कृमिरोग ( जंत )

कृमिरोग ( जंत )

शरीरात अनेक प्रकारच्या कृमिंची उत्पत्ति होत असते. यापैकी काही कृमि सहज म्हणजेच जन्मापासूनच शरीरात असतात. हे कृमि अविकारी असतात. म्हणजेच या कृमिमुळे शरीरात कोणतीही रोगची लक्षणे उत्पन्न होत नाहीत. उलट शरीर स्वास्थ्यासाठी त्यांची शरीरातील उपस्थिती आवश्यक अशीच असते. या अशा कृमिंचे वर्णन चरकाचार्यानी केलेले आहे. त्यांचे मते कृमि २ प्रकारचे असतात. १. सहज, २. वैकारिक. सहज कृमिंचे वर्णन वर केलेले आहेच. दुसऱ्या प्रकारच्या कृमिंमुळे शरीरात व्याधी निर्माण होत असतात व म्हणूनच त्यांना वैकारिक कृमि असे म्हटले जाते.

बाह्य आणि अभ्यंतर या भेदाने कृमि २ प्रकारचे आहेत.

बहिगंल (स्वेदादिक) कफ, रक्‍त आणि विष्टा यांमध्ये उत्पन्न होणारे असे ४ प्रकारचे आणि त्यांची नावे २० प्रकारची आहेत.

बाह्य कृमि बाह्यमलातून निर्माण होतात. ते दोन प्रकारचे असतात. यूका आणि लिक्षा ही त्यांची नावे. मराठीत यांनाच ऊवा व लिखा असे म्हणतात. खरे पाहता हे दोनवेगळे कृमि नसून लिखा या उवांचीच प्रथम अवस्था आहे असे म्हणता येईल. या कृमिंचे वर्णन करताना ते बहुपाद व सूक्ष्म असून तिळाप्रमाणे आकार असणारे व त्याच वर्णाचेकाळे किंवा पांढरे असतात असे म्हटलेले आहे.

हे कृमि अंगावरील लोम, केश व कपडे यांच्या आश्रयाने राहतात, असे सांगितले आहे. काही वेळा या यूका किंवा लिक्षा अंगावरील त्वचेवर चिकटून बसल्यावर तिलकालकाप्रमाणे भासमान होतात व म्हणूनच ‘तिलप्रमाणसंस्थानवर्ण:’ असे याचे वर्णन केले जाते.चरकांनी बाह्य कृमिंचे प्रकार वर्णिताना यूका, पिपिलिका असे दोन पर्याय दिलेले आहेत.बाह्य कृमिंमुळे कोठ, पिडका, कंडू, शोथ व ग्रंथींची उत्पत्ति होते. यामुळे विविध प्रकारची त्वकदुष्टी होते व कुष्ठसदृश लक्षणे उत्पन्न होतात.

कृमि-जंताचे कारण-

पोटातील कृमि हे अजीर्णापासून होतात. अजीर्णावर भोजन करणे, निरंतर आंबट किंवा गोड पदार्थ खाणे, द्रव पदार्थ कढी, आमटी वगैरे फार खाणे, गूळ आणि पीठ यांनी केलेले पदार्थ (लाडू, अनारसे, घारगे इत्यादी) खाणे, व्यायाम न करणे, दिवसा निजणे आणि क्षीरमत्स्यादी विरुद्ध पदार्थ खाणे, या कारणांनी जंत होतात. लहान मुलास अजीर्णाने, अथवा लाडू वगैरे गोड व पिष्ट पदार्थ खाल्ल्याने जंत होतात. अथवा आईच्या अंगावर पीत असल्यास आईच्या अजीर्णानेही पिणाऱ्या मुलास जंत होतात. १२ वर्षांपर्यंतच्या मुलात ९०% प्रमाण मिळते. मोठ्या माणसास जंत कमी होतात.

अजीर्ण झाले असता भोजन करणे, मधुर, अम्ल, लवण रसांचा अधिक प्रमाणात व नेहमी उपयोग करणे, विशेषत: पिष्टमय व गुळापासून बनविलेले व द्रवरूप असे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे, व्यायाम न करणे, दिवास्वाप, विरुद्ध पदार्थांचे सेवन करणे ही कृमिंची महत्त्वाची कारणे आहेत.

असात्म्य अशा अन्नाचे सेवन करणे, मलिन (नासलेले, शिळे, दूषित) असे पदार्थ खाणे, उडीद-कमलबीज-कमलकंद-शिंगाडा पालेभाज्या-मध-आंबट कांजी-दही-दुधाचे पदार्थ- आनूप प्राण्यांचे मांस हे व यासारखे पदार्थ अतिप्रमाणात खाणे यानेही कृमींची उत्पत्ति होते.

माती खाणे हेही एक कृमि उत्पत्तीचे महत्त्वाचे कारण आहे.

