पंचकर्माचे मनुष्य जीवनातील महत्व

मनुष्याच्या काही उपजत इच्छा असतात. भरपूर धन मिळावे, मनोकामना पूर्ण व्हाव्यात, मोक्ष मिळावा इ. या सर्व इच्छांची पूर्तता होण्यासाठी शरीर संपदा आणि सबल मन असणे गरजेचे आहे. कारण शरीर आजारी असताना या इच्छांची पूर्तता होवू शकत नाही. आणि झाल्यास त्याचा सुखानुभव घेता येत नाही. नेमकी हीच गोष्ट आयुर्वेदिय क्रषिमुनींनी ओळखून मनुष्य जीवन उत्तम पद्धतीने जगून चारही पुरुषार्थ मिळवण्याच्या उद्देशाने आयुर्वेदिय पंचकर्माची योजना केलेली दिसते.

तरुण वय, आजार अल्प प्रमाणात असणे, पथ्य पाळण्याची तयारी असणे इ. गोष्टी असताना फक्त औषध देवून आजार बरा करता येऊ शकतो, जसे डबक्यात साचलेले पाणी ऊन व वाऱ्याने आटून जावू शकते कारण त्याची व्याप्ती कमी असते, परंतु मध्यम वय किंवा वृद्धापकाळ, शरीरात दोष फार मोठ्या प्रमाणात वाढणे, आजाराची सर्व लक्षणे दिसणे, शरीरातील मर्मांवरती परिणाम होणे तसेच शरीरातील रस-रक्‍तादि धातुंचा पाक होणे, मनावर रजो आणि तमो गुणांचे आधिक्य उत्पन्न होणे, औत्सुक्य, मोह आणि अरति अशी लक्षणे दिसू लागणे या अवस्थैत केवळ औषधांचा वापर करून उपयोग होत नाही कारण ज्याप्रमाणे तलाव किंवा धरणातील पाणी आटवण्याठी बांध फोडावा लागतो. केवळ ऊन आणि वाऱ्याचा त्यासाठी उपयोग होवू शकत नाही. त्याप्रमाणे वरील अवस्थेसाठी आयुर्वेदिय पंचकर्म किंवा शोधन उपचारच करावे लागतात.

पंचकर्म व त्याच्या उपकल्पना भरपूर आहेत. उलटीचे औषध देणे, जुलाबाचे औषध देणे, काढ्याचा किंवा तेलाचा बस्ती (आयुर्वेदिय एनिमा) देणे, नाकामध्ये चूर्ण-काढे-तेल-तूप घालणे, शरीरातील दूषित रक्‍त निरनिराळ्या पद्धतींनी काढणे ही पंचकर्म आहेत. संपूर्ण शरीरावर तेलाची धार धरणे, अग्निकर्म करणे, क्षार लावणे, डोळ्याला नेत्रबस्ती करणे, कर्णपूरण, शिरोबस्ती, शिरोधारा, शिरोपिचू, हद्बस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती लेप आणि पोटीस करणे, प्रच्छान कर्म करणे अशी इतर अनेक कर्मे आयुर्वेदाने सांगितलेली आहेत.

पंचकर्माच्या पूर्वी भूक वाढवून मल-मूत्र साफ होणे गरजेचे असते याला पाचन करणे असे म्हणतात. त्यानंतर पोटात आणि बाहेरून औषधी तेल, तूप वापरून स्नेहन केले जाते. स्नेहन योग्य झाल्यानंतर शरीराला अंतर्बाह्य शेक केला जातो. त्याचे वेगवेगळे प्रकार आजारानुरूप असतात इतकी प्रक्रिया योग्य पद्धतीने झाल्यावर मगच पंचकर्म करता येते.

शरीर, इंद्रिये, मन, बुद्धि, वर्ण, प्राकृत होणे. शरीराचे बल व पुष्टि वाढणे, शरीरात असणाऱ्या दोष-धातु-मलांचे बल प्राकृत राहणे व दीर्घकाळापर्यंत व्याधिमुक्त राहुन सुखी व दीर्घायुष्याचा उपभोग घेणे यासाठी पंचकर्मासारखा श्रेष्ठ उपाय नाही.

मनुष्य तरुण राहणे, म्हातारपण लांबवणे शरीरातील सर्व दोष धातू मलांचे बल कायम चांगले राहणे यासाठी पंचकर्मा इतका उत्तम उपाय नाही, हदयाच्या रक्‍तवाहिन्या आणि पेशी, वृक्क बारीक होत जाणे, वृक्‍क-यकृतामध्ये गाठी उत्पन्न होणे, मेंदू सूकत जाणे, अति क्रोध, अति चिंता, यकृतामध्ये मेद साचत जाणे, हाडे झिजणे (पोकळ होणे), अंगाला सुरकुत्या पडून केस पांढरे होणे, स्मृती कमी होणे, निर्णय क्षमता कमी होणे, मूल बाळ न होणे, वीर्यातील शुक्रजंतूंचा अभाव असणे, बीज ग्रंथींचे काम नीट न होणे, जन्मजात विकृती असणे, अतिस्थौल्य, सिझोफ्रेनिया सारखे मानसिक आजार, ड्रग्ज,दारू सारखी व्यसने असणे, कॅन्सर आणि एड्स सारखे विकार असणे अशा दूर्धरआजारांसाठी पंचकर्म श्रेष्ठत्व सर्वश्रुत आहेच व यामध्ये पंचकर्म काय महत्त्व आहे याचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कल्पना करताच येत नाही. पोटातुन औषधे व पंचकर्म चिकित्सा यांची योग्य सांगड घातल्यास आजार नष्ट होण्यास मदत होते.

रोगाच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करुन केवळ बाह्य लक्षणांवर उपचार करण्याऐवजी रोगाचे समूळ उच्चाटन करण्यावर आयुर्वेद भर देतो. म्हणूनच आयुर्वेद हे आजार कायमचा बरा करुन व रोगप्रतिकार शक्ती सुधारून व्यक्तीस संपुर्ण व दिर्घकाळ टिकणारे स्वास्थ्य प्रदान करणारे शास्त्र आहे.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
०२० ४८६०४०३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top