपूर्ण अशा आहार विधीचे काटेकोरपणे पालन करावे. म्हणजे या प्रक्रियेत आपला जो जठराग्नी मंद झालेला असतो पोट व सर्व आतड्यांना थकवा आलेला असतो तो जाऊन त्यांना परत बल मिळेपर्यंत म्हणजे साधारणत: ३ ते ७ दिवस संसर्जन क्रमं पाळणे आवश्यक असते.
 • विरेचन दिलेल्या दिवशी सायंकाळी तांदळाची पेज त्यात काहीही न घालता घ्यावी.
 • दुसऱ्या दिवशी वरील प्रमाणे पेज व याशिवाय सायंकाळी विलेपी-तांदळाच्या ५ पट पाणी घेऊन शिजवून घोटून घ्यावी. तिसर्‍या दिवशी मऊभात, मूगाच्या कढणाबरोबर खावा यात मीठ धणे-जिरे घालून घ्यावे.
 • नंतर पोळी, फुलका, भाज्या, भाकरी इ. पदार्थ क्रमाक्रमाने वाढवत न्यावेत व ७ व्या दिवशी साधे जेवण घ्यावे. तोपर्यंत स्नानासाठी, पिण्यासाठी व वापराला गरम पाणीच घ्यावे. शक्‍य असेल तेवढी दगदग, प्रवास टाळावा, अतिकाम करू नये, रात्री जागरण मैथून टाळावे.

स्त्रियांनी विरेचनच्या पूर्व कर्मापासून ते नंतरच्या तिसर्‍या दिवसापर्यंत पाळी येणार नाही हे बघूनच हा उपचार घ्यावा.

अशाप्रकारे सर्व पथ्य व नियम पाळून घेतलेले विरेचन उत्तम स्वास्थ्य देईल यात काही शंकाच नाही.

विरेचनोत्तर कर्म विचार :-

विरेचनानंतर क्रमाने बस्ति चिकित्सा करावयाची असल्यास ७ दिवस संसर्जनक्रम देऊन ८ व्या दिवशी विश्रांती द्यावी, ९ व्या दिवशी अनुवासन बस्ति द्यावा व दहाब्या दिवशी बस्ति द्यावा. 

विरेचनानंतर पुढे कोणतेही शोधन कर्म करावयाचे नसेल तर त्या त्या व्याधीनुसार जी शमन चिकित्सा असेल ती सातवे दिवशी सुरू करावी.

 

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
०२० ४८६०४०३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top