उडीद, पिष्टमयपदार्थ, अम्ल तथा लवणरस बहूल असे पदार्थ, गूळ व पालेभाज्या यांच्या सेवनामुळे कृमि उत्पन्न होतात.

मत्स्य, मांस, गूळ, दूध, दही यांच्या अधिक सेवनाने कृमिची उत्पत्ति होते तर विरुद्धाशन, अजीर्णाशन व पालेभाज्या यांच्यामुळे रक्‍तज कृमि निर्माण होतात.

पालेभाज्या हे सर्वच अभ्यंतर कृमिंच्या उत्पत्तीचे महत्त्वाचे कारण आहे असे दिसते. पालेभाज्या किडलेल्या व त्यामुळेच कृमियुक्‍त असण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पालेभाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा शिजवून खाल्या तर त्यामुळे कृमि उत्पन्न होऊ शकणार नाहीत, हेही या संदर्भात लक्षात घ्यावयास हवे.

अजीर्ण हेही कृमींचे मूलभूत असे कारण आहे. अजीर्ण व अग्निमांद्य याशिवाय अभ्यंतर कृमिंची उत्पत्ति होऊच शकत नाही.

मांसान्न खाणाऱ्यास मात्र चपटे जंत होतात; इतरास गोल व बारीक जंत होतात. जसे जंत हे अजीर्णा पासून पोटात होतात, तसे तसे बाहेर अन्न पाण्याबरोबरही आपल्या पोटात जातात आणि की, त्यांचीच अंडी आपल्या पोटात भाजीपाल्यातून किवा तळी, विहीरी, नद्या, ओढे यांत मिसळून पाण्यातून किवा अन्य तऱ्हेने पोटात जाऊन त्याच्या योगाने जंत होतात. ही गांडूळे लाखो अंडी जमिनीत घालतात व ती वरील प्रकारांनी पोटात प्रवेश करून वाढतात. पोटातील गोल किंवा तांबूस रंगाचे जंतही त्यांचीच संतती आहे.

जंत मुख्यत्वेकरून लहान आतड्यांत फार असतात. परंतु पुष्कळ वेळा लहान आतड्यांच्या पहिल्या भागात अथवा कोठ्यातही आढळतात. केव्हा केव्हा आपले स्थान सोडून घशात, तोंडात, नाकाच्या मागील भागात, श्वासनळीत, फुप्फुसांत, पित्ताशयात किंवा अंत्रावरणात गेलेले ही आढळतात. जंत हे उष्ण वातावरण, पुरुष, स्त्रि व विशेषकरून लहान मुलात फार आढतात. समशीतोष्ण वातावरणात कमी; आणि शीत वातावरणात फारच कमी आढतात. केव्हा केव्हा अन्नमार्गात दोनदोन, तीनतीन, जंतांची जुळीही आढतात. परंतु केव्हा पुष्कळ जंतही सापडतात, शवपरिक्षकांना हे जंत नेहमी आढळतात. पोटात जंत नाही असा मनुष्य मिळणे दुर्मिळ आहे.

जंतांचा उपद्रव म्हणजे सामान्य गोष्ट समजली जाते, पण पुष्कळदा ती मोठी भयंकर असते. जंतांपासून अनेक रोग उद्‌भवतात; त्यामुळे रोगाचे निदान करण्यास मोठे कठीण पडते. जंतापासून ज्वर येतो, त्यावेळी इतर ज्वर जाणारी कसलीही उत्तम गुण येणारी औषधे दिली तरी गुण येतं नाही. त्यावेळी जंत पडणारे औषध दिल्यास तत्काळ गुण येतो. जंतांपासून एखादे वेळी तर भयंकर सन्निपाताप्रमाणे हुबेहब ज्वर येतो. त्यावेळी नीट परीक्षा करून जंताचाच ज्वर ठरल्यास जंतनाशक उपायच बिनदिक्कत करावे. म्हणजे जंत पडताच ज्वर जाऊन बरे वाटते. लहान मुलात तर अनेक वेळी ज्वरात जंतोपद्रवच फार आढळतो.

कृमी-जंत झाल्याची लक्षणे-

मुलांमध्ये किवा मोठ्या माणसांमध्ये पोटात नुसते जंत झाल्यास, तोंडास वाईट घाण येते. हात, पाय व कानाच्या पाळी गार लागतात. पोट गरम असते व फुगते व त्यात चावल्यासारखी पीडा होते, तहान लागते पण रात्री जास्त लागते, झोपेत दात खातो, शरीर निस्तेज होते, जिभेवर पांढरा साका जमतो, तांबूस पांढरे जुलाब होतात व बारीक, बारीक कृमि पडतात.

नुसत्या जमिनीवर मूल उपडे निजू लागते व तेच त्यास बरे वाटते. फक्त पोट व छाती गरम असते. कधी कधी बारीक किवा मोठा भयंकर ज्वर असतो.

मुलास पोहे, हरभरे वगैरे भाजके जिन्नस व खमंग व तिखट मिठाचे पदार्थ फार आवडतात व थोरासही असेच होते. कित्येक बालकांमध्ये तीव्राग्नी किंवा गोड पदार्थांची खाय खाय सुटलेली दिसून येते.

शय्यामुत्रता किंवा नक्तमुत्रता, औषधोपचारोत्तर व्याधी लक्षणवृद्धी, कृमिपासून भक्‍तद्वेष किवा अनन्नाभिलाषेचा, अन्न भरपूर प्रमाणात खाऊनही शरीर बारीक दिसून येते, मळमळ, तोंडाला पाणी सुटणे, अन्न न पचणे, अरुची, घेरी, ओकारी, तहान, पोट फुगणे, सूज आणि पडसे हे विकार होतात.

अचानक निद्राभंग, झोप न येणे, स्वप्ने अधिक पडणे, नेत्राविलता, नासाकंडू, नासाग्र व कर्णपाली शैत्य, तालु- जिव्हा- नख व गंड- वैवर्ण्य, अक्षीकूट- मुखशोथ, कृमिकोष्ठ, नासा कंडू ही सुद्धा कृमिंची लक्षणे बऱ्याचदा आढळून येतात.

गुदाजवळ कंडू फार सुटणे, स्त्रीपुरुषांच्या जननेद्रियांच्या आतल्या किवा बाहेरील बाजूस फार कंडू सुटणे, त्यांत दाह होणे, अस्वस्थता, तळमळ, अंगदाह, नाकाच्या आत खाज, आचके, अपस्मार, भुतोन्माद, पांडूरोग, अग्निमांद्य ह्या रोगांस विशेषत: हे जंतच कारण असतात.

लहान मुलांस दुधासारखी लघ्वी होते ती जंतांमुळेच होते.अतिशय रक्‍तहीनता म्हणजे शरीराचा पांढुरपणा वाढतो, कुष्ठ –त्वचा रोग उत्पन्न होणे

खाली दिलेल्या रोगात सर्वसाधारण कृमि असण्याचा संभव असतो.

पोटशूळ, मुरडा, आमांश, अजीर्ण, अतिसार, जलोदर, आचके, अपस्मार, पटकी, मोडशी, न भरणारे व्रण, पांडूरोग, सूज, उलटी, तोंडास पाणी सुटणे, गुह्येद्रियांस खाज, गुदकंडू, पापण्यांचे रोग, फार दिवसांच्या जखमा, कंडू, चाई (इंद्रलुप्त), खरूज, खवडे, इसब, वगैरे हयात कृमि असणे साहजिक आहे. ह्यात पोटासंबंधी रोगात जंत आणि दुसरे बारीक जंतू असतात, इतर त्वचेसंबंधी रोगांत व व्रणांत सूक्ष्म कृमि असतात.

“तत्र सर्वक्रिमीणापमकर्षणमेगादितः कार्यम्‌, ततः प्रकृतिविधातः अनन्तर

निदानोक्तानां भावानामनुपसेवनयिति।।*- च. वि, ७/ ९४

कृमिंची चिकित्सा करीत असताना ती तीन प्रकारे करावी लागते. अपकर्षण, प्रकृतिविघात आणि निदानपरिवर्जन. हे तीनही उपक्रमे क्रमाने केले पाहिजेत. म्हणजेच प्रथम अपकर्षण नंतर प्रकृतिविघात आणि त्यानंतर निदानपरिवर्जन.

अपकर्षण म्हणजे शोधनोपचारांनी कृमि शरीराच्या बाहेर काढून टाकणे यालाच कृमिपातन चिकित्सा असेही म्हणतात. प्रकृतिविघात म्हणजेच कृमिघ्नचिकित्सा. कृमिघ्न औषधे वापरून कृमि निर्जीव होतील. असे पाहणे म्हणजेच प्रकृतिविज्ञान होय. निदानपरिवर्जन म्हणजे, ज्या कारणांनी कृमिंची उत्पत्ति होते ती कारणे टाळणे होय. निदानपरिवर्जन हा प्रकृति विघातानंतर करावयाचा उपक्रम आहे असे जरी म्हटले असले तरी अपकर्षण आणि कृमिघ्न चिकित्सा करीत असतानाही म्हणजेच सुरुवातीपासूनच निदानपरिवर्जन करावयास हवे.

कृमिची ही सामान्य चिकित्सा म्हणून सांगितली असली तरी यासाठी वापरावयाची ओषधी द्रव्ये ही बाह्य, कफज, रक्तज व पुरीषज कृमिंसाठी वेगवेगळी असतात आणि म्हणूनच त्या प्रत्येक प्रकारची स्वतंत्र चिकित्सा पाहणे योग्य ठरेल.

बाह्यकृमि उपाय :

बाह्यकृमिंच्या अपकर्षणासाठी तीक्ष्ण गंधयुक्‍त धूमांचा प्रयोग करावा. सर्जरस, गुग्गुळ आदि द्रव्ये यांसाठी उपयुक्त ठरतात. निंब, करंज,चंदन, रीठा, शिकेकाई, सिताफळांचे बी, इत्यादि द्रव्ये उद्गर्तन व धावनासाठी उपयुक्त ठरतात.

बाह्य कृमिसाठी सिताफळीच्या बियांचे उद्वर्तन अत्यंत लाभदायी ठरते. या बियांचे सुक्ष्म-वस्त्रगाळ चूर्ण डोक्यात घालून शिर:प्रदेश वस्त्राने बांधून ठेवावा. रात्रभरात सर्व उवा व लिखा मरून जातात.

निदान परिवर्जनासाठी दररोज स्नान करणे व शरीरावयावांची, विशेषतः त्वचेची व केसांची योग्य ती निगा राखणे आवश्यक असते. वस्त्रप्रावरणे यांचीही अशीच काळजी घ्यावयास हवी. कपडे स्वच्छ धुवून, वाळवून, त्यांचे सुगंधी द्रव्यांनी धूपन करावे व मग ते परिधान करावेत.

कफज व पुरीषज कृमिवर उपाय :

या दोन्ही प्रकारांत करावायाची चिकित्सा एकाच प्रकारची असते. म्हणूनच या दोन्ही प्रकारांत करावयाच्या चिकित्सेचा एकत्रित विचार करणे युक्‍त ठरते.

या प्रकारात अपकर्षणासाठी वमन, बस्ति, विरेचन आणि नस्य यांचा यथायोग्य उपयोग करावा लागतो. कृमिपातनासाठी पळसपापडी, एरंडस्नेह, निशोत्तर, किरमाणी ओवा, कपिला ही औषधे उपयुक्‍त ठरवात.

प्रकृति विघातासाठी कटू-तिक्त-कषाय-उष्ण अशा द्रव्यांचा आणि क्षारांचा उपयोग चांगला होतो. औषधी द्रव्यापैकी भल्लातक हे प्रकृतिविघातासाठी म्हणजेच कृमिघ्न म्हणून श्रेष्ठ द्रव्य आहे. वावडिंग, एरंडकर्कटीचे बीज, (पपईच्या बिया), इद्रयव, सर्पगंधा, काडेचिराईत आणि कारस्कर ही अन्य काही प्रकृतिविघातकर अशी औषधीद्रव्ये होत.

कृमिंच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या कफ दोषांवरील चिकित्सा करणे हेही कृमिंचा विघात करणारे ठरते

अपुनर्भवासाठी निदान परिवर्जन आवश्यक ठरते. विशेषत: अग्निमांद्य होणार नाही आणि कफाची वृद्धि होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कफज व पुरीषज कृमिंसाठी अपकर्षणाकरिता करावयाचे शोधनोपचार दर 15 -15 दिवसांनी करावे लागतात. तर कृमिघ्न म्हणजेच प्रकृतिविघातकर चिकित्सा सातत्याने काही महिने चालू ठेवावी लागते.

रक्तज कृमिवर उपाय :

रक्तविस्रावण आणि विरेचन हे दोन शोधनोपक्रम रक्तज कृमिसाठी महत्त्वाचे आहेत. औषधांमध्ये सर्व प्रकारचे कुष्टघ्न उपचार करणे आवश्यक ठरते.

जंत झाल्यास पथ्य अपथ्य

पथ्यकर :

तक्रसाधित यवागु, अल्पस्नेह-तिक्‍त-कटु प्रधान अशा प्रकारचा आहार शेवगा आणि लसूण, हे विशेष पथ्यकर पदार्थ आहेत. उष्णोदकही पथ्यकर ठरते.

अपथ्यकर :

मधुर-अम्ल-अन्न, सर्व प्रकारची मधुर रस प्रधान द्रव्ये, गुळ, पालेभाज्या, शुष्कमांस आणि गारपाणी हे विशेष अपथ्यकर पदार्थ आहेत.

आतड्यांत जोपर्यंत अम्लरस चालू आहे तोपर्यंत जंत होण्याची भीती नाही. कारण त्या रसाने ते मरतात किंवा त्यांची वाढ होत नाही. म्हणून जंत होण्याची सवय असलेल्या मुलास लिंबाचे सरबत देत असावे किवा हिंग, मीठ घालून ताक पाजावे.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155
best-ayurvedic-clinic-in-Pune

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

वेदाकेअर आयुर्वेद पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